स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषबाबू यांची ऐतिहासिक भेट !
गेल्याच आठवड्यात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या हिंदी भाषिक चित्रपटावरून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी आक्षेप घेतला. चंद्र कुमार बोस यांनी ‘एक्स’वर या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते रणदीप हुडा यांना ‘टॅग’ (उद्देशून) करत केलेल्या लिखाणामध्ये म्हटले आहे, ‘रणदीप हुडा, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या तुमच्या चित्रपटाचे मी कौतुक करतो; पण योग्य व्यक्तीमत्त्व दाखवणे पुष्कळ महत्त्वाचे आहे. कृपया सावरकर यांच्यासमवेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव जोडणे टाळा. नेताजी हे सर्वांना समवेत घेणारे धर्मनिरपेक्ष नेते आणि देशभक्तांचे रक्षण करणारे होते.’’ चंद्र कुमार बोस यांचा आक्षेप खोडून काढणारे लिखाण या लेखाद्वारे प्रसिद्ध करत आहोत.
१. बॅरिस्टर जीना यांनी हिंदूंचा प्रतिनिधी म्हणून नेताजींना सावरकर यांची भेट घेण्याविषयी सांगणे
हिंदु-मुसलमानांच्या एकीचा प्रश्न कायमचा मिटवून टाकण्याच्या हेतूने देश गौरव सुभाषबाबू मुंबईला बॅरिस्टर जिना यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्या वेळी जिना सुभाषबाबूंना म्हणाले, ‘‘सुभाषबाबू तुम्ही कुणाच्या वतीने तडजोडीची बोलणी करण्यास आला आहात ? तुम्ही काँग्रेसच्या वतीने बोलणार असाल, तर काँग्रेसने तुम्हाला बहिष्कारले आहे. तुम्ही हिंदूंचे प्रतिनिधित्व करणारे नेते नाही. हिंदूंचे प्रतिनिधित्व करणारा एकमेव नेते म्हणजे सावरकर आहेत. हिंदु-मुसलमानांच्या संदर्भात बोलणी करण्यासाठी मी केवळ सावरकरांशीच बोलू शकतो, अन्य कोणत्याही नेत्याशी नाही.’’
जिनांचे विचार ऐकल्यावर २२ जून १९४० या दिवशी सुभाषबाबू स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भेटण्यासाठी सावरकर सदनात दाखल झाले. सुभाषबाबूंनी वरील संवाद सांगितल्यानंतर सावरकर त्यांना म्हणाले,‘‘चालू महायुद्धाच्या संकटात ब्रिटन सापडले असतांना तुमच्यासारख्या पुढार्यांनी हिंदुस्थानात राहून हालवेलचा पुतळा कलकत्त्याच्या मार्गातून उखडून टाकण्याच्या अगदी क्षुल्लक चळवळीपायी ब्रिटिशांच्या बंदी गृहात जाऊन सडत पडण्यात काही अर्थ आहे का ?’’ सुभाषबाबू म्हणाले, ‘‘जनतेत काहीही करून ब्रिटिशांविरुद्ध क्षोभ चेतवत राहिले पाहिजे, नाही तर करावे तरी काय ?’’ सावरकर सुभाषबाबूंना म्हणाले, ‘‘मी तुमची तळमळ जाणतो. तुम्ही अकारण हालवेलचा पुतळा हालवण्याच्या कार्यात अडकू नका. त्यामुळे लाभ होण्याऐवजी हानी होईल. इंग्रज तुम्हाला बंदीगृहात टाकतील.’’
२. सावरकर यांनी सुभाषबाबूंना हिंदी सैन्याचे नेतृत्व करण्याविषयी सांगणे
या वेळी सावरकर यांनी सुभाषबाबूंना रासबिहारींशी त्यांच्या होणार्या पत्रव्यवहाराविषयी सविस्तर सांगितले. रासबिहारी यांच्या पत्राचा दाखला देत सावरकर सुभाषबाबूंना म्हणाले, ‘‘या पत्रावरून असे दिसते की, जपान या वर्षाच्या आत युद्ध पुकारेल, अशी शक्यता दिसत आहे. असे झाले, तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जर्मनी जपानच्या अद्ययावत् शस्त्रानिशी आणि लढाईत मुरलेल्या सहस्रावधी हिंदी सैनिकांसह हिंदुस्थानवर बाहेरून स्वारी करण्याची कधीही न आलेली सुवर्णसंधी आपल्याला मिळणार आहे. अशा वेळी तुमच्यासारख्या पुढार्याने इंग्रजांकडून स्वतःला अटक करवून घेणे, हे देशाच्या दृष्टीने विचार करता हानिकारक आहे. रासबिहारींसारखे तुम्ही सुद्धा ब्रिटीश सरकारच्या हातावर तुरी देऊन या देशातून बाहेर पडा. सहस्रावधी हिंदी सैनिकांचे नेतृत्व तुम्ही करावे.’’
३. सुभाषबाबू ब्रिटिशांच्या तावडीतून निसटणे आणि ब्रिटीश सैन्यात हिंदी सैनिकांची संख्या वाढणे
त्यानंतर सुभाषबाबू सावरकर सदनातून बाहेर पडले. कलकत्त्याला त्यांनी हालवेलचा पुतळा हटवण्याच्या कार्यात स्वतःला गुंतवून घेतले. परिणामी ब्रिटीश सरकारने त्यांना अटक करून कारागृहात टाकले. कारागृहातून स्वतःची सुटका करून जर्मन आणि पुढे जपानकडे निसटून जाण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. हा विचार त्यांनी कृतीत आणला आणि ते हिंदुस्थानातून निसटून जर्मनीला गेले. इकडे हिंदुस्थानात सावरकर यांनी हिंदी तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामागे जसे देश स्वातंत्र्य प्राप्त करण्याचे मूलभूत कारण होते तेवढेच महत्त्वाचे आणखी एक कारण, म्हणजे पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांच्या सैन्यात हिंदी तरुणांची संख्या अत्यंत अल्प होती. त्यांची संख्या सैन्यात वाढवणे, हे राष्ट्रहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. सावरकर यांच्या या प्रयत्नाला यश आले आणि ब्रिटीश सैन्यातील हिंदी सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. पुढे सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे दुसर्या महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढणारे हिंदु सैनिक इटली आणि जर्मनीच्या हाती सापडले. त्या सहस्रो ब्रिटीश हिंदी सैनिकांना जर्मनीच्या अद्ययावत् शस्त्रास्त्रांनी सज्ज करून भारतीय क्रांतीसेना उभारली. या सैनिकांना ब्रिटिशांची युद्धनीती पूर्णपणे अवगत झाली होती.
नंतर सुभाषबाबू जपानने जिंकलेल्या सिंगापूरला गेले आणि सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे सुभाषबाबूंनी याच सैन्याचे ‘सरसेनापती’ पद स्वीकारले. पुढे ती क्रांतीसेना सिंगापूरहून ‘चलो दिल्ली’ची रणगर्जना करत ब्रह्मदेश ओलांडून थेट आसामपाशी येऊन धडकली. यापुढे हिंदी सैन्य ब्रिटीश सैन्याशी कसे लढले, याचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे.
४. सावरकर यांच्या सैनिकीकरणाची चळवळीविषयी जपानमधील सुप्रसिद्ध ग्रंथकाराने केलेले वर्णन
ऑगस्ट १९५४ मध्ये जे.सी. ओहसावा या जपानमधील सुप्रसिद्ध ग्रंथकाराचे ‘द टू ग्रेट इंडियन्स’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या ग्रंथकारांनी रासबिहारी बोसांच्या क्रांतीकारक सैन्याची तुकडी ब्रिटिशांशी लढत असल्याच्या प्रसंगासंबंधीचा एक उतारा इथे सांगणे सयुक्तिक ठरेल. ‘फेब्रुवारी मासात जपानने सिंगापूरवर आक्रमण केले. ब्रिटीश सैन्यातील हिंदी सैनिकांचा अडथळा जबरदस्त होता. जपानमधील सैन्याला अनेक अडथळे दूर करण्यासाठी भयंकर संघर्ष करावा लागला. हिंदुस्थानच्या राष्ट्रीय सेनेचे प्रमुख आघाडीवर होते. ब्रिटीश सैनिकांना हिंदुस्थानातील हिंदी सैनिकांविषयी कोणत्याही प्रकारे आपुलकीची भावना आणि हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याविषयी आत्मीयता नव्हती. ही गोष्ट हिंदी सैनिकांना विशेषत्वाने जाणवली. त्याच क्षणी हिंदी सैनिकांनी सावरकर यांनी सांगितलेला मंत्र तात्काळ उपयोगात आणला. त्यांनी आपल्या हातातील शस्त्र ब्रिटीश सैनिकांवर चालवले. अशा प्रकारे सावरकर यांच्या सैनिकीकरणाची चळवळ दुसर्या महायुद्धात आकाराला आली. ब्रिटीश सैन्यात सहभागी झालेले हिंदी आणि क्रांतीसेना यांतील सैनिक यांनी एकत्रितपणे जेव्हा विजयाच्या घोषणा दिल्या, त्या वेळी जपानी सैनिकांची मती गुंग झाली.’ अशा प्रकारे जपानी सैन्याने सिंगापूर कह्यात घेऊन स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले.
५. सावरकर यांची रणनीती आणि सैनिकी दुर्बलता यांमुळे ब्रिटिशांनी हिंदुस्थानातून काढता पाय घेणे
सावरकर यांची रणनीती यशस्वी झाल्यानेच ब्रिटिशांनी हिंदुस्थानातील स्वतःचा गाशा गुंडाळण्याचे ठरवले. ब्रिटीश पंतप्रधान ॲटलींनी स्वतःच्या सरकारच्या मनाच्या सत्यस्वरूपाचे मोजक्या वाक्यात वर्णन करतांना म्हटले, ‘‘ब्रिटनला सत्तांतर करावे लागत आहे; कारण भारतीय सैन्य ब्रिटीश सरकारशी प्रामाणिक राहिले नाही. भारतावर अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक असलेले सैन्य ब्रिटीश सरकार भारतात ठेवू शकत नाही.’’
यातून हेच स्पष्ट होते की, सैनिकी दुर्बलतेमुळे ब्रिटिशांना हिंदुस्थानातून काढता पाय घ्यावा लागला. ‘अहिंसेचे तत्त्वज्ञान आम्हाला पटल्यामुळे आमचे हृदय परिवर्तन झाले किंवा साम्राज्यवाद हा अन्यायकारक आहे, ही गोष्ट आम्ही स्वेच्छने स्वीकारल्यामुळे आम्ही हिंदुस्थान सोडून जात आहोत’, असे ॲटली म्हणाले नाहीत किंवा कोणताही ब्रिटीश खासदार म्हणाला नाही. ही गोष्ट आपण दुर्लक्षित करून चालत नाही. सावरकर यांच्या सैनिकीकरणाच्या मागची राजनीती त्यांच्या विरोधकांना कळली नाही. त्यामुळेच त्यांनी सावरकर यांच्या सैनिकीकरणाला विरोध करून ‘रिक्रुटवीर’ (भरतीवीर) म्हणून त्यांची हेटाळणी केली, असाच निष्कर्ष निघतो.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (९.३.२०२४)