सनातनच्या पहिल्या संत प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांच्या खोलीतील वस्तू आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांच्यात जाणवलेले पालट
‘फाल्गुन शुक्ल तृतीया (१२.३.२०२४) या दिवशी सनातनच्या पहिल्या संत प.पू. विमल फडकेआजी यांची १७ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांनी वापरलेली जपमाळ, त्यांच्या खोलीतील वस्तू, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आणि त्यांच्या चरणांचे छायाचित्र अन् प.पू. आजींचे छायाचित्र यांच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.
प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. प.पू. आजींनी वापरलेल्या जपमाळेत जाणवलेले पालट
अ. प.पू. आजींनी वापरलेली जपमाळ वजनाने पुष्कळ हलकी झाली आहे. (माळेचे मूळ वजन २४ ग्रॅम होते. आता तिचे वजन केवळ साडेदहा ग्रॅम आहे.)
आ. माळेचा स्पर्श मृदू जाणवतो.
इ. माळेतील काही मण्यांचा रंग पांढरा झाल्याने ‘माळेतील निर्गुणतत्त्व वाढत आहे’, असे मला जाणवते.
ई. ‘माळेला तारक सुगंध येत आहे’, असे आम्हा कुटुंबियांना जाणवते.
२. प.पू. फडकेआजींच्या खोलीतील निळ्या रंगाच्या पंख्याचा रंग कडेने पांढरा होणे, पंख्यांच्या पात्यांचा स्पर्श पुष्कळ मऊ जाणवणे
२६.२.२०२२ या दिवशी मी प.पू. फडकेआजींच्या खोलीतील भिंतीवर लावलेला पंखा (पेडिस्टल फॅन) पुसत होते. त्या वेळी माझा नामजप आपोआप चालू झाला. ‘पंख्याचा रंग आकाशी निळा असून त्याच्या पात्यांचा रंग कडेने पांढरा होत आहे’, असे माझ्या लक्षात आले. माझ्या हातांना पात्यांचा स्पर्श पुष्कळ मऊ जाणवला. ‘पंख्यांची पातीही अतिशय गुळगुळीत झाली आहेत’, असे मला जाणवले. आमच्या घरातील एका खोलीत असाच निळ्या रंगाचा पंखा आहे; मात्र त्या पंख्याच्या रंगात असा पालट झाला नाही. यातूनच संतांच्या खोलीतील चैतन्याची प्रचीती येते.
३. खोलीतील ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांचे छायाचित्र निर्गुणाकडे जात आहे’, असे सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगणे
१५.३.२०२२ या दिवशी सद्गुरु स्वाती खाडये प.पू. फडकेआजी यांची खोली पहाण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी तेथील पटलावरील ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांचे छायाचित्र निर्गुणाकडे जात आहे’, असे मला सांगितले. आम्ही कुटुंबीय आणि खोली पहाण्यासाठी येणारे साधक यांनाही असेच जाणवते.
४. खोलीतील देवतांची चित्रे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले अन् प.पू. फडकेआजी यांची छायाचित्रे यांच्यामध्ये जाणवलेले पालट
४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. फडकेआजी यांच्या छायाचित्रांकडे आपण कोणत्याही दिशेने पाहिल्यास ‘ते आपल्याकडे पहात आहेत’, असे जाणवते.
४ आ. ‘श्री दुर्गादेवीच्या चित्रातील तिच्या मुखाच्या सभोवती असणारी पांढर्या रंगाची प्रभावळ वाढत आहे’, असे जाणवणे : श्री दुर्गादेवीच्या चित्रातील तिच्या साडीचा रंग प्रथम गडद लाल होता. तोही आता फिकट झाला आहे. ‘तिच्या मुखाच्या सभोवती असणारी पांढर्या रंगाची प्रभावळ वाढत आहे’, असे जाणवते.
४ ई. प.पू. विमल फडकेआजींच्या खोलीतील ‘अन्य देवतांची चित्रेही निर्गुणाकडे जात आहेत’, असे मला जाणवले.
परात्पर गुरु डॉक्टर, आपणच सर्व पालट घडवत आहात. आपल्याच कृपेमुळे झालेले पालट आपणच आमच्या लक्षात आणून देता. आपल्या आणि प.पू. फडकेआजी यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१२.२०२२)
प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांच्या खोलीतील वस्तूंमध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असल्याचे वैज्ञानिक उपकरणाद्वारेही सिद्ध !‘संतांच्या घरातील वस्तू संग्रहात का ठेवतात, याचे महत्त्व बाजूच्या तक्त्यावरून लक्षात येईल.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ‘संत म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! संतांमध्ये पुष्कळ चैतन्य असते. त्यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्या दैनंदिन उपयोगातील वस्तू, त्यांचे निवासस्थान, त्यांचा स्पर्श झालेल्या वस्तू इत्यादी चैतन्याने भारित होतात. संतांनी देहत्याग केल्यानंतरही त्यांचे सूक्ष्म चैतन्यमय अस्तित्व समष्टीला चैतन्य प्रदान करते. त्यामुळे हिंदु धर्मात संतांशी संबंधित गोष्टी जतन करण्याची प्राचीन परंपरा आहे. सनातनच्या पहिल्या संत प.पू. फडकेआजींनी देहत्याग करून १६ वर्षे लोटून गेली आहेत. तरीही त्यांच्या खोलीतील वस्तूंमध्ये चैतन्य टिकून आहे, तसेच ते उत्तरोत्तर वाढत आहे. प.पू. फडकेआजी यांच्या खोलीतील वस्तूंच्या संदर्भात संशोधन करण्यासाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे काही चाचण्या करण्यात आल्या. या उपकरणाद्वारे वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जांची प्रभावळ मोजता येते. सर्वसाधारण वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असेलच असे नाही. प.पू. फडकेआजी यांच्या खोलीतील वस्तूंमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असल्याचे बाजूच्या सारणीतून स्पष्ट होते. प.पू. फडकेआजी यांच्या छायाचित्रात ८५५ मीटर म्हणजे पुष्कळ अधिक प्रमाणात चैतन्य आहे, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. फडकेआजी यांच्या एकत्रित छायाचित्रात २०३४ मीटर म्हणजे सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) आहे. यातून संतांच्या छायाचित्रांतून प्रक्षेपित होणार्या चैतन्यामुळे समष्टीला किती मोठ्या प्रमाणात लाभ होतो, हे लक्षात येते. यासाठी संतविभूतींच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’ – सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.२.२०२३) |
साधिकेला प.पू. (कै.) विमल फडकेआजी यांचे सूक्ष्मातील अस्तित्व जाणवणे
१. आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी श्रीमती मनीषा गाडगीळ यांच्या पलंगावर बसून नामजप करतांना प.पू. (कै.) फडकेआजी यांचे अस्तित्व जाणवणे
‘२४.५.२०२३ या दिवशी सकाळी मला अनिष्ट शक्तींचा त्रास होऊ लागला; म्हणून मी नामजपादी उपाय विचारण्यासाठी आध्यात्मिक पातळी ६७ टक्के असलेल्या श्रीमती मनीषा गाडगीळकाकू (श्रीमती मनीषा गाडगीळ या सनातन संस्थेच्या पहिल्या संत प.पू. (कै.) फडकेआजी यांच्या कन्या आहेत.) यांच्या खोलीत गेले. श्रीमती मनीषा गाडगीळ यांनी मला नामजप करायला सांगितला. मी त्यांच्या पलंगावर बसून नामजप करू लागले. तेव्हा मला ‘तो पलंग प.पू. (कै.) फडकेआजी यांचा आहे’, असे जाणवत होते. श्रीमती गाडगीळकाकू यांच्या जागी मला प.पू. (कै.) फडकेआजी यांचे अस्तित्व जाणवत होते.
२. प.पू. (कै.) फडकेआजी यांचे सूक्ष्मातील अस्तित्व जाणवल्याने साधिकेचा आध्यात्मिक त्रास लवकर उणावणे आणि मन सकारात्मक होणे
प.पू. (कै.) फडकेआजी यांचे सूक्ष्मातील अस्तित्व जाणवत असल्याने माझा भाव जागृत झाला. माझा नामजप व्यवस्थित होत होता. एरव्हीच्या तुलनेत मला होत असलेला आध्यात्मिक त्रास लवकर उणावला. विशेष म्हणजे मला थकवा आला नाही आणि अन्य कोणताही त्रास झाला नाही. माझे मनही सकारात्मक होते.
३. ‘सनातनचे संत देहत्याग केल्यावरही सूक्ष्मातून प्रत्येक साधकाच्या समवेत आहेत’, याची जाणीव होऊन भावजागृती होणे
या अनुभूतीचे टंकलेखन करतांनाही मला प.पू. (कै.) फडकेआजी यांचे अस्तित्व जाणवत होते. ‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, आध्यात्मिक त्रास होत असतांनाही आपल्या कृपेने मला ही अनुभूती आली. आपल्या कृपेने भावही अनुभवता आला. ‘सनातनच्या काही संतांनी देहत्याग केला असला, तरी ते सूक्ष्मातून प्रत्येक साधकाच्या समवेत आहेतच’, याची आपण मला प्रचीती दिलीत, याविषयी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. आपल्या कृपेने झालेली भावजागृती आणि आपण मला दिलेली ही अनुभूती मी आपल्या सुकोमल चरणी मनापासून अर्पण करते.’
– कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.५.२०२३)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |