रशियाविरुद्धचे युद्ध संपवण्याच्या पोप यांच्या सल्ल्याला युक्रेनकडून केराची टोपली !

कीव्ह (युक्रेन) – ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी स्वित्झर्लंड येथून युक्रेनला युद्ध संपवण्यासाठी पांढरा ध्वज उंचावण्याचे धैर्य दाखवण्याचा सल्ला दिला होता. युक्रेनने मात्र पोप यांच्या या सल्ल्याला केराची टोपली दाखवली आहे. संतप्त अध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी पोप यांच्या विधानाला त्यांचे नाव न घेता विरोध केला. झेलेंस्की म्हणाले की, युक्रेनी चर्च आणि धार्मिक नेते प्रार्थना, चर्चा अन् आशीर्वाद यांद्वारे युक्रेनच्या नागरिकांना साहाय्य करत आहेत. ते (पोप यांच्यासारखे) अडीच सहस्र किलोमीटर दूर न बसता अशा पक्षांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, ज्यात एका पक्षाला जगायचे आहे आणि दुसर्‍या पक्षाला पहिल्या पक्षाला नष्ट करायचे आहे. (कीव्ह आणि स्वित्झर्लंडची राजधानी बर्न या शहरांत २ सहस्र २०० कि.मी.चे अंतर आहे.)

सौजन्य विऑन 

१. आंतरराष्ट्रीय स्तरावर पांढरा ध्वज हा युद्धविराम, वाटाघाटी किंवा आत्मसमर्पण करण्याची इच्छा, यांसाठी असतो.

२. पोप मे २०२३ मध्ये झेलेंस्की यांना भेटले होते. त्या वेळीही पोप यांनी युक्रेनला नमते घेण्याचा सल्ला देत रशियाविरुद्धते युद्ध संपवण्याचे आवाहन केले होते.

३. ‘बीबीसी’नुसार व्हॅटिकनमधील युक्रेनच्या राजदूताने पोप यांच्या विधानाची तुलना दुसर्‍या महायुद्धात हिटलरशी वाटाघाटी करणार्‍यांशी केली. त्याच वेळी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा यांनीही पोपवर आरोप केले आणि सांगितले की, व्हॅटिकनने दुसर्‍या महायुद्धात नाझी जर्मनीला विरोधही केला नव्हता. या आरोपावर व्हॅटिकनने एक निवेदन प्रसारित करून त्याने पडद्यामागे ज्यूंसाठी काम केल्याचे म्हटले आहे.

युक्रेनने संवादाच्या माध्यमातून वाद संपवण्याचे धाडस दाखवावे ! – पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी – युक्रेन सरकारने रशियासमवेत चालू असलेला वाद संवादाच्या माध्यमातून संपवण्याचे धैर्य दाखवले पाहिजे, असा सल्ला ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी स्वित्झर्लंडमध्ये दिलेल्या मुलाखतीत दिला. यापूर्वी रशियाने म्हटले होते की, कोणतेही विदेशी साहाय्य या युद्धाचा मार्ग पालटू शकत नाही.

पोप म्हणाले होते की,

१. जेव्हा तुम्ही पहाता की, तुमचा पराभव झाला आहे, तसेच काही गोष्टी ठीक होत नाहीत, तेव्हा तुमच्यात वाटाघाटी करण्याचे धाडस असायला हवे. वाटाघाटी कधीच आत्मसमर्पणासाठी नसतात, तर देशाला वाचवण्यासाठी असतात.

२. तुम्हाला लाज वाटेल; पण युद्ध चालू होऊन किती वर्षे झाली ? योग्य वेळी बोला आणि मध्यस्थीसाठी इतर देशांचे साहाय्य घ्या.

३. युक्रेनमधील लोकांमध्ये आत्मसमर्पण आणि पांढरा ध्वज, यांविषयी चालू असलेल्या चर्चेविषयीपोप यांना विचारण्यात आले असता पोप म्हणाले, ‘मला वाटते की, सर्वांत बलवान तो आहे, जो परिस्थिती पहातो, जो लोकांचा विचार करतो आणि पांढर्‍या ध्वजाचे (शांततेचे) धैर्य दाखवतो अन् वाटाघाटी करतो.’