पाकिस्तानी गुप्तचरांना संवेदनशील माहिती पुरवणार्‍याला अटक !

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाची कारवाई !

मुंबई – महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने प्रतिबंधित क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचरांना पुरवल्याच्या आरोपावरून माझगाव गोदीतील एका ३१ वर्षीय ‘स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर’ला अटक केली. हा हनी ट्रॅपचा (‘हनी ट्रॅप’ म्हणजे महिलेच्या माध्यमातून व्यक्तीला जाळ्यात अडकवणे) प्रकार असून या प्रकरणी पथकाने आरोपी आणि त्याच्या संपर्कात असलेल्या इतरांविरुद्ध गोपनियता कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

आरोपी अनेक महिन्यांपासून सामाजिक माध्यमांवर एका महिलेशी संभाषण करत होता. तिच्या सूचनेनुसार तो तिला माहिती देत असल्याचा आरोप आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी काम करणारा आरोपी पैशांच्या बदल्यात आरोपी महिलेला गोपनीय माहिती पुरवत होता. संबंधित आरोपी महिला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी संबंधित असल्याचा संशय आहे.

पथकाने वर्ष २०२३ मध्ये मुंबईतील माझगाव गोदीत काम करणार्‍या २३ वर्षीय गौरव पाटीलला पाकिस्तानस्थित एजंटला गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी अटक केली होती.

संपादकीय भूमिका 

अशांना देशद्रोही घोषित करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली, तरच असे प्रकार थांबतील !