Russia Ukraine Nuclear War : पंतप्रधान मोदी यांच्यामुळे रशिया आणि युक्रेन यांच्यात होणारे अणूयुद्ध टळले ! – अमेरिकेचा दावा
वॉशिंग्टन (अमेरिका) – गेल्या २ वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये वर्ष २०२२ मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन युक्रेनवर अणूबाँब टाकणार होते; मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना यापासून परावृत्त केले, असा दावा अमेरिकेच्या २ अधिकार्यांनी केला आहे.
१. सी.एन्.एन्. या वृत्तवाहिनीने या अधिकार्यांच्या हवाल्याने या संदर्भात वृत्त दिले आहे. यात वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, अणूयुद्ध रोखण्यासाठी ज्या देशांचे शब्द पुतिनपर्यंत पोचू शकतात (ज्यांचे पुतिन ऐकू शकतात) त्यांचे साहाय्य मागितले. मग बाहेरून येणारा दबाव चांगलाच उपयोगी पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरांच्या सार्वजनिक वक्तव्यांमुळे हे संकट टाळण्यास साहाय्य झाले.
२. वर्ष २०२२ च्या उत्तरार्धात ‘रशियाच्या अण्वस्त्रांद्वारे आक्रमण करू शकतो’, अशी माहिती अमेरिकेला मिळाली होती. युक्रेनचे सैन्य दक्षिणेकडील रशियाच्या कह्यातील खेरसनमध्ये वेगाने पुढे जात होते. त्यांनी रशियन सैन्याला पूर्णपणे घेरले होते. ही अशी परिस्थिती होती, जी रशियाला त्रास देत होती. ‘खेरसनमधील स्थिती अण्वस्त्रांच्या आक्रमणाचे प्रमुख कारण बनू शकते’, अशी चर्चा अमेरिकेच्या प्रशासनात होती. यानंतर अमेरिकेने भारतासह इतर देशांकडे साहाय्य मागितले.
३. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी उझबेकिस्तानमध्ये झालेल्या शांघाय शिखर परिषदेच्या निमित्ताने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना सांगितले होते की, हे युद्धाचे युग नाही.