पनवेल येथे प.पू. रामानंद महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्तचा सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला !
भजनांमुळे वातावरण चैतन्यदायी !
पनवेल, १० मार्च (वार्ता.) – श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदोर यांच्या वतीने प.पू. श्रीमद् सद्गुरु रामानंद महाराज (प.पू. रामजीदादा) यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्तचा सोहळा १० मार्च या दिवशी येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह येथे भावपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात साजरा झाला. ४०० हून अधिक भक्त आणि साधक यांनी या सोहळ्याचा लाभ घेतला. सर्वांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.
सकाळी प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबांच्या) चरणपादुकांचे पूजन पनवेल येथील डॉ. मिलिंद जोशी आणि सौ. अश्विनी मिलिंद जोशी यांनी, तर प.पू. रामानंद महाराज यांच्या चरणपादुकांचे पूजन खारघर येथील श्री. सतीश राऊत आणि सौ. प्रिया सतीश राऊत यांनी केले. इंदूर येथील प.पू. रामजीदादांच्या महिला भजनी मंडळाने काही भजने म्हटली. ‘हे भजनी मंडळ प.पू. रामजीदादा यांनी स्थापन केले आणि त्याला प्रोत्साहनही दिले’, अशा शब्दांत डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांनी या भजनी मंडळाचे महत्त्व सांगितले. यानंतर प.पू. रामजीदादा यांच्या आध्यात्मिक जीवनाची ओळख करून देणारी सनातन संस्थेच्या वतीने बनवण्यात आलेली चित्रफीत दाखवण्यात आली. यानंतर प.पू. बाबांचे सुपुत्र पू. नंदूदादा कसरेकर, प.पू. जोशीबाबा यांच्यासह अन्य भक्तांनी प.पू. बाबा आणि प.पू. रामजीदादा यांची भजने म्हटली. या सोहळ्यात सर्व भक्तगण भजनानंदात न्हाऊन निघाले. ही सर्वांसाठी मोठी पर्वणीच ठरली.
संत सन्मानपू. नंदूदादा कसरेकर यांचा सन्मान श्री. ओंकार गोरे यांनी, पू. तनुजा ठाकूर यांचा सन्मान सौ. मोक्षदा नूलकर यांनी, ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट’चे विश्वस्त श्री. शरद बापट आणि सौ. सुप्रिया बापट यांचा सत्कार श्री. दीपक कुबल आणि सौ. साधना कुबल यांनी, प.पू. जोशीबाबा यांचा सपत्नीक सन्मान श्री. आणि सौ. मानसी प्रवीण भोसले यांनी, तर पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा सन्मान सौ. वैष्णवी करदेकर यांनी केला. |
वंदनीय उपस्थिती
पू. नंदूदादा कसरेकर, डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले, पू. तनुजा ठाकूर, घाटकोपर येथील संत प.पू. जोशीबाबा, सनातन संस्थेच्या पू. (सौ.) अश्विनी पवार, पू. रमेश गडकरी, पू. शिवाजी वटकर
क्षणचित्रे
१. सर्व भक्तांना सोहळ्यात प.पू. बाबा अन् प.पू. रामजीदादा यांचे अस्तित्व जाणवत होते.
२. पू. नंदूदादा यांनी म्हटलेल्या भजनांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. भजने म्हणतांना काही जणांची भावजागृती होत होती.