रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महाशिवरात्रीनिमित्त झालेल्या पूजनाच्या वेळी आलेल्या अनुभूती
१. पुरोहित साधक महाशिवरात्रीच्या पूजनाची सिद्धता करत असतांनाच भगवान शिवाचे अस्तित्व जाणवणे
‘वर्ष २०२२ मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी पुरोहित पाठशाळेतील साधक रामनाथी आश्रमातील यज्ञकुंडाजवळ पूजनाची सिद्धता करत होते. ‘पुरोहित साधक कोणत्या पूजनाची सिद्धता करत आहेत ?’, हे मला ठाऊक नव्हते. ‘त्या दिवशी महाशिवरात्री आहे’, याचाही मला विसर पडला होता. मी आश्रमात प्रवेश करण्यापूर्वी पूजनाच्या सिद्धतेच्या जागेपासून ७ – ८ फूट अंतरावर उभी राहून प्रार्थना करत होते. तेव्हा मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते. त्या वेळी ‘पूजन संपले आहे आणि देवतांचे तेथे अस्तित्व निर्माण झाले आहे’, असे मला जाणवत होते. आश्रमात प्रवेश करणार्या अन्य २ साधकांनाही तसेच जाणवले. तेव्हा पूजनाची मांडणी होण्यापूर्वीच भगवान शिवाचे अस्तित्व तेथे जाणवल्याने ‘त्याच्या आवाहनापूर्वी त्याचे आगमन झाले आहे’, असे मला जाणवत होते.
२. पुरोहित साधकांनी पूजेची मांडणी अतिशय सुंदर करणे आणि त्या ठिकाणी भगवान शिवाचे अस्तित्व जाणवणे
रात्री महाप्रसादानंतर ‘महाशिवरात्रीनिमित्त पूजा आहे’, असा मला निरोप मिळाला. ‘मला तेथे चैतन्य मिळेल’, या उद्देशाने मी तेथे काही वेळ बसले. तेथे पुरोहित साधकांनी पूजेची मांडणी अतिशय सुंदर केली होती. ती पाहून ‘तेथे साक्षात् भगवान शिव आलेला आहे’, असे मला जाणवत होते.
३. पुरोहित साधकांनी विशेष पूजेचे नियोजन करणे
‘पुरोहित पाठशाळेतील साधकांनी स्वतः पुढाकार घेऊन ही विशेष पूजा करू शकतो’, असे सुचवले होते. त्यांनीच पूजनाचे आणि रात्रभर पाठवाचन करण्याचे नियोजन केले होते.
४. पुरोहित साधक अध्याय वाचत असतांना चैतन्यात वृद्धी होऊन वातावरणात वेगळीच प्रसन्नता जाणवणे
दुसर्या दिवसापासून माझ्या घरी पाहुणे येणार होते. त्यामुळे मला तेव्हा अधिक काळ आश्रमात थांबता येणार नसल्याने मी ‘रात्रभर पूजनस्थळी थांबून चैतन्य ग्रहण करायचे’, असे ठरवले. पुरोहित साधक शिवासंदर्भात एका पोथीचे वाचन करत होते. जसजसे ते एक-एक अध्याय वाचत होते, तसतशी चैतन्यात वृद्धी होऊन तेथील वातावरणात वेगळीच प्रसन्नता जाणवत होती. पाठशाळेतील साधक त्या पोथीचे वाचन अतिशय भावपूर्ण करत होते. हे सर्व पाहून माझ्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होत होती.
५. पुरोहित पाठशाळेतील साधकांनी सेवेतील चुकांतून शिकून सुधारणा करणे आणि समष्टीला लाभ मिळण्यासाठी सांघिकभावाने सेवा करणे
यापूर्वी पुरोहित पाठशाळेतील साधक केवळ कृती म्हणून पूजन आणि यज्ञाच्या कृती करत होते. नंतर संतांनी त्यांना विविध यज्ञयागाच्या वेळी त्यांतील चुका आणि त्रुटी दाखवून देऊन सेवा अधिक परिणामकारक होण्यासाठी स्थूल नियोजनापासून ते भावपूर्ण विधी होण्यापर्यंतच्या सर्व टप्प्यांवर मार्गदर्शन केले. त्याचा परिणाम म्हणजे आज ते सर्वजण समष्टीला शिवतत्त्वाचा लाभ होण्याच्या उद्देशाने स्वतः सर्व कृती सांघिकभावाने करत होते. हे पाहून मला त्यांचे पुष्कळ कौतुक वाटले. ‘पुरोहित साधक कसे घडत आहेत?’, याविषयी गुरुदेवांची कृपा जाणून माझी भावजागृती होत होती. सर्व पुरोहित साधक वयाने मोठे नाहीत; पण त्यांचा हा समष्टीचा विचार आणि त्याला अनुरूप शेवटपर्यंत त्यांची भावपूर्ण कृती पाहून माझे मन सतत कृतज्ञताभावाने भरून येत होते.
६. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या अस्तित्वाने चैतन्यात वाढ होणे, त्यांनी पुरोहित साधकांचे कौतुक करणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ त्यांच्या खोलीत सेवा करत अधूनमधून पूजाविधी पहात होत्या. त्या २ वेळा पूजनाच्या ठिकाणी येऊन गेल्या. तेव्हा त्यांनी पुरोहित साधकांचे कौतुक केले. त्यांनी ‘तेथे पुष्कळ चैतन्य जाणवत आहे’, असे सांगितले. तेव्हा ‘भगवंत आपल्या बाळांचे कौतुक कसे करतो ?’, याबद्दल गुरुमाऊलींचा वात्सल्यभाव मला अनुभवायला मिळाला. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी पूजनाच्या ठिकाणी येऊन देवतांना नमस्कार केल्यावर ‘तेथील चैतन्यात वृद्धी झाली’, असे मला जाणवले.
७. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधिकेला स्वतःची शाल पांघरायला दिल्यावर साधिकेची भावजागृती होणे
पूजन रात्रभर चालू होते. पहाटे मला थंडी वाजत होती. तेवढ्यात तेथे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आल्या. त्या मला म्हणाल्या, ‘‘थंडी आहे. तू माझी शाल घे. थंडीत बसू नकोस.’’ त्यांनी स्वतः त्यांची शाल मला आणून दिली. तेव्हा माझी भावजागृती झाली. त्यांची शाल आणि पूजन यांतून मिळणारे चैतन्य अनुभवतांना ‘भगवंत मला चैतन्यात न्हाऊ घालत आहे’, असे मला जाणवत होते. हे सर्व कृतज्ञतेने अनुभवणे, एवढेच माझ्याकडून होत होते. ‘गुरुदेव श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या रूपात माझ्यावर जणू वात्सल्याचा चैतन्यदायी वर्षाव करत होते’, हे पाहून माझी सतत भावजागृती होत होती.
८. पूजनाचा अंतिम टप्पा चालू असतांना ‘अनेक संत सूक्ष्मातून उपस्थित राहून सनातनच्या कार्याला आशीर्वाद देत आहेत’, असे दिसणे
पूजनाचा अंतिम टप्पा चालू असतांना पोथीतील अध्याय संपल्यावर मला ‘तेथे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन, प.पू. देवबाबा आणि प.पू. आबा उपाध्ये सूक्ष्मातून आले आहेत अन् साधकांना आशीर्वाद देत आहेत’, असे दिसले. एकदा मला प्रसिद्ध तबलावादक आणि तालयोगी पं. सुरेश तळवलकरजीही तेथे सूक्ष्मातून आल्याचे जाणवले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. पं. सुरेश तळवलकर हे मला तंडूमुनींच्या रूपात दिसले. (तंडूमुनी म्हणजे भगवान शिवाने ज्यांना प्रथम नृत्याचे ज्ञान दिले ते मुनी.) तेव्हा ‘पं. तळवलकरजी हेही संत आहेत’, असेच मला जाणवले. माझ्या मनात त्यांचे स्मरण ‘पू. सुरेश तळवलकरजी’ असेच झाले. मी त्यांना प्रत्यक्ष पाहिले नाही. केवळ त्यांचे छायाचित्र एकदा पाहिले आहे. (कु. मधुरा भोसले यांनाही प.पू. आबा उपाध्ये आणि प.पू. देवबाबा पूजनाच्या ठिकाणी सूक्ष्मातून आल्याचे जाणवले.) तेव्हा ‘संतांचे कार्य सूक्ष्मातून कसे चालू असते’, हे पाहून आणि ‘त्यांचे सनातनच्या कार्याला सूक्ष्मातून आशीर्वाद लाभत आहेत’, याची जाणीव होऊन माझे मन कृतज्ञतेने भरून आले.
९. सूर्याेदयापूर्वी पूजनाच्या ठिकाणचे वातावरण पवित्र आणि चैतन्यदायी जाणवणे
सकाळी सूर्याेदयापूर्वी पूजनाच्या ठिकाणचे वातावरण इतके पवित्र आणि चैतन्यदायी जाणवत होते की, मी जणू काही वेगळ्याच लोकात असल्याचे मला वाटले. सूर्याचे पसरलेले कोवळे किरण, आश्रमासमोरील शेताच्या वरच्या बाजूस असलेला धुक्याचा एक सुंदर प्रवाह, हळूवारपणे आकाशात विहार करणारे लहान लहान पक्षी’, असे सुंदर दृश्य मला दिसले. माझे मन आनंदाच्या डोहात डुंबत होते. ‘ते क्षण संपूच नयेत’, असेच मला वाटत होते.
हे गुरुदेवा, आम्हा साधकांसाठी भावपूर्ण पूजनाचे आयोजन करणार्या पुरोहित पाठशाळेतील सर्व साधकांप्रती कृतज्ञता ! तुमच्या कृपेने मला शिवरात्रीचा भावपूर्ण पूजन सोहळा आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची प्रीती अनुभवायला मिळाली. ‘हे गुरुराया, तुम्ही संत आणि साधक यांच्या माध्यमातून माझ्यासाठी सततच कृपा करत असता’, याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’
– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, नागेशी, गोवा. (२६.५.२०२३)
|