सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
कोण कोणत्या जन्मात किती साधना करील ?, हे ठरलेले असल्याने त्याच्यात न अडकता स्वतःची साधना करण्याकडे लक्ष केंद्रित करावे !
एक साधक : मुलीमुळे आम्ही सगळे कुटुंबीय साधनेत आलो; पण आता तिला वाटते, ‘घरी जाऊन शिक्षण घ्यावे.’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तिला शिक्षण घ्यायचे, तर शिकू दे; देव पाहिजे, तर साधना करून घेईल. कुणाची कोणत्या जन्मात किती साधना होणार ? तो किती साधना करणार ? हे ठरलेले असते. आपण त्याचा विचार करायला नको. तुम्ही तुमच्या साधनेकडे लक्ष द्या.
बरीच वर्षे साधना केल्यावर घरी जावेसे वाटत असेल, तर मनातील विचार कुणाशीतरी नियमितपणे बोलणे आवश्यक !
एक साधिका : मला साधना सोडायची नाही; परंतु ‘काहीतरी शिकायला हवे’, असे वाटते. त्यामुळे शिक्षण घेत साधना आणि सेवा करीन.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : वकील, डॉक्टर, इंजिनीयर असे शिकलेले साधक सर्व सोडून इकडे येतात. तू परत जाऊन शिकून पुन्हा परत येणार आहेस का ? आयुष्याची इतकी वर्षे साधना केलीस. आता परत जाण्याचा विचार केलास, तर ‘मनाप्रमाणे करणे’, असे होईल. जे सांगतील तसे केले की, साधना होते. यासाठी नियमितपणे कुणाशीतरी बोलायला हवे.