संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणेसाठी आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार ? – भारत

भारताचा संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रश्‍न !

न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी संयुक्त राष्ट्रांतील ७८ व्या सत्राच्या अनौपचारिक बैठकीत म्हणाल्या की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आवश्यक सुधारणांची नितांत आवश्यकता आहे. या सुधारणांवर एक दशकाहून अधिक काळ चर्चा चालू आहे; पण कोणताही परिणाम झालेला नाही. जवळपास सव्वा शतक उलटले आहे. जग आणि आपल्या भावी पिढ्या यापुढे प्रतीक्षा करू शकत नाहीत. त्यांना अजून किती वाट पाहावी लागेल ?, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

सौजन्य : ET NOW 

१.  कंबोज पुढे म्हणाल्या की, वर्ष २००० मध्ये जागतिक नेत्यांनी सुरक्षा परिषदेच्या सर्व पैलूंमध्ये व्यापक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्नांची गती अधिक तीव्र करण्याचा संकल्प केला होता. आता पुढील वर्षी संयुक्त राष्ट्रांचा ८० वा वर्धापन दिन असून सप्टेंबर २०२४ मध्ये एक महत्त्वाची शिखर परिषद होणार आहे. अशा प्रसंगी या आवश्यक सुधारणा केल्या पाहिजेत.

२. भारताच्या या मागणीला ब्राझिल, जपान आणि जर्मनी यांनी पाठिंबा दिला. परिषदेचा स्थायी सदस्य असलेल्या युनायटेड किंगडमनेही भारताच्या सुधारणा सूचनांना पाठिंबा देत ‘एक्स’वर पोस्ट केली. ‘सुरक्षा परिषद ही आजच्या जगाचे प्रातिनिधित्व करणारी असली पाहिजे. आम्ही त्याच्या विस्ताराचे समर्थन करतो आणि अधिक वैविध्यपूर्ण अन् प्रभावी परिषद पाहू इच्छितो. ‘ब्राझिल, जर्मनी, भारत आणि जपान यांना कायमस्वरूपी जागा अन् कायम प्रतिनिधित्व असावे’, असेही युनायटेड किंगडमने म्हटले.

संपादकीय भूमिका 

संयुक्त राष्ट्रांमध्ये काही ठराविक देशांचे प्राबल्य आहे, याला भारत आव्हान देत आहे. त्यामुळेच भारताच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, हेच यातून लक्षात येते !