पुणे येथे ‘कमांड हॉस्पिटल आणि लष्करामध्ये नोकरी देतो’ असे सांगून ४० तरुणांची २८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक !
पुणे – वानवडी येथील कमांड हॉस्पिटल आणि लष्कारांमध्ये विविध पदांवर नोकरी देण्याच्या आमिषाने ४० तरुणांची २८ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी कमांड हॉस्पिटलमधून निवृत्त झालेल्या विनायक कडाळे याला अटक करण्यात आली आहे. कोंढवा पोलीस आणि ‘मिलिटरी इंटेलिजन्स’ने (सैनिक गुप्तचर विभाग) संयुक्त कारवाई केली आहे. या प्रकरणी मार्केट यार्ड आणि कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या अजिंक्य गंधिले याने तक्रार केली होती. (आमीष दाखवून आर्थिक फसवणूक करणार्यांकडून तो पैसा सव्याज वसूल करून पीडितांना द्यावा ! – संपादक)
गंधिले हा नोकरीच्या शोधात होता. ओळखीतील अधिवक्त्यांकडून वर्ष २०२१ मध्ये त्याची ओळख कडाळे यांच्याशी झाली. कडाळे याने कमांड हॉस्पिटलमध्ये संगणक चालक, लेखनिक, माळी, विभाग (वॉर्ड) साहाय्यक, चौकीदार अशा विविध पदांवर भरती आहे, असे सांगितले. गंधिले याने ती माहिती मित्र आणि नातेवाईक यांना सांगितली. वर्ग ३ साठी ६० सहस्र आणि वर्ग ४ साठी ७० सहस्र रुपये अधिकोषातील खात्यांमध्ये भरण्यास सांगितले.
कडाळे याने बनावट भरती विज्ञापन, परीक्षेचे प्रवेशपत्र, तसेच इतर कागदपत्रे संबंधितांना दिली. ती कागदपत्रे पाहिल्यानंतर ती बनावट असल्याची गंधिले याच्या लक्षात आले. अधिक चौकशी केली असता वर्ष २०२२ मध्ये लिपिक पदावरून कडाळे सेवानिवृत्त झाल्याचे निदर्शनास आले. तेव्हा त्यांची आणि इतरांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली.
संपादकीय भूमिकाएवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक कशी होते ? समाजाला कायद्याचे भय नसल्याचे उदाहरण ! |