होळीसाठी कोकण रेल्वेमार्गावर ८ विशेष गाड्या

रत्नागिरी – मागील ३ दिवसांपासून कोकण रेल्वे प्रशासनाने होळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. आता त्यामध्ये नव्याने ८ विशेष गाड्या धावणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने घोषित केले आहे. या गाड्यांमध्ये रोहा ते चिपळूण मार्गावर ‘मेमू’ विशेष गाडीचाही समावेश करण्यात आला आहे.

कोकणात होळी सणाला अनेक मुंबईकर गावी येत असतात, याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवत ३० मार्च २०२४ पर्यंत मेमू लोकल ट्रेन रोहा ते चिपळूण मार्गावर एकूण २२ फेर्‍या करणार आहे. रोहा येथून ही गाडी ११ वाजून ०५ मिनिटांनी सुटेल आणि दुपारी १.३० वाजता ती चिपळूण स्थानकावर पोचेल. चिपळूण येथून ही गाडी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी सुटून दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी रोह्याला पोचेल. ८ डब्यांची ही अनारक्षित गाडी रोहा येथून पुढे दिव्यापर्यंत नियमितपणे चालवली जात असल्याने चिपळूण येथून या गाडीने दिव्यापर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे. याचसमवेत चिपळूणला येण्यासाठी ही गाडी रोहा येथून सुटण्याआधी सकाळी दिव्यावरून सुटत असल्याने चिपळूणला येतांनाही रोहा- चिपळूण असा मेमू लोकलने दिवा येथून चिपळूणपर्यंत थेट प्रवास करता येणार आहे.

या विशेष गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-थीवी-लोकमान्य टिळक टर्मिनस, पुणे-सावंतवाडी-पुणे, सावंतवाडी रोड-पनवेल-सावंतवाडी, लो. टिळक टर्मिनस- थीवी-लो. टिळक टर्मिनस, थीवी-पनवेल-थीवी, पुणे-थीवी-पुणे आणि थीवी-पनवेल, या गाड्यांचा समावेश आहे.