समष्टी सोहळे आध्यात्मिक आणि भावाच्या स्तरावर करण्याचे महत्त्व !
‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्येत श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशात विविध संघटनांनी विविध उपक्रम राबवले. त्यांतील काही उपक्रम आध्यात्मिक स्तरावर राबवले गेले. ‘समष्टी सोहळा आध्यात्मिक आणि भावाच्या स्तरावर केल्यावर त्याचा कसा परिणाम होतो ?’, याचे मी एका देवळात अनुभवलेले उदाहरण येथे दिले आहे.
१. एका देवळात सूक्ष्मातून अंधार जाणवणे
मी एका देवळात गेलो होतो. या देवळावर वाईट शक्ती सूक्ष्मातून करत असलेल्या आक्रमणांमुळे त्रासदायक शक्तीचे आवरण आले होते. त्यामुळे मला देवळात सूक्ष्मातून अंधार जाणवायचा.
२. अयोध्येत होणार्या श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त त्या देवळात श्रीरामाचा सामूहिक आणि भावपूर्ण नामजप केला गेल्यामुळे देवळातील सूक्ष्म अंधार न्यून होऊन चैतन्य वाढणे
अयोध्येत होणार्या श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्ताने त्या सोहळ्याच्या काही दिवस आधीपासून देवळात श्रीरामाचा नामजप लावून सामूहिक नामजपाचे आयोजन करण्यात आले होते. त्या देवळात सामूहिक नामजप चालू झाल्यावर दुसर्याच दिवशी मी त्या देवळात गेलो होतो. प्रत्यक्षात ते देऊळ वेगळ्या देवतेचे असूनही ‘आधीच्या तुलनेत त्या देवळावर आलेले त्रासदायक आवरण आणि त्यामुळे जाणवणारा अंधार ६० ते ७० टक्के न्यून झाला अन् देवतेच्या तत्त्वात वाढही झाली’, असे मला जाणवले.
३. सामूहिक नामजप थांबवल्यावरही पुढे ४ – ५ दिवस देवळातील चैतन्य टिकून रहाणे
श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत त्या देवळात श्रीरामाचा सामूहिक नामजप केला गेला. त्यामुळे देवळातील सूक्ष्म अंधार नाहीसा झाला होता आणि मला तिथे चैतन्य जाणवत होते. सामूहिक नामजप थांबवल्यानंतरही मला पुढे ४ – ५ दिवस तिथे चैतन्य जाणवत होते.
या प्रसंगातून ‘समष्टी सोहळे संतांच्या मार्गदर्शनानुसार आणि भावाच्या स्तरावर केले, तर त्याचे देवळांवर, पर्यायाने समाजावर आध्यात्मिक आणि दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होतात. त्यामुळे समाजाच्या सात्त्विकतेत वाढ होते’, असे मला शिकता आले.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा. (१.२.२०२४, दुपारी ४.४५ ते संध्याकाळी ५.०७)
|