पुणे येथील कसबा पेठेतील शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याचा वाद पुन्हा उफाळला !

दर्गा पाडणार अशी अफवा !

छायाचित्र सौजन्य : सकाळ
  • दर्गा परिसरात मोठ्या संख्येने मुसलमान जमा झाले !
  • परिसरामध्ये मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त !
  • २ दिवस पोलिसांच्या सुट्या रहित !

पुणे – कसबा पेठेतील ‘हजरत ख्वाजा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्या’च्या बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे, या माहितीमुळे ८ मार्चला मध्यरात्री दर्ग्याच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने मुसलमान जमा झाले होते. ‘ही अफवा आहे, दर्ग्यावर कोणतीही कारवाई होणार नाही’, असे पोलिसांनी सांगितल्यानंतर जमाव शांत झाला; परंतु परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे; परंतु या घटनेमुळे शहरातील हजरत ख्वाजा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याचा वाद पुन्हा उफाळून आला.

शहरातील कसबा पेठेतील या दर्ग्याच्या परिसरातील बांधकामांवरून न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार असल्याची चर्चा चालू होती. त्यामुळे मुसलमान मोठ्या संख्येने परिसरामध्ये एकत्रित आले. पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल आणि पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या संदर्भामध्ये फरासखाना पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मुसलमान समाजातील पदाधिकारी यांची बैठक रात्री विलंबाने झाली. ‘नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये’, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

छोटा दर्गा हजरत ख्वाजा शेख सल्लाहुद्दीन दर्गा विश्वस्तांचे निवेदन !

आम्ही प्रशासनाला साहाय्य करण्यास सिद्ध आहोत. छोटा शेख सल्ला दर्गा येथील नवीन मशीद मान्य नकाशाप्रमाणे जागेवर वाढीव/अनधिकृत वीट बांधकाम, दरवाजे, खिडक्या (गवाक्ष) निष्कासन करण्यासाठी आम्ही महापालिका आणि पोलीस प्रशासन यांसह चर्चा केल्यानंतर सदर वाढीव बांधकाम काढण्यास आम्ही सहमती देतो.  ते महापालिका आदेशाप्रमाणे आम्ही स्वत: निष्कासित करून देण्यास ट्रस्टची मान्यता आहे. हे बांधकाम पाडतांना वर्ष १९२७ च्या ‘गॅझेट’नुसार मशिदीच्या मूळ ढाच्याला इजा होता कामा नये. ३० मार्च २०१९ या दिवशी महापालिकेने ‘वर्क स्टॉप ऑर्डर’ दिली होती.

नेमका वाद काय ?

गेल्या अनेक वर्षांपासून पुण्येश्वर मंदिर आणि हजरत ख्वाजा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याचा वाद आहे. या मंदिराला लागूनच दर्गा आहे. पुण्यातील भुवनेश्वर मंदिराच्या भूमीवर दर्गा बांधल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी उघड केले आहे. त्यांच्याकडे या संदर्भातील सर्व कागदपत्रे आहेत, ज्यावरून मंदिराच्या भूमीवर दर्गा बांधल्याचे सिद्ध होते.

नेमका दावा काय ?

हजरत ख्वाजा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याच्या ठिकाणी ‘पुण्येश्वराचे मंदिर’ होते, असा दावा शिंदे यांनी केला आहे. अल्लाउद्दीन खिलजीचा बडा अरब नावाचा सरदार पुण्यावर चाल करून आला होता. त्या वेळी त्याने भगवान शंकराची पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही मंदिरे उद्ध्वस्त केली. एक मंदिर शनिवारवाड्यासमोर आहे, तर दुसरे मंदिर लाल महालाच्या पलीकडे कुंभारवाड्याच्या वेशीजवळ आहे. जिथे आज छोटा शेख दर्गा आहे. या सगळ्या मंदिरांवर मशिदी बनवण्यात आल्या आहेत, असे अजय शिंदे यांनी उघड केले आहे.