पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी आध्यात्मिक बळ देणारे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
१. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन ‘मौलिक संस्कारित नवग्रह सुरक्षा-कवच’ देण्याचे ठरवणे
‘मी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची सेवा करण्यासाठी नाशिक येथे होतो. ऑक्टोबर २०१८ मध्ये एकदा पहाटे ४ वाजता योगतज्ञ दादाजी मला म्हणाले, ‘‘आपल्याला पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायची आहे. मला त्यांना एक ‘मौलिक संस्कारित नवग्रह सुरक्षा-कवच’ द्यायचे आहे. ते चांगले कार्य करत आहेत. त्यांच्या हातून आणखी चांगले कार्य होईल. सध्या त्यांना आध्यात्मिक पाठबळाची आवश्यकता आहे. त्यांना दैवी पाठबळ दिल्याने त्यांच्यावर येणारी संकटे सौम्य होतील. मी वैकुंठाला जाण्यापूर्वी (देहत्याग करण्यापूर्वी) त्यांची भेट घेऊन त्यांना कवच देऊया.’’ योगतज्ञ दादाजी पहाटेच्या वेळी ध्यानातून दैवी शक्तींशी सूक्ष्मातून संवाद करत असत. ‘योगतज्ञ दादाजी यांना दैवी शक्तींकडून श्री. नरेंद्र मोदी यांना सुरक्षा कवच देण्याविषयी संदेश आला असावा’, असे मला वाटले.
२. ‘श्री. नरेंद्र मोदी यांच्या जीविताला कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये, तसेच ते करत असलेल्या कार्याला भक्कम दैवी पाठबळ मिळावे’, या उद्देशाने त्यांना ‘मौलिक संस्कारित नवग्रह सुरक्षा-कवच’ सिद्ध करण्यासाठी योगतज्ञ दादाजी यांनी स्वतःचे पुष्कळ दैवी बळ वापरले होते.
३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या वयाचा विचार करून देहली येथे भेटण्याच्या ऐवजी कल्याण येथे भेट घेण्याचे ठरवणे
योगतज्ञ दादाजी यांच्या एका साधकाने श्री. नरेंद्र मोदीजी यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. ‘श्री. नरेंद्र मोदी आणि योगतज्ञ दादाजी यांची भेट होईल’, असा पंतप्रधान कार्यालयातून निरोप आला. खरे तर त्या दोघांची भेट देहली येथे होणार होती; मात्र ‘योगतज्ञ दादाजी यांचे वय (वय ९९ वर्षे) पहाता त्यांनी एवढ्या लांबचा प्रवास करण्यापेक्षा श्री. मोदी जेव्हा मुंबई येथे येतील, तेव्हा योगतज्ञ दादाजी यांना भेटतील’, असा निरोप आम्हाला मिळाला. ‘श्री. मोदी यांच्यातील इतरांचा विचार करणे’, हा गुण लक्षात आला. ‘श्री. नरेंद्र मोदी कल्याण येथे एका प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला येणार आहेत. तेव्हा कल्याण येथेच त्यांची भेट होईल’, असा पंतप्रधान कार्यालयातून आम्हाला निरोप आला.
४. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली भेट
४ अ. योगतज्ञ दादाजी यांनी ‘२०१४ या वर्षी नरेंद्र नामक व्यक्ती भारताचा पंतप्रधान होणार’, असे भाकित लिहिलेला कागद आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक नरेंद्र मोदी यांना देणे : १८.१२.२०१८ या दिवशी कल्याण येथे एका प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या वेळी एका खोलीत योगतज्ञ दादाजी आणि श्री. नरेंद्र मोदी यांची भेट झाली. श्री. नरेंद्र मोदी यांनी योगतज्ञ दादाजी यांना नम्रतेने नमस्कार केला. त्यांनी योगतज्ञ दादाजी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. योगतज्ञ दादाजी यांनी वर्ष २००३ मध्ये भाकित लिहिले होते की, ‘२०१४ या वर्षी श्री. नरेंद्र नामक व्यक्ती भारताचा पंतप्रधान होईल.’ त्या भाकिताचा कागद आणि दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त योगतज्ञ दादाजी यांनी श्री. मोदी यांना दिले. तेव्हा श्री. मोदी योगतज्ञ दादाजी यांना म्हणाले, ‘‘मी तुमच्याविषयी वाचले आहे.’’
४ आ. योगतज्ञ दादाजी यांनी नरेंद्र मोदी यांना पुष्कळ कार्य करण्यासाठी ‘संस्कारिक मौलिक नवग्रह सुरक्षा-कवचा’च्या माध्यमातून आशीर्वाद देणे : योगतज्ञ दादाजी यांनी श्री. नरेंद्र मोदी यांना ‘संस्कारित मौलिक नवग्रह सुरक्षा-कवच’ जवळ बाळगायला दिले. श्री. मोदी यांनी ते कवच भावपूर्ण स्वीकारले. ते योगतज्ञ दादाजी यांना म्हणाले, ‘‘मला पुष्कळ कार्य करायचे आहे. मला आशीर्वाद द्या.’’ तेव्हा योगतज्ञ दादाजी म्हणाले, ‘‘या कवचाच्या माध्यमातून तुम्हाला आशीर्वाद दिला आहे.’’
४ इ. ‘मोठे दायित्व सांभाळण्यासाठी देवच शक्ती देतो’, असे नरेंद्र मोदी यांनी सांगणे : अनौपचारिक बोलणे झाल्यानंतर योगतज्ञ दादाजी यांनी श्री. मोदी यांना विचारले, ‘‘तुम्ही एवढे मोठे दायित्व कसे सांभाळता ?’’ तेव्हा श्री. मोदी म्हणाले, ‘‘देवच मला शक्ती देतो. मी पहाटे लवकर उठून नियमित योगासने, प्राणायाम आणि साधना करूनच पुढील कामे करतो.’’
४ ई. योगतज्ञ दादाजींचे श्रेष्ठत्व जाणणारे नरेंद्र मोदी ! : आमचे सर्व बोलणे झाल्यानंतर तेथून निघतांना मी श्री. नरेंद्र मोदी यांना वाकून नमस्कार केला. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘मला नमस्कार न करता यांना (योगतज्ञ दादाजींकडे पाहून) नमस्कार करा.’’
५. ‘वर्ष २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी बहुमताने निवडून येतील’, असे सांगणारे द्रष्टे योगतज्ञ दादाजी वैशंपायन !
२०.५.२०१९ या दिवशी वयाच्या १०० व्या वर्षी योगतज्ञ दादाजी यांनी देहत्याग केला. त्यांनी देहत्याग केल्याच्या १ आठवडा आधी ते मला म्हणाले होते, ‘‘आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत श्री. नरेंद्र मोदी बहुमताने निवडून येतील.’’ योगतज्ञ दादाजी यांच्या देहत्यागानंतर म्हणजे २३.५.२०१९ या दिवशी लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. श्री. नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला (भाजपला) बहुमत मिळाले. योगतज्ञ दादाजी द्रष्टे संत होते. त्यांची वाणी सत्य ठरली.
६. योगतज्ञ दादाजी यांनी देहत्याग केल्यानंतर पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी स्वतः पत्र लिहून (२२.५.२०१९) शोक व्यक्त केला आणि योगतज्ञ दादाजी यांच्या दैवी कार्याचा गौरव केला.
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी आध्यात्मिक बळ देणार्या योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.१.२०२४)
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले आशीर्वाद फलद्रूप होत असणे१८.१२.२०१८ या दिवशी योगतज्ञ दादाजी यांनी नरेंद्र मोदी यांना सुरक्षा कवचाच्या माध्यमातून दिलेले दैवी पाठबळ आता सत्यात उतरतांना दिसत आहे. पंतप्रधान मोदी ‘राष्ट्राचे हित आणि राष्ट्राची प्रगती’ यांसाठी चांगले निर्णय घेत आहेत अन् जगामध्ये भारताचे श्रेष्ठत्व सिद्ध होत आहे. – श्री. अतुल पवार |