बंगाल राज्यातील संदेशखाली : नौखालीची पुनरावृत्ती रोखणार कोण ?

आणखी किती महिलांवर अत्याचार आणि किती हिंदूंच्या हत्या झाल्यावर बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाणार आहे ?

आक्रोश करतांना महिला

गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमध्ये बंगाल येथील २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखाली भागातील घडामोडींच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. संदेशखाली येथील महिलांवर झालेले भयावह अत्याचार ऐकून देशाला धक्का बसला. अजूनही देशात असा भाग आहे की, जेथे महिलांचे जीवन नरकासमान करणारे वासनांध आणि त्याला मान्यता देणारी व्यवस्था कार्यरत आहे. यावर प्रथम कुणाचा विश्वास बसत नव्हता; मात्र हे घडलेले आहे आणि ते भीषण सत्य आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

छत्रपती शिवरायांप्रमाणे कोण साहाय्याला  येणार, याची बंगालमधील जनतेला प्रतीक्षा !

बंगालमध्ये संदेशखालीचे प्रकरण उघडकीस आले, संबंधितांना आता अटक होत आहे, त्यांच्यावर खटला चालणार, त्यांच्यावरील आरोप सिद्ध होतील आणि त्यांना शिक्षा होणे, यामध्ये बराच काळ जाईल. राजकीय हिंसाचारामुळे हिंदु महिलांचे आणि त्यातही भाजपच्या काही कार्यकर्त्या, पदाधिकारी यांचे जीवन खडतर बनले आहे. केंद्र सरकार बंगालमध्ये थेट आणि धडक कारवाई करण्यास कचरते आहे का ? अशा वेळी हिंदु महिला, मुली, हिंदु पुरुष यांचे रक्षण कसे होणार ? कधी कोणती वाईट घटना कुणाच्या संदर्भात होईल ? याची टांगती तलवार आहे. बंगालमध्ये अन्य कुठे अशा अत्याचारांच्या घटना घडत असतील, तर त्या सध्या तरी उघड झालेल्या नाहीत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून रक्षणाची अपेक्षाच नाही; कारण त्यांचेच गुंड आहेत. अशा वेळी हिंदूंना वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत कोण उभा रहाणार ? याची प्रतीक्षा बंगालमधील जनता करत आहे !

– श्री. यज्ञेश सावंत

सत्य लपवण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचे प्रयत्न !

संदेशखाली येथील महिलांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर अत्यंत चीड आणणारी कहाणी बंगाली भाषेत सांगितल्यावर काही प्रसारमाध्यमांनी धैर्य दाखवले आणि ते संदेशखाली भागात पोचले; मात्र ममता बॅनर्जी यांची दडपशाही केवढी आणि स्वपक्षाच्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न केवढे ! त्यांनी संदेशखाली गावात जाणार्‍या रस्त्यावर मोठे बॅरिकेट्स लावून, रस्त्यावर लोखंडी अडथळे ठेवून रस्ताच बंद केला. गावात प्रवेश करणार्‍या पत्रकाराला पोलिसांनी बळेच तेथून हुसकावून नेत अटक केली.

संदेशखाली येथील महिला या बहुतांश ग्रामीण आणि दलित आहेत. त्यांचे प्रसारमाध्यमांसमोर त्यांचे अत्याचार सांगण्याचे धाडस केले, यातून किती दिवस त्यांनी हे अत्याचार सहन केले असतील ? याची कल्पना करता येणार नाही ! ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदा ‘संदेशखाली हा संघाचा गढ आहे, या महिला भाजपच्या आहेत’, अशी महिलांच्या अत्याचारांच्या जखमेवर मीठ चोळणारी विधाने केली. एक महिला असूनही येथील महिलांचे दु:ख समजत नाही आणि वर त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जातो, यातून ममता बॅनर्जी यांची रवानगी कारागृहात करण्याची वेळ आली आहे, हे लक्षात येते. देशभर याविषयी आवाज उठवल्यावर आणि ममता बॅनर्जी यांच्यावर टीका झाल्यावर त्यांनी शाहजहान याला ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या अहवालानुसार महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये बंगाल राज्य भारतात आघाडीवर आहे.

– श्री. यज्ञेश सावंत

१. नौखालीतील हिंदु महिलांवर पाशवी अत्याचार !

श्री. यज्ञेश सावंत

बंगालमधील नौखालीमध्ये मुसलमानांना हिंदूंविरुद्ध ‘थेट कृती’ (डायरेक्ट ॲक्शन) करण्याचे आदेश महंमद अली जिना यांनी वर्ष १९४६ च्या ऑगस्ट मासामध्ये दिले होते. या वेळी मुसलमानांची क्रूरता, पशूता, हिंस्रपणा काय असतो, याचा हिंदूंना मोठा धडा मिळाला. हिंदु पुरुष, मुले यांची घराघरांत घुसून कत्तल करण्यात आली, तर हिंदु मुली-महिला यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आले. मुसलमान गुंडांनी नौखालीचा ताबा घेतल्यासारखेच झाले होते. हिंदूंची संपत्ती, घरे यांचा ताबा मुसलमान गुंडांनी घेतला होता, त्यांचे राज्य असल्यासारखेच झाले होते. त्यामुळे धान्य, जीवनावश्यक वस्तू यांसाठी हिंदु स्त्रियांना मुसलमानांकडे पदर पसरावा लागे आणि मुसलमानांचे अत्याचार सहन करून त्या मोबदल्यात धान्य घ्यावे लागे. एवढी भीषण परिस्थिती तेव्हा नौखालीतील हिंदु स्त्रियांनी अनुभवली. अगदी त्याच काळ्याकुट्ट दिवसांची आठवण संदेशखालीतील महिलांवरील अत्याचारांच्या निमित्ताने आली. दुसरे नौखालीच या ठिकाणी घडत आहे.

२. घटना कशी उघडकीस आली ?

रेशन घोटाळ्याशी संबंधित चौकशी करण्यासाठी आणि धाड टाकण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाचे पथक तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी शाहजहान शेख याच्या घरी बंगाल येथील संदेशखालीमध्ये पोचले. या वेळी शाहजहान शेख याच्या घरी चौकशी करण्यासाठी पथक पोचल्यावर तेथे मोठ्या संख्येने, म्हणजे ८०० ते १००० या संख्येने गुंड आणि स्थानिक लोक जमले अन् त्यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या पथकावर आक्रमण केले. या अधिकार्‍यांना मारहाण केली, त्यांच्या वाहनांची तोडफोड केली आणि त्यांना पिटाळून लावले. अधिकार्‍यांसाठी हे सर्व अनपेक्षित होते. या घटनेनंतर येथील काही महिला दबकत आल्या आणि वरील घटनेचे वार्तांकन करणार्‍यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी त्यांच्यावर बेतलेले प्रसंग सांगू लागल्या. या महिला दलित हिंदू असून त्यांच्यावरील अत्याचारांचा पाढाच त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर वाचून दाखवला.

३. महिलांवर अनन्वित अत्याचार !

शाहजहान शेख आणि त्याच्या समर्थकांनी या महिलांची भूमी बळकावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. शाहजहान शेख याचे गुंड रात्री येथील ग्रामस्थांच्या घरी येत आणि घरातील सुना, मुली यांना घेऊन जात अन् रात्रभर अत्याचार करून सकाळी सोडून देत. काही तरुण मुलींना तर अनेक दिवस त्यांच्या तावडीत ठेवत आणि या महिलांच्या शब्दांमध्ये सांगायचे, तर ‘या गुंडांचे मन भरत नाही, तोपर्यंत मुली-स्त्रिया यांना त्यांच्या तावडीतून सोडत नसत.’ शेख याचे गुंड कोणत्या घरात सुंदर स्त्रिया आहेत, यावर लक्ष ठेवत आणि रात्री त्यांना घरातून उचलून नेत. मुली आणि महिला यांच्यावर हे अत्याचार अनेक दिवस चालू होते. महिलेच्या पतीने तक्रार केली, तर त्याला ‘तुझा तिच्यावर काहीही अधिकार राहिलेला नाही’, असे सांगितले जाई.

शाहजहान शेख हा तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी आणि त्याचे गुंड केवळ महिलांचे शोषणच करायचे नाही, तर परिसरातील मनरेगाच्या (ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या) माध्यमातून गरीब आदिवासी कामगारांना मिळणारे वेतन लुबाडायचे. कुणाकडे पैसे शिल्लक राहिले नाहीत, तर ते उधारी घेण्यासाठी बाध्य करायचे. शेख परिसरातील लोकांच्या भूमी अवैधपणे ताब्यात घ्यायचा. तक्रारकर्त्यांनी राष्ट्रीय आदिवासी आयोगाचे उपाध्यक्ष अनंत नायक यांच्या नेतृत्वाखालील ३ सदस्यांच्या गटाला सांगितले की, बंगाल पोलिसांचा शेख आणि त्याच्या साथीदारांना पाठिंबा आहे. त्याच वेळी नायक यांनी सांगितले की, शाहजहान आणि त्याच्या गुंडांकडून महिलांचा लैंगिक छळ अन् भूमी बळकावल्याच्या ५० हून अधिक तक्रारी आल्या आहेत.

ममता बॅनर्जी

४. निवडणुकांमध्येही हिंसाचार !

वर्ष २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या हिंसाचारात हिंदूंना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आले. तृणमूल ऐवजी भाजपला मतदान करणार्‍यांची घरे जाळणे, प्रतिदिन हिंदु मुलींवर बलात्कार करणे आणि त्यांची हत्या करणे या घटना समोर येत आहेत. मालदा येथून काही मुलींचे अर्धनग्न स्थितीत मृतदेह सापडले आहेत. ‘इंडिया’ आघाडीचा घटक पक्ष आणि तृणमूल काँग्रेसचा मित्र पक्ष असणार्‍या काँग्रेसनेच बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे. यातून संदेशखाली येथे किती भयानक परिस्थिती असेल ? हे लक्षात येते.

५. बंगाल येथील राजकीय हिंसा !

राजकीय हिंसेसाठी बंगाल अधिकाधिक कुप्रसिद्ध होत आहे. १९६० च्या दशकात बंगालमध्ये काँग्रेस सत्तेत होती. त्यानंतर तेथे साम्यवादी (कम्युनिस्ट) पक्षाला समर्थन मिळू लागल्यावर काँग्रेसने साम्यवादी पक्षातील, म्हणजे विरोधकांच्या हत्या करणे चालू केले. काँग्रेसने एवढा विरोध करूनही साम्यवादी पक्ष सत्तेत आला आणि त्यानंतर पक्षाचे नेते अन् कार्यकर्ते यांनी काँग्र्रेसच्या संदर्भात हाच कित्ता गिरवण्यास चालू केले. जेथे काँग्रेसचे समर्थक आणि कार्यकर्ते आहेत त्यांना धमकावून साम्यवादी पक्षाचे काम करण्याची, समर्थन देण्याची मागणी केली जाई. यामध्ये सैनबरी हत्याकांडाची एक धक्कादायक घटना घडली होती. ज्यामध्ये एकाच कुटुंबातील काँग्रेसच्या३ कार्यकर्त्यांची हत्या करून त्यांचा रक्तमिश्रित भात या कार्यकर्त्यांच्या आईला खायला दिला होता. एवढा साम्यवाद्यांचा उद्दामपणा होता.

आंदोलनकर्त्यांनी केलेली जाळपोळ

दुसरे महाभीषण हत्याकांड म्हणजे मरीचझापी हत्याकांड ! भारताच्या फाळणीच्या वेळी हिंदु लोक पूर्व पाकिस्तानातून, म्हणजे सध्याच्या बांगलादेशातून पळून बंगालमध्ये सुंदरबनातील मरीचझापी या बेटावर स्थायिक झाले होते. साम्यवादी पक्षाने ठरवले की, या लोकांना पुन्हा पाकमध्ये पाठवून द्यायचे. पूर्व पाकिस्तानमध्ये हिंदूंसाठी भयावह परिस्थिती असल्याने या लोकांनी ‘ते पुन्हा पाकमध्ये जाणार नाही’, असे सांगितले. तेव्हा साम्यवादी पक्षाने हिंसेचे उग्र स्वरूप दाखवले. त्यांनी या लोकांसाठी असलेल्या एकमेव जलस्रोतात विष मिसळले. त्यामुळे सहस्रो लोक मृत्यूमुखी पडले. कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या माध्यमातून हिंदूंवर आक्रमण केले, ज्यामध्ये १ सहस्र ७०० हून अधिक हिंदूंच्या हत्या केल्या. महिलांवर अत्याचार केले. वर्ष १९७९ मध्ये ही घटना घडली. एकूण मृत हिंदूंची संख्या १० सहस्र सांगितली जाते; मात्र सरकारी नोंदीमध्ये अत्यंत नगण्य नोंदी आहेत. हे हिंदू दलित आणि मागास वर्गातील होते. साम्यवाद्यांच्या हिंसेचा क्रूर चेहरा यानिमित्ताने लक्षात येतो.

एकेकाळी बंगाल उद्योगाचे केंद्र होते आणि बुद्धीमान अन् हुशार व्यक्तींसाठी ओळखले जाई. आज परिस्थिती तशी नाही. तेथील उद्योग हळूहळू अन्यत्र स्थलांतरित झाले आहे. परिणामी बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्याऐवजी राजकीय पक्ष त्यांना कार्यकर्ते बनवून राजकीय विरोधकांवर आक्रमणे करण्यात प्रवृत्त करत आहेत, म्हणजेच गुंडगिरीचा उद्योग राजकीय पक्षांनीच चालू केला आहे.

६. हिंसाचारात एकाहून एक वरचढ पक्ष !

साम्यवाद्यांच्या एवढ्या दडपशाहीच्या राजवटीत वर्ष २०११ मध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या आहेत, म्हणजे त्या किती आक्रमक असतील, हे लक्षात येते. जो पक्ष सत्तेवर येतो, तो पहिल्या पक्षापेक्षा अधिक हिंसाचारी आणि आक्रमक होतो, हा बंगालचा इतिहास आहे. ममता बॅनर्जी सत्तेवर आल्यावर प्रथम साम्यवाद्यांच्या आणि भाजप एक पर्यायी पक्ष म्हणून उदयास येत असतांना अगदी अलीकडच्या ३ ते ४ वर्षांत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या वाढल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मते ३०० हून अधिक भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. वर्ष २०२१ च्या विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळी भाजपच्या ३०० हून अधिक कार्यकर्त्यांना राजकीय हिंसेमुळे घरे सोडून पलायन करावे लागले होते, जे अद्यापही घरी जाण्यास भीत आहेत. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांवर काही ठिकाणी बंधक बनवून रात्रभर सामूहिक बलात्कार करून त्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राज्यात काहीही करण्याचे स्वातंत्र्य मिळाल्याप्रमाणे ते वागतात. पोलीस काही कारवाई करत नाहीत, अशी दुःस्थिती आहे.

७. शाहजहान याची बडदास्त

शाहजहान शेख हा ५५ दिवस फरार होता. त्याला अटक केल्यानंतर पोलीस त्याला अशा प्रकारे घेऊन जात होते की, तो एक गुंड नसून उलट पोलीस संरक्षण घेतलेली कुणी मोठी व्यक्ती आहे. एवढी गंभीर आरोप असलेली व्यक्ती बंगालमध्ये सहज पसार होते आणि अनेक दिवस पोलिसांच्या तावडीत सापडत नाही, यातूनच पोलीसच त्याचे संरक्षण करत होते, असा अर्थ झाला.

त्याला अटक केल्यानंतर त्याचे अधिवक्ता लागलीच जामीन घेण्यासाठी न्यायालयात पोचल्यावर कोलकाता उच्च न्यायालयाने टिप्पणी नोंदवली आहे, ‘शाहजहान शेख याच्याविरुद्ध ४३ खटले प्रविष्ट आहेत. ही व्यक्ती तुम्हाला पुढील १० वर्षे व्यस्त ठेवेल. त्याला आम्ही कोणतेही सौजन्य दाखवू शकत नाही.’ न्यायालयाच्या या टिप्पणीवरून न्यायालयाने शाहजहान याच्या गुन्ह्याचे गांभीर्य त्याच्या अधिवक्त्यांना लक्षात आणून दिले आहे.

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल (४.३.२०२४)