संपादकीय : मोदी यांचा काश्मीर दौरा !
एखाद्याचे मन जिंकणे ही काही सोपी गोष्ट नव्हे, त्यातही जर एखादी व्यक्ती दुर्लक्षित किंवा अत्याचारग्रस्त असेल, तर तिच्या हृदयात आपले स्थान निर्माण करणे, हे तर अवघडच काम आहे; पण हीच गोष्ट साध्य केली आहे, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ! ७ मार्च या दिवशी श्रीनगरमध्ये त्यांची मोठी सभा पार पडली. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभा यशस्वी केली. इतका मोठा जनसागर केवळ मोदी यांच्या सभेसाठी लोटला होता. या सभेच्या माध्यमातून मोदी यांनी जम्मू-काश्मीरवासियांची मने जिंकून घेतली आहेत. ‘काश्मिरी लोकांची मने जिंकणे, हे माझे ध्येय होते. त्या प्रयत्नांमध्ये मी यशस्वी झालो. आता उदयास आलेले जम्मू-काश्मीर हे देशभरातील प्रत्येकाचे स्वप्न होते. ते आता पूर्ण झाले’, असे मोदी यांनी सांगितले. सीमावर्ती भागाला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हे ऑगस्ट २०१९ मध्ये रहित केल्यानंतर त्यांनी प्रथमच येथे भेट दिली. ५ वर्षांनंतर भेट देऊनही जनतेच्या मनात मोदींप्रती पुष्कळ आदर आहे. कलम ३७० रहित करणारे आणि त्यानंतर जम्मू-काश्मीरची पुनर्रचना करणारे पंतप्रधान मोदी हे पहिलेच असल्याने तेथील जनता त्यांना मानते; कारण त्यांच्यामुळेच आज जम्मू-काश्मीरला चांगले दिवस पहायला मिळत आहेत. जम्मू-काश्मीर आता मोकळा श्वास घेत आहे. लडाख, जम्मू आणि काश्मीर यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि ते वाढूही लागले आहे. ‘कलम ३७० रहित झाल्यामुळे एक प्रकारे अखंड भारताची निर्मिती झाली आहे’, असे म्हणता येईल. तेथे असणारे पश्चिम पाकिस्तानी निर्वासित लोक हे हिंदु आणि शीख समुदायांचे सदस्य आहेत. वर्ष १९४७ च्या फाळणीनंतर पाकिस्तानच्या पश्चिम पंजाबमधील सियालकोटमधून ते येथे स्थलांतरित झाले होते. त्यांनाही मोदींनी पुष्कळ सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांना आता मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादाला खतपाणी घालणार्या आणि भारतविरोधी प्रचाराला चालना देणार्या पाकिस्तान समर्थक फुटीरतावादी संघटना ‘तहरीक-ए-हुरियत’ हिच्यावर केंद्राने बंदी घातली आहे. ही परिस्थिती देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने निर्णायक ठरत आहे.
कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला. अमरनाथला जाण्यासाठी यात्रेकरूंनी गर्दी केली. अनेकांनी विवाहासाठी योग्य ठिकाण (‘वेडिंग डेस्टिनेशन’) म्हणून काश्मीरचा पर्याय निवडला आहे. जम्मू-काश्मीरच्या नागरिकांनी गेल्या ७० वर्षांत फुटीरतावाद, आतंकवाद, भ्रष्टाचार यांसह अनेक समस्यांना तोंड दिले. जनता त्या समस्यांमध्ये भरडली जात होती. त्यांनी इतक्या वर्षांत मनात बाळगलेल्या, तसेच अपूर्ण राहिलेल्या त्यांच्या स्वप्नांची आता लवकरच पूर्तता होईल.
मोदींचे कुटुंब !
केवळ स्वतःच्या कुटुंबाचा विचार करून आतापर्यंत राजकारण करणार्यांवर मोदी यांनी त्यांच्या सभेत टीका करून अशांचा स्वार्थीपणा सर्वांसमोर उघड केला. श्रीनगर येथील मोदी यांच्या सभेला उपस्थित न रहाण्यासाठी काही मोदीद्वेष्ट्यांनी तेथील नागरिकांना संपर्क करून धमकी दिली होती; पण नागरिकांनी विरोध किंवा धमकी यांना न जुमानता मोदी यांच्या सभेला भरभरून प्रतिसाद दिला.
मोदी येणार; म्हणून तेथील रस्त्यांवर त्यांच्या आगमनाचे मोठमोठे होर्डिंग लावले होते. ‘मोदी आएंगे दिलो मे छाएंगे’, असे गाणेही काहींनी म्हटले. काही काश्मिरी लोक तर ‘आम्ही मोदींच्या कुटुंबातील आहोत’, ‘आमचे मोदी कुटुंब आहे’, असे सांगून मोदी यांची प्रशंसा करत होते. ‘आम्हालाही मोदी यांच्याप्रमाणे व्हायचे आहे’, अशा शब्दांतही काहींनी त्यांचे मत व्यक्त केले. काही लहान मुले त्यांना ‘नरेंद्रआजोबा’ असे संबोधतात. आतापर्यंत ‘पंतप्रधान’ या पदाला कर्तृत्वापेक्षा केवळ प्रसिद्धीचे वलय असायचे; पण मोदी यांच्या संदर्भात तसे नाही. त्यांनी स्वतःला जगप्रसिद्ध केलेले नाही, तर त्यांचे कार्यकर्तृत्व, राष्ट्राभिमान यांमुळे भारतियांनीच त्यांना जगप्रसिद्ध केले आहे. ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. भारत हे मोठे कुटुंब आहेच, त्यातही मोदींना कुटुंब मानणे, हा प्रत्येक भारतियाच्या मनाचा मोठेपणाही आहे. मोदींनी इतका जिव्हाळा निर्माण केला आहे की, प्रत्येक नागरिकाच्या मनात त्यांच्याविषयी आदरभाव आहे. आतापर्यंत अनेक पंतप्रधान होऊन गेले; पण भारतियांच्या मनामनांत स्थान प्राप्त करणे, हे कुणालाच जमले नाही, जे मोदींनी करून दाखवले आणि अजूनही दाखवत आहेत; म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी या यथाेचित गौरवास पात्र आहेत. अशांत काश्मीरला शांतता आणि समृद्धी यांच्या मार्गावर आणून मैलाचा दगड पार करणे, हे केवळ मोदींमुळेच शक्य होऊ शकले. आजपर्यंत ज्या भागात बंदुकीचे प्रस्थ होते, जाचक रूढी-परंपरा यांच्या बेड्या होत्या, त्या जोखडातून नागरिक आता मुक्त झाले आहेत. एकूणच काय, तर मोदींनी विकासाचा जागर केल्यामुळे तेथील नागरिकांच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला आहे. जे मोदी यांनी केले, त्या दृष्टीने लोकप्रतिनिधी, मंत्री, आमदार, खासदार अशा सर्वांनीच विचार करून राष्ट्रहितार्थ कृतीशील व्हायला हवे !
भारताला तोडणारी काँग्रेस !
मोदींच्या सभेनंतर सर्वांमध्येच नव्या जम्मू-काश्मीरचे आकर्षण निर्माण झाले आहे. जम्मू-काश्मीरची उत्तरोत्तर प्रगती होईल, ते राज्य येत्या काही काळात विकसित म्हणून उदयास येईल, यात शंका नाही. असे असले, तरी काश्मीरने आतापर्यंत जे काही भोगले किंवा सहन केले, ते सर्वांसमोर उघड व्हायला हवे. यासाठीही सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. तसे झाल्यासच खर्या अर्थाने जम्मू-काश्मीरला न्याय मिळेल. जम्मू-काश्मीरच्या माध्यमातून भारताची अखंडता टिकवून ठेवण्याचे महत्कार्य मोदी करत आहेत. त्यात त्यांना यशही मिळत आहे. हे सर्व ते एकटे साध्य करू शकले; पण काँग्रेसने अखंडत्व टिकवणे दूरच, भारताला तोडण्यासाठीही अन्य राष्ट्रांचे साहाय्य घेतले. यावरूनच काँग्रेसच्या भारतद्वेषाच्या तीव्रतेची कल्पना येते. मोदींच्या राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात अडथळा आणणारे, त्यांना विरोध करणारे, धमकी देणारे असे अनेक जण अस्तित्वात आहेत. विरोधकांची ही साखळी नष्ट करायला हवी. तसे झाल्यासच मोदींच्या राष्ट्रकार्याची व्यापकता आणखी वृद्धींगत होईल आणि त्यांचा नावलौकिक वाढेल !
भारताची अखंडता टिकवण्यासाठी प्रयत्नरत असणार्या पंतप्रधानांप्रमाणे सर्वांनीच राष्ट्रहितार्थ कृतीशील व्हावे ! |