सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले, ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे मूळचे वडूज (जि. सातारा) येथील आणि आता रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणारे श्री. अरविंद कुलकर्णी (वय ८३ वर्षे) !
‘माझे वडील श्री. अरविंद कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ८३ वर्षे) आणि आई सौ. सरस्वती कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७६ वर्षे) हे दोघेही आता आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. मी आणि माझा भाऊ राहुल कुलकर्णी आधीपासूनच आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहोत. मला माझ्या वडिलांविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
१. शांत आणि स्थिर
‘आमच्याकडून बाबांची एखादी गोष्ट करायला उशीर झाला किंवा आम्ही विसरलो, तर त्यांनी आम्हाला रागावून किंवा मोठ्या आवाजात त्याविषयी सांगितले, असे कधीच झाले नाही. आताही त्यांच्या मांडीच्या हाडाचा अस्थीभंग होऊन ३ आठवडे झाले आहेत. विविध अडचणींमुळे लगेच त्यांचे शस्त्रकर्म झाले नाही, तरीही बाबा स्थिर आहेत. ते शांत राहूनच बोलतात. हा त्यांचा फार मोठा आध्यात्मिक गुण आहे. परिस्थितीसमोर मी बर्याच वेळा हतबल होते; पण माझे बाबा आणि माझी आई (सौ. सरस्वती कुलकर्णी, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७६ वर्षे) स्थिर असतात.
२. मुलांकडून अपेक्षा नसणे
बाबांना ‘आपण इतकी वर्षे मुलांना सांभाळले. आता आपल्या म्हातारपणात मुलांनी आपल्याला सांभाळायला हवे’, ‘मुलांनी आपली सेवा करायला हवी’, अशी कुठलीच अपेक्षा नाही.
३. अल्प अहं
तीन मासांपूर्वी माझे बाबा तोल गेल्यामुळे पडले. त्यांची सेवा करतांना एक दिवस बाबांनी राहुलची (माझ्या भावाची) क्षमा मागितली. त्यांचे राहुलशी झालेले बोलणे येथे दिले आहे.
श्री. अरविंद कुलकर्णी (बाबा) : माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो. तुम्हाला माझी सेवा करावी लागते. त्यामुळे तुमची आश्रमातील सेवा होत नाही. मला क्षमा करा.
राहुल : तुम्ही आम्हाला लहानपणापासून सांभाळले. तेव्हा तुम्हाला त्रास झाला का ? नाही ना. तसा आम्हालाही तुमची सेवा करतांना त्रास होत नाही.
श्री. अरविंद कुलकर्णी (बाबा) : त्या वेळी झालेला त्रास गंगेला मिळाला.
राहुल : आताही आम्ही तुमची सेवा गंगेला देण्यासाठीच करत आहोत.
बाबांच्या मनात ‘म्हातारपणात मुलांनी आपल्याला सांभाळायला हवे’, हे त्यांचे कर्तव्य आहे’, असे कुठलेच विचार नसतात.
४. भाव
४ अ. अन्नाप्रती असलेला भाव : भाताचे एखादे शीत खाली पडले किंवा लादीवर एखादा अन्नाचा कण दिसला, तरी ते लगेचच आम्हाला तो उचलायला सांगतात. ‘अन्नाचा एखादा कणही पायाखाली जाऊ नये’, असा त्यांचा आग्रह असतो. ते म्हणतात, ‘‘आपल्याला हे भाताचे एक शीत आहे’, असे वाटते; पण शेतकर्याने ते पिकवण्यासाठी आणि नंतर ते आपल्यापर्यंत येण्यासाठी बर्याच जणांनी पुष्कळ कष्ट घेतलेले असतात.’’
४ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव
४ आ १. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्रमातच रहायला सांगितले असल्यामुळे ‘आश्रम सोडून कुठेही जाणार नाही !’, असे वडिलांनी सांगणे : माझे बाबा नेहमी म्हणतात, ‘‘प.पू. डॉक्टरांनी आम्हाला (आई-बाबांना) रामनाथी आश्रमात बोलावले आहे आणि आश्रमातच रहायला सांगितले आहे. त्यामुळे आम्ही कुठेही जाणार नाही. त्यांच्या इच्छेनुसार आम्ही आश्रमातच रहाणार. आश्रमातील सर्व जण आमची काळजी घेतात.’’
४ आ २. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना निरोप दिल्याप्रमाणे ४ दिवसांनी लगेच आश्रमात परत येणारे श्री. अरविंद कुलकर्णी ! : मागील साधारण ४ वर्षांपासून माझे आई-बाबा रामनाथी आश्रमात रहात आहेत. जुलै २०२३ मध्ये आम्ही सर्व जण माझ्या बहिणीकडे वडूज (जिल्हा सातारा) येथे ४ दिवस रहायला गेलो होतो. तेव्हा माझी बहीण आणि नातेवाईक आई-बाबांना अजून थोडे दिवस रहाण्यासाठी आग्रह करत होते. तेव्हा बाबा बहिणीला म्हणाले, ‘‘मी प.पू. डॉक्टरांना ४ दिवसांनी परत येतो’, असा निरोप देऊन आलो आहे. परम पूज्य माझी वाट बघत असतील. मला परत जायला हवे.’’ त्यामुळे आम्ही ५ व्या दिवशी रामनाथी आश्रमात परत आलो.
५. कृतज्ञता
मागील ३ मासांपासून आम्ही (मी आणि माझा भाऊ राहुल) बाबांची सेवा करत आहोत. ‘त्यांची सेवा करून आम्हाला ‘संतांची सेवा केल्याचा लाभ व्हावा’, यासाठी देवाने हे नियोजन केले आहे’, असे मला वाटते. आम्ही घरी असतो, तर आम्ही बाबांची अशी भावपूर्ण सेवा करू शकलो नसतो. प.पू. डॉक्टरांनी आम्हाला आई-बाबांकडे ‘संत’ म्हणून बघण्याची आणि त्या भावाने त्यांची सेवा करण्याची शिकवण दिली. तेच आम्हाला प्रत्येक टप्प्याला शिकवत आहेत. अशी महान शिकवण देणार्या प.पू. डॉक्टरांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’
– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.३.२०२४)