पुणे महानगरपालिकेने दिलेल्या अधिकृत परवान्याचा दुरुपयोग करून धर्मांधांची पुणे येथे अवैधरित्या गोमांस विक्री !
एकाच परवान्यावर ४ ठिकाणी अवैध दुकाने !
पुणे – पुणे महानगरपालिकेने ज्यांना गोमांस विक्रीसाठी अधिकृत परवाने दिलेले आहेत, ते लोक या परवान्याचा दुरुपयोग करून त्यांच्या दुकानात गोमांस विक्री करत आहेत. या दुकानांना परवाने दिले असल्यास वरील परवाने तात्काळ रहित करण्यात यावेत आणि अवैध गोमांस विक्री करणार्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मानद पशूकल्याण अधिकारी श्री. राहुल कदम यांनी शिवाजीनगर पोलीस आयुक्तांना दिले आहे.
श्री. राहुल कदम यांनी याविषयी सांगितले आहे की, साईनगर, अप्पर डेपो येथे गोमांसाची उघडउघड विक्री चालू आहे, अशी बातमी मिळाल्याने मी स्वतः आणि ‘गोरक्षा सामाजिक संस्थे’चे ऋषिकेश कामथे, प्रतीक कांचन, आकाश भैसडे आदी त्या ठिकाणी आलो असता, एक नाव नसलेल्या दुकानामध्ये गोमांस लटकवून विक्री करत असतांना दिसले. चौकशी केली असता इरफान अब्दुल रेहमान कुरेशी आणि त्याच्यासह त्याची २ मुले विकार कुरेशी अन् सलमान कुरेशी असे मिळून हे गोमांस विकत होते, असे समजले. त्याविषयी आम्ही बिबवेवाडी पोलिसांचे साहाय्य घेऊन कारवाई केली. या प्रकरणी गोरक्षक प्रकाश खोले यांनी तक्रार दिलेली आहे. तसेच हे लोक एकाच परवान्यावर ४ ठिकाणी अवैध दुकाने चालवत आहेत. याविषयीच्या निवेदनाची एक प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही देण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
१. एका परवान्यावर ४ दुकाने अवैधरित्या चालवली जात आहेत, हे अत्यंत गंभीर असून त्यातही गोमांस विकण्याची अनुमती नसतांनाही गोमांस विकले जात आहे. वरील दुकानातून १६७ किलो वजनाचे गोमांस विकले जात होते. ते पोलिसांनी पंचनामा करून जप्त केलेले आहे. त्यासह वजन काटा, लोखंडी सत्तुर आणि एक लोखंडाची धारदार सुरी हेही पंचनाम्याने जप्त करण्यात आलेले आहे.
२. माझ्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून या दुकानांना परवाने दिले असल्यास वरील परवाने तात्काळ रहित करण्यात यावेत, तसेच पुणे शहर आणि लगतची उपनगरे जी महानगरपालिकेच्या हद्दीत येत आहेत अशांचेही सर्व्हेक्षण करून अशा अवैध कामांना पायबंद घालण्यात यावा. पुणे महापालिकेकडे याविषयी सर्व्हे करण्यासाठी अपुरी व्यवस्था असेल, तर आम्ही सर्व मानद पशू अधिकारी आणि गोरक्षक याविषयी पुणे महापालिकेस विनामोबदला, विनाविलंब अहोरात्र सेवा देण्यास तत्पर आहोत, याचीही आपण नोंद घ्यावी. तसेच ही गोमांस विक्री, हा अवैध धंदा बंद करण्यात महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा.
संपादकीय भूमिकामहाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करूनही त्याची प्रभावी कार्यवाही न झाल्यामुळे गायींची तस्करी, गोमांसाची तस्करी चालू आहे. आता तर अनेक अवैध दुकाने एका वैध परवान्यावर चालू असणे, हे अत्यंत गंभीर आहे. याची पोलीस आणि प्रशासन यांनी नोंद घेऊन कठोर उपाययोजना करणे अपेक्षित ! |