परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना सजिवांप्रमाणे निर्जीव वस्तूंचेही परीक्षण करण्यास शिकवणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत.
६ मार्च या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया. (भाग १७)
भाग १६ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/770920.html
१. ‘वस्तू कोण वापरते ?’, यावर तिच्यातील स्पंदने अवलंबून असणे
‘गुरुदेवांनी आम्हाला सांगितले, ‘‘जसे आपण जिवंत गोष्टींचे, म्हणजेच सजिवांचे परीक्षण करतो, तसे आपल्याला निर्जीव गोष्टींचेही परीक्षण करता आले पाहिजे. ‘कपडे, भांडी, भिंती यांमध्ये कशा प्रकारची स्पंदने आहेत ?’, हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. प्रत्येक वस्तू ही सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांनी बनलेली असते. ‘ती वस्तू कोण उपयोगात आणते ?’, यावर तिच्यात असलेली स्पंदने कोणत्या प्रकारचा गुण दाखवतात ?’, हे अवलंबून असते.’’
२. वास्तूतील स्पंदनांविषयी गुरुदेवांनी सांगितलेली सूत्रे
एकदा मी एका वास्तूचे परीक्षण करण्यास गेले होते. तेव्हा मला ती वास्तू दूषित, म्हणजेच तामसिक वाटली; परंतु त्यात रहाणारी माणसे मात्र सात्त्विक होती. ‘असे कसे ?’, असे मी गुरुदेवांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘वास्तू बांधत असतांना तेथे अनेक कामगार काम करत असतात. त्यांची स्पंदने आणि मनातील विचार वास्तूत फिरत असतात, तसेच ‘आपण वास्तू बांधतांना वापरलेले साहित्य कोणत्या दुकानातून आणले आहे ?’, यावरही हे ठरते. दुकानाचा मालक असात्त्विक असेल, तर त्याच्या दुकानातील मालावर त्या मालकाच्या असात्त्विक स्पंदनांचा परिणाम झालेला असतो. ‘वास्तू बांधणारा कंत्राटदार कसा आहे ? त्याच्या हाताखालची माणसे कशी आहेत ?’, याचाही चांगला-वाईट परिणाम वास्तूवर होत असतो; म्हणून वास्तू बांधून झाल्यानंतर आपण वास्तूशांती करतो. या विधीमुळे देवतांची स्पंदने वास्तूत कार्यरत झाल्याने वास्तूतील दूषितपणा नष्ट होऊन वास्तू पवित्र बनते; परंतु ‘वास्तूतील पावित्र्य टिकवणे’, हे तेथे रहाणार्या माणसांवर अवलंबून असते. तेथे रहाणारी माणसे साधना करणारी असली, तर वास्तू अधिकाधिक सात्त्विक होत जाते आणि शेवटी ती मंदिर बनते. हिंदु राष्ट्रात सर्व माणसे साधना करणारी असल्याने सर्व वास्तू आणि प्रदेश सात्त्विक असतील; परंतु त्यासाठी आपण समाजात अध्यात्माचा प्रसार अधिकाधिक करायला हवा. शेवटी समष्टी साधनाच महत्त्वाची ! हो ना ?’’
३. सर्वज्ञतेची शिकवण देणारे महान देहधारी गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) लाभल्याविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता !
गुरुदेवांनी अमूल्य मार्गदर्शन करून आम्हाला साधनेचे महत्त्व पटवून दिले. अशा सर्वांगीण विषयांचा अभ्यास करायला शिकवून साधनेची नवी दिशा देणारे गुरु विरळाच, नाही का ? आम्ही या संदर्भात भाग्यवान आहोत; कारण आम्हाला सर्वज्ञतेची शिकवण देणारे देहधारी गुरु भेटले आहेत. कलियुगात हे अत्यंत दुर्लभ आहे. आम्ही अशा गुरुदेवांच्या छायेत असल्याचा आम्हाला आनंद वाटतो. ‘आमच्यासारखे आम्हीच !’, असेच आम्हाला वाटते. ‘आमचा हा अभिमान सार्थ आहे’, यात शंका नाही.’ (क्रमशः)
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (१.३.२०२२)
|
भाग १८ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/772205.html