चैतन्याचा अखंड प्रसार करणारे सनातनचे अनमोल रत्न परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज !
माघ कृष्ण त्रयोदशी (८ मार्च) या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांची ५ वी पुण्यतिथी झाली. त्या निमित्ताने…
‘वर्ष २०१० मध्ये मी देवद (पनवेल) आश्रमात असतांना काही मास परात्पर गुरु पांडे महाराज यांची सेवा करत होतो. आम्ही त्यांना ‘प.पू. बाबा’ असे म्हणत असू. प.पू. पांडे महाराज यांची सेवा मिळाल्यानंतर प.पू. डॉक्टर (सच्चिदानंद परब्रह्मडॉ. आठवले) मला म्हणाले होते, ‘‘प.पू. पांडे महाराज म्हणजे ईश्वराने सनातनला दिलेले अनमोल रत्न आहे. प.पू. पांडे महाराज यांची सेवा करण्याचे भाग्य अल्प जणांना मिळते. ते तुला मिळाले. तू पुष्कळ भाग्यवान आहेस.’’ प.पू. बाबा हे बहुगुणसंपन्न होते. त्यांच्यामध्ये असलेल्या विविध गुणांमुळे विशेषतः त्यांच्यातील अपार प्रीतीमुळे ते अल्प कालावधीत सनातनच्या साधकांचे ‘श्रद्धास्थान’ बनले. प.पू. पांडे महाराज यांच्यामध्ये असलेल्या गुणांमुळे बाल, किशोर, युवक, वयोवृद्ध अशा सर्व वयोगटातील साधकांशी त्यांची अल्प काळातच जवळीक होत असे. प.पू. बाबा देवद येथील सनातनच्या आश्रमाबरोबर सनातन संस्थेचाही आधारस्तंभ होते. त्यांनी केलेले चैतन्यदायी मार्गदर्शन आणि त्यांची शिकवण यांच्या माध्यमातून ते आजही आपल्यामध्ये असल्याचे जाणवते.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
१ अ. आज्ञापालन करणे : पूर्वी प.पू. डॉक्टर जेव्हा विदर्भ दौर्यावर गेले होते. तेव्हा प.पू. डॉक्टरांची आणि प.पू. पांडे महाराज यांची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत प.पू. डॉक्टर यांनी त्यांच्यातील संतत्व ओळखले आणि त्यांचा संत म्हणून सन्मान केला. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी त्यांना म्हटले, ‘‘आता रहायला आश्रमातच या.’’ तेव्हा प.पू. पांडे महाराज यांनी प.पू. डॉक्टरांचे आज्ञापालन केले आणि ते देवद आश्रमात रहायला आले. खाणीतून जसा हिरा शोधून काढतात, त्याप्रमाणे प.पू. डॉक्टरांनी पारख करून त्यांना शोधले आणि त्यांच्याकडून समष्टी कार्य करवून घेतले.
१ आ. प.पू. डॉक्टरांवर असलेली नितांत श्रद्धा : प.पू. बाबांची प.पू. डॉक्टरांवर अपार श्रद्धा होती. त्या श्रद्धेची तुलनाच होऊ शकत नाही. त्यांच्या प्रत्येक संभाषणात प.पू. डॉक्टर आणि चैतन्य हे दोन शब्द कायम असायचे. प.पू. पांडे महाराज यांनी प.पू. डॉक्टरांना खर्या अर्थाने ओळखले होते. तेच म्हणायचे, ‘प.पू. डॉक्टरांना ओळखणे हे सोपे काम नाही.’ हे खरेच आहे. प.पू. पांडे महाराज यांच्यासारखे महान संतच प.पू. डॉक्टरांच्या मूळ स्वरूपाला ओळखू शकतात.
२. साधकांना साधनेत केलेले साहाय्य
२ अ. सेवेतील बारकावे शिकवणे : प.पू. पांडे महाराज यांनी मला त्यांच्या सेवेत असतांना सेवेचे बारकावे शिकवले होते. ‘सगुण सेवा कशी करावी ? त्याचप्रमाणे आश्रमात सत्संग कसे घ्यावेत ?’, हे प.पू. बाबांनी मला अतिशय चांगल्या प्रकारे शिकवले. वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत मी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या सेवेसाठी नाशिक येथे होतो. प.पू. बाबांच्या शिकवणीचा मला योगतज्ञ दादाजींकडे सेवा करतांना साहाय्य झाले.
प.पू. पांडे महाराजांनी मला सांगितले होते, ‘‘देवदला आल्यानंतर मला भेटल्याविना नाशिकला जाऊ नको.’’ त्यामुळे मी देवद आश्रमात आल्यानंतर नाशिकला जाण्यापूर्वी प.पू. पांडे महाराज यांना भेटूनच नाशिकला जात असे. ‘सनातनचा एक साधक योगतज्ञ दादाजींकडे सेवेसाठी आहे’, हे ऐकून त्यांना पुष्कळ आनंद होत असे.
२ आ. सजीव-निर्जीव वस्तूत भगवंत पहायला शिकवणारे प.पू. पांडे महाराज : प.पू. पांडे महाराज यांच्या पेशीपेशीमध्ये, तसेच हाड, मांस, रक्त यांमधे चैतन्यच भरले होते. त्यांना चैतन्याव्यतिरिक्त इतर विषयांवर बोलतांना मी कधी पाहिलेच नाही. त्या कालावधीत आश्रमभेटीसाठी येणारे प्रसारातील साधक किंवा हितचिंतक यांना प.पू. पांडे महाराज यांचा सत्संग मिळत असे. तेव्हा आश्रमदर्शनासाठी येणारे निरनिराळ्या क्षेत्रांमधे सेवारत असले, तरी त्यांच्या विषयांमध्येही ‘चैतन्य कसे कार्य करते ?’, हे सांगून प.पू. पांडे महाराज त्यांना शेवटी चैतन्यावरच आणत. विषय कोणताही असला, तरी ‘तो चैतन्यावरच येतो’, असे ते सर्वांना पटवून देत असत. त्यांच्या प्रत्येक संभाषणात केवळ चैतन्यावरच मार्गदर्शन असायचे. प.पू. पांडे महाराज सांगत, ‘‘चैतन्यच सर्व कार्य करते. चैतन्य ग्रहण करा आणि चैतन्याकडेच लक्ष केंद्रित करा.’’
त्यांनी निसर्ग, पशू-पक्षी, दगड, माती, हवा, पाणी यांकडेही चैतन्याच्या दृष्टीने पहायला शिकवले. ते निर्जीव वस्तूतही भगवंत शोधत असत. त्यांना निर्जीव वस्तूतही भगवंत दिसायचा. ते आम्हाला ‘आश्रम परिसरात असलेल्या झाडांकडे पाहून काय वाटते ?’, असे विचारत. ते म्हणत, ‘‘नुसते झाड पाहू नका. त्यातील चैतन्य पहा. चैतन्यामुळे त्याची पाने टवटवीत दिसतात. त्यामुळे आपल्याला झाडांकडे पाहून चांगले वाटते.’’
२ इ. निरनिराळ्या मंत्रांचा शोध लावून ते उपायांसाठी उपलब्ध करून देणे : प.पू. पांडे महाराज यांनी आध्यात्मिक उपायांचे पुष्कळ शोध लावले. ते आधी स्वतःवर उपाय करत. त्यानंतर आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांना ते उपाय करण्यास सांगत. ‘निरनिराळ्या उपायांच्या पद्धतीने त्रास असणार्या साधकांना उपायांचा परिणाम कसा होतो ?’ हे ते अभ्यासत. मग त्यानुसार पुढे ते उपाय सर्वांसाठी पाठवत असत. प.पू. पांडे महाराज यांनी अनेक कष्टप्राय शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांवर उपाय सांगून शेकडो साधकांना बरे केले. ‘मी साधकांसाठी उपाय करत नसून प.पू. डॉक्टरच माझ्या माध्यमातून साधकांसाठी उपाय करत आहेत आणि तेच साधकांना उपाय सांगत आहेत’, असा त्यांचा भाव असे. त्याचप्रमाणे सनातनच्या कार्यात येणारे अनिष्ट शक्तींचे अडथळे दूर होण्यासाठी नामजप आणि उपाय करत असत. त्यांनी विविध धर्मग्रंथ, वेद, पुराणे इत्यादींचा अभ्यास करून निरनिराळे मंत्र शोधून काढून समष्टीसाठी उपलब्ध करून दिले.
३. अध्यात्म सोपे करून सांगणे
संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांसारख्या थोर संतांनी जशी सोप्या भाषेत अध्यात्म शिकवून समाजाला भक्तीमार्गाला लावून साधना करायला सांगितली, त्याप्रमाणे प.पू. पांडे महाराज विषय कितीही कठीण असला, तरी तो सोपा करून साधकांना साधना सांगत. कोणी बुद्धीवादी भेटला, तरी ते त्याला विज्ञानाचा आधार घेऊन ‘अध्यात्म कसे श्रेष्ठ आहे’, हे त्याच्याच वैज्ञानिक भाषेत पटवून सांगत. असे कोणतेच क्षेत्र नव्हते, ज्याबद्दल प.पू. बाबांना माहिती नव्हती. सर्व क्षेत्रांतील विषयांवर ते मार्गदर्शन करून त्याला अध्यात्माशी जोडत असत.
४. अनुभूती
प.पू. पांडे महाराज यांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण होणे : १.३.२०१९ या दिवशी मी नाशिकहून देवद आश्रमात आलो होतो. तेव्हा प.पू. पांडे महाराज आजारी असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवल्याचे मला समजले. ४ मार्चला महाशिवरात्र असल्याने मी ३ मार्चला नाशिक येथे योगतज्ञ दादाजींकडे जाणार होतो. मी नेहमी प.पू. पांडे महाराज यांना भेटूनच नाशिकला जात असे. ते प.पू. दादाजींसाठी खाऊ किंवा काही निरोप देत असत. या वेळी ते अतिदक्षता विभागात असल्याने मला त्यांना भेटायला जाता येत नव्हते. माझ्या मनात असा विचार चालू असतांनाच मला निरोप मिळाला, ‘प.पू. पांडे महाराज यांचा मुलगा श्री. अमोल पांडे यांना एक वस्तू द्यायची आहे. तुम्ही रुग्णालयात जाऊ शकता का ?’ मी लगेच ‘हो’ म्हणालो. मी रुग्णालयात गेल्यानंतर अमोलदादा मला म्हणाले, ‘‘बाबांना भेटा. तुम्ही आल्याचे पाहून त्यांना बरे वाटेल.’’ मी प.पू. बाबांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या कक्षात गेलो, तर त्यांना ‘ऑक्सिजन’ लावला होता. मी आल्याचे त्यांनी पाहिले; परंतु त्यांना बोलता येत नव्हते. त्यांचा हातही पुष्कळ थरथरत होता. मी त्यांच्या जवळ गेल्यावर त्यांनी माझा हात त्यांच्या हातात घेतला आणि घट्ट पकडला. त्यांच्या त्या मायेच्या स्पर्शाने मला अश्रू अनावर झाले. नेहमी त्यांचा माझ्या पाठीवरून आणि डोक्यावरून मायेने फिरणारा हात आज असे सांगत आहे की, ‘मला आश्रमात जायचे आहे.’ ते आश्रमातच शेवटचा श्वास घेणार आहेत आणि चैतन्यात विलीन होणार आहेत’, असे मला वाटले. मी प.पू. पांडे महाराज यांना मनोमन प्रार्थना केली, ‘तुमची शिकवण आणि मार्गदर्शन नेहमी माझ्या स्मरणात राहून कृतीत येऊ दे.’
मी प.पू. बाबांना म्हटले, ‘‘बाबा मी उद्या नाशिकला दादाजींकडे जाणार आहे. दादाजींना तुमचा नमस्कार सांगतो.’’ मी असे म्हटल्यानंतर त्यांनी जणूकाही त्यांच्या हातातील माझा हात सोडून मला जाण्याचीच अनुमती दिली. नंतर मी खोलीच्या बाहेर आलो. तेव्हा समजले की, आजच प.पू. बाबांना रुग्णालयातून आश्रमात घेऊन जाणार आहेत. प.पू. बाबांना आश्रमात आणल्यानंतर दुसर्या दिवशी त्यांनी देह सोडला.
प.पू. पांडे महाराज यांच्यासारख्या ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध संतांना जवळून अनुभवण्याची आणि त्यांच्या सेवेची संधी मला दिल्याबद्दल मी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञ आहे. प.पू. बाबांची शिकवण कायम आमच्या स्मरणात राहून आम्हा साधकांकडून कृतीच्या स्तरावर प्रयत्न व्हावेत, हीच प्रार्थना !
– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.३.२०२४)
|