चैतन्याचा स्रोत असलेले आणि शांतीची अनुभूती देणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाच्या मागील बाजूला असणारे पुरातन शिवमंदिर !
१. शिवमंदिराची जाणवलेली वैशिष्ट्ये
अ. ‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाच्या मागील बाजूला पुरातन शिवमंदिर आहे. हे मंदिर जागृत आहे.
आ. आश्रमातील साधक मंदिराची सकाळ-संध्याकाळ स्वच्छता करून शिवाची नित्यनेमाने भावपूर्ण पूजा करतात, तसेच गावातील काही सात्त्विक लोक तेथे दर्शनाला येतात. त्यामुळे ‘येथील पावित्र्य टिकून आहे’, असे मला वाटते.
इ. प्रत्येक सोमवारी आणि अन्य दिवशीही सभोवतालच्या गावांतील शिवभक्त येथे येतात.
ई. ‘शिवमंदिरात बोललेले नवस पूर्ण होतात’, अशी पुष्कळ भाविकांची श्रद्धा आहे.
२. शिवमंदिराविषयी जाणवलेली सूत्रे
अ. हे शिवमंदिर म्हणजे चैतन्याचा स्रोतच आहे. त्यामुळे येणार्या भाविकांनाही अनुभूती येतात.
आ. शिवमंदिरात गेल्यावर एकप्रकारची शांती अनुभवता येते. मंदिरात पुष्कळ थंडावा जाणवतो.
इ. गाभार्यात बसल्यावर मन निर्विचार होते. तेथे जपाला बसल्यावर ‘उठूच नये’, असे वाटते.
ई. मंदिरात येणारे भाविक स्वतःहून मंदिर परिसराची स्वच्छता करतात. त्यातून त्यांना आनंद मिळतो.
उ. ‘साधकांनी श्रद्धेने आणि तळमळीने केलेली शिवाची सेवा शिवचरणी रुजू झाल्यामुळे साक्षात् शिव साधकांवर प्रसन्न आहे’, असे मला जाणवते.
ऊ. ‘मंदिरातून प्रक्षेपित होणारी शिवशक्ती देवद आश्रमातील साधकांना अधिक प्रमाणात प्राप्त होते’, अशी साधकांना अनुभूती येते.
ए. या मंदिरामुळे देवद आश्रमात शिवलोकाप्रमाणे शांती अनुभवता येते.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ शिवमंदिरात येऊन गेल्यानंतर जाणवलेले पालट
३ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितल्याप्रमाणे साधक शिवमंदिराची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करू लागल्याने त्यांना साधनेच्या दृष्टीने अधिक लाभ होऊ लागणे : सप्टेंबर २०१९ मध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी ‘या मंदिराची देखभाल करणे आणि पूजा अन् आरती नियमित करणे’, यांसंदर्भात साधकांना मार्गदर्शन केले होते. त्यानंतर साधक शिवमंदिराची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करू लागले. त्यामुळे त्यांना साधनेच्या दृष्टीने अधिक लाभ होऊ लागला. यामध्ये श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा संकल्पही कार्यरत असल्याचे मला जाणवले.
३ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी मंदिराच्या बांधकामाच्या दृष्टीने सुधारणा करण्याच्या दृष्टीनेही काही बारकावे सांगून ते करून घेतले.
३ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या उपस्थितीत मंदिरातील शिवपिंडीवर अभिषेक केल्यापासून मंदिरातील चैतन्यात वाढ झाल्याचे जाणवणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या उपस्थितीत मंदिरातील शिवपिंडीवर अभिषेक करण्यात आला. तेव्हापासून ‘शिवपिंडीतील शिवाचे तत्त्व जागृत झाले आहे. मंदिर अधिक जागृत झाले आहे. मंदिरातील चैतन्य वाढले आहे’, असे जाणवते.
३ ई. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी शिवाला प्रार्थना केल्याने तो साधकांना आशीर्वाद देत असल्याची प्रचीती येणे : ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी शिवाला आवाहन आणि प्रार्थना केल्यामुळे साक्षात् शिव साधकांसाठी शिवलोकातून पृथ्वीवर आला आहे आणि साधकांना आशीर्वाद अन् चैतन्य देत आहे. त्यामुळे साधकांना लाभ झाल्याची प्रचीती येते.’
– श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.१.२०२४)
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी शिवमंदिराचे केलेले सूक्ष्म परीक्षण
१७.१२.२०२३ या दिवशी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका मंदिरात आले होते. तेव्हा त्यांनी मंदिराचे सूक्ष्म परीक्षण केले. त्या वेळी त्यांनी पुढील सूत्रे सांगितली.
१. मंदिर लहान असूनही आतून भव्य-दिव्य वाटणे : ‘मंदिरात शिवपिंडीच्या वर पाहिले असता मंदिर पुष्कळ उंच वाटते. प्रत्यक्षात मंदिर बाहेरून लहान आहे; पण आतून ते २ – ३ माळ्यांच्या इमारतीप्रमाणे भव्यदिव्य वाटते.
२. शिवमंदिरात शिवतत्त्व पुष्कळ प्रमाणात असल्याचे जाणवते.
३. पुष्कळ चैतन्य जाणवणे : देवळाच्या गाभार्यात वरच्या दिशेकडून चैतन्याचा ओघ पुष्कळ प्रमाणात येतो. ‘ते चैतन्य माझ्या ब्रह्मरंध्रातून आत आले. त्याने माझ्या देहाची पूर्ण शुद्धी केली आणि माझ्या पायांतून ते बाहेर पडले’, असे मला जाणवले. मंदिराच्या छताच्या पिरॅमिडसारख्या भागातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होते. शिवपिंडीच्या भोवती सर्व बाजूंनी समप्रमाणात चैतन्य असल्याचे जाणवते.
४. शिवमंदिरात माझे अस्तित्व नाहीसे झाल्याचे जाणवले, तसेच माझे मन निर्विचार आणि शांत झाले होते.
५. शिवमंदिरात आल्यावर आपल्याला निर्गुण अवस्था प्राप्त होते.’
– सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ (१७.१२.२०२३)
‘सद्गुरु गाडगीळकाकांमध्ये ईश्वरी चैतन्य असल्याने ते शिवमंदिरातील ईश्वरी चैतन्याशी सहजपणे एकरूप झाले’, असे जाणवणे
सद्गुरु काकांच्या ‘ते चैतन्य माझ्या ब्रह्मरंध्रातून आत आले आणि माझ्या पायांतून बाहेर पडले’, या वाक्यावरून पुढील सूत्र माझ्या लक्षात आले. ‘सद्गुरु काका स्वतः चैतन्याचे वाहक असल्यामुळे त्यांना शिवमंदिरातील चैतन्य लगेच जाणवले. जसे नदीचे पाणी समुद्राला जाऊन सहज मिळते, तसे शिवमंदिरातील चैतन्य सद्गुरु काकांच्या चैतन्याशी एकरूप झाले.’
मी शिव, शिवस्वरूप गुरुमाऊली, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि सद्गुरु डॉ. गाडगीळकाका यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– श्री. शंकर नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.१.२०२४)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |