तेजस्वी रूपात प्रकटलेली ज्योतिर्लिंगे !
भगवान शिवाची १२ ज्योतिर्लिंगे सुप्रसिद्ध आहेत. सहस्रो लोक ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. ‘ज्योतिर्लिंग’ या शब्दाचा अर्थ आहे, ‘व्यापक ब्रह्मात्मलिंग’ म्हणजेच ‘व्यापक प्रकाश’ !
तैत्तिरीय उपनिषदात ब्रह्म, माया, जीव, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि पंचमहाभूते या १२ तत्त्वांना ‘१२ ज्योतिर्लिंगे’ मानले गेले आहे. ‘अरघा’ यज्ञवेदीचे दर्शक आणि ‘लिंग’ यज्ञातील ज्योत म्हणजेच यज्ञशिखाचे प्रतीक आहे. भारतात १२ शिवस्थाने अर्थात् १२ मुख्य ज्योतिर्लिंगे आहेत. ती तेजस्वी रूपात प्रकट झाली आहेत.
ही १२ ज्योतिर्लिंगे म्हणजे प्रतीकात्मक रूपातील शरीर आहे. काठमांडू येथील पशुपतिनाथ हे ज्योतिर्लिंगांचे मस्तक आहे. ‘दक्षिण दिशेचे स्वामी यमराज शिवाच्या अधिपत्याखाली असतात; म्हणून दक्षिण दिशा ही शिवाची आहे’, असे मानले जाते. ‘अरघाचा’ स्रोत दक्षिण दिशेला असेल, तर ते ज्योतिर्लिंग दक्षिणाभिमुख असते आणि अशी पिंडे अधिक शक्तीशाली असतात. उज्जैन भगवान महाकाल देवाची पिंडी अशीच दक्षिणाभिमुख आहे. सर्वच मंदिरे दक्षिणाभिमुख नसतात.
ज्योतिर्लिंगांचे महत्त्व !
संतांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्याकडून सूक्ष्मातून अधिक प्रमाणात कार्य होते. संतांनी देहत्याग केल्यानंतर त्यांच्या देहातून प्रक्षेपित होणारे चैतन्यतरंग म्हणजेच सात्त्विक तरंग अधिक प्रमाणात असतात. ज्याप्रमाणे संतांची समाधी भूमीखाली असते, त्याचप्रमाणे ज्योर्तिलिंग किंवा स्वयंभू लिंग भूमीच्या खाली आहे. अन्य शिवलिंगांच्या तुलनेत या शिवलिंगात निर्गुण तत्त्वाची मात्रा अधिक प्रमाणात असते; म्हणून त्यांच्यातून अधिक मात्रेत निर्गुण चैतन्य आणि सात्त्विकता यांचे सतत प्रक्षेपण होते. परिणामी पृथ्वीवरील वातावरण सतत शुद्ध होते. ज्योर्तिलिंग आणि संतांची समाधी यांतून पाताळाच्या दिशेने सतत चैतन्य अन् सात्त्विकता यांचे प्रक्षेपण होते. यामुळे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणापासून पृथ्वीचे रक्षण होते.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |