शिवोपासना कशी करावी ?
शिवाला दुग्धाभिषेक करण्याचे महत्त्व !
शिवाला दुधाचा अभिषेक करावा; कारण दुधामध्ये शिवाचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असल्याने दुधाच्या अभिषेकाच्या माध्यमातून शिवाचे तत्त्व लवकर जागृत होते. त्यानंतर ते दूध तीर्थ म्हणून प्राशन केल्याने शिवतत्त्वाचा अधिक लाभ होतो.
शिवाला श्वेत रंगाची फुले वहावीत !
‘विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अन्य फुलांच्या तुलनेत अधिक असते. धोत्रा, श्वेतकमळ, श्वेत कण्हेर, चमेली, मंदार, नागचंपा, पुन्नाग, नागकेशर, निशिगंध, जाई, जुई, मोगरा, तसेच श्वेत पुष्पे शिवाला वहावीत. या फुलांच्या गंधामुळे शिवाचे तत्त्व पिंडीत अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत वाहिल्यास फुलांकडे त्या त्या देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार शिवाला १० फुले वहावीत.
शिवाच्या तारक आणि मारक तत्त्वासाठी वापरायच्या उदबत्त्या !
शिवाची पूजा करतांना त्याचे तारक तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करण्याकरता केवडा अथवा चमेली, यांपैकी कोणत्याही गंधाच्या उदबत्त्या वापराव्यात, तर शिवाचे मारक तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करण्याकरता हीना अथवा दरबार या गंधाच्या उदबत्त्या वापराव्यात.
शिवाला बेल वहाणे
ज्या वस्तूंमध्ये विशिष्ट देवतेची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूंपेक्षा अधिक असते, अशा वस्तू देवतेला वाहिल्या, तर देवतेचे तत्त्व मूर्तीत येऊन देवतेच्या मूर्तीतील चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो. यासाठीच शिवाला बेल वहावा.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शिवाच्या उपासनेमागील शास्त्र’)
शृंग दर्शनाचे महत्त्व !
श्री गुरुचरित्रानुसार शृंगदर्शन करतांना, नंदीच्या मागील पायांच्या बाजूला बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा. त्यानंतर उजव्या हाताची तर्जनी म्हणजे अंगठ्याच्या जवळचे बोट आणि अंगठा नंदीच्या शिंगावर ठेवावा. दोन्ही शिंगे आणि त्यावर ठेवलेली दोन्ही बोटे यांच्यामधील रिकाम्या जागेतून शिवाचे दर्शन घ्यावे.
नंदीच्या वृषणाला हात लावणे याचा अर्थ आहे, ‘कामवासनेवर नियंत्रण ठेवणे.’ शिंग हे अहंकार, पुरुषत्व आणि राग यांचे प्रतीक आहे. शिंगाला हात लावणे म्हणजे अहंकार, पुरुषत्व आणि राग यांवर नियंत्रण ठेवणे. शिवाच्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रारंभी नंदीचे दर्शन केल्याने आपल्यातही नंदीप्रमाणे लीनता निर्माण होते. याच लीनतेने शृंगदर्शन करणे लाभदायी ठरते.
शिवपिंडीला अर्धी प्रदक्षिणा घालण्यामागील धर्मशास्त्र !
भगवान शिवाला चंद्रकलेप्रमाणे म्हणजेच सोमसूत्री प्रदक्षिणा घातली जाते. ‘चंद्राचा अर्थ आहे ‘सोम’ आणि ‘सूत्र’ म्हणजे ‘नाला’. अरघापासून उत्तर दिशेला म्हणजेच सोमाच्या दिशेकडे जे सूत्र जाते, त्याला सोमसूत्र किंवा जलप्रणालिका असे म्हटले जाते. डाव्या बाजूने प्रदक्षिणेला प्रारंभ करून जलप्रणालिकेच्या दुसर्या बाजूला जायचे. त्याला न ओलांडता वळून पुन्हा जलप्रणालिकेपर्यंत यायचे, असे केल्यावर एक प्रदक्षिणा पूर्ण होते. हा नियम केवळ मानवाने स्थापन केलेल्या किंवा मानवाने निर्माण केलेल्या शिवलिंगालाच लागू होते. स्वयंभू लिंग किंवा चल म्हणजेच देवघरात स्थापन केलेल्या शिवलिंगाला लागू होत नाही. (शाळुंकेच्या स्रोताला ओलांडत नाहीत; कारण तेथे शक्तीस्रोत असतो. तो ओलांडतांना पाय फाकतात आणि वीर्यनिर्मिती अन् पाच अंतस्थ वायू यांवर विपरीत परिणाम होतो. देवदत्त आणि धनंजय वायू आखडतात; मात्र ओलांडतांना स्वतःला आवळून ठेवले, म्हणजे नाड्या आखडल्या, तर परिणाम होत नाही.
‘पन्हाळी ओलांडतांना पायाची घाण त्यात पडली आणि तीर्थ म्हणून ते पाणी प्राशन केल्यास भाविकांना व्याधी होतील; म्हणून पन्हाळी ओलांडत नाहीत’, असे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना वाटते ! (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शिवाच्या उपासनेमागील शास्त्र’))
शिवाची तारक आणि मारक उपासना कशी कराल ?
महाशिवरात्रीचा उत्सव आनंदाने साजरा करा. भगवान शिवाची नियमितपणे पूजा-अर्चा करा. शिवपिंडीवर दूध अर्पण करा आणि गोशाळेला दान द्या. गायींचे संवर्धन करा. यांवर आक्षेप घेणार्यांचा समर्थपणे विरोध करा. असा विरोध करणे हीसुद्धा सध्याच्या काळातील शिवाची मारक रूपातील उपासना आहे. आशीर्वाद देणार्या शिवाची तारक उपासना करण्यासह मारक उपासना करून भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया !
– सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती.