राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा ऐकवणार रामकथा
९ मार्चपासून रत्नागिरीत कीर्तनसंध्या महोत्सवाला होणार प्रारंभ
रत्नागिरी – येथील वार्षिक कीर्तनसंध्या महोत्सव ९ मार्चपासून चालू होत आहे. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवांच्या सुश्राव्य आवाजातील रामकथा, साथीला गीतरामायण या अजरामर संगीत कलाकृतीतील काही निवडक गाणी आणि पाचव्या दिवशी लळीताचे कीर्तन असा महोत्सव साजरा होणार आहे.
अयोध्येत श्रीराममंदिराचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारी २०२४ या दिवशी झाला. या पार्श्वभूमीवर ९ ते १३ मार्च २०२४ या कालावधीत ‘आले रामराज्य अर्थात् राममंदिर ते राष्ट्रमंदिर’ या विषयावर कीर्तनसंध्या महोत्सव रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलावर होणार आहे. रामकथा सांगत असताना बरोबरीने श्रीराममंदिर उभारणीचा संक्षिप्त इतिहासही बुवा उलगडून सांगणार आहेत. सुमारे ५०० हून अधिक वर्षांचा संघर्षांचा गोड परिणाम असणार्या अयोध्येतील भव्य श्रीराममंदिराचा देखावा, हे यावर्षीच्या कीर्तनसंध्येचे वैशिष्ट आहे.
कार्यक्रमाकरता सर्वांना विनामूल्य प्रवेश असून देणगीदारांकरता सन्मानिका उपलब्ध आहेत. प्रतिवर्षीप्रमाणेच कीर्तनसंध्या महोत्सवाचा आस्वाद घेण्याचे आवाहन कीर्तनसंध्या परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.