गणपतीपुळे तीर्थक्षेत्राचे सुशोभीकरण होणार !
कोकणातील २ तीर्थक्षेत्रांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी
रत्नागिरी – तालुक्यातील गणपतीपुळे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर या प्रमुख तीर्थक्षेत्रांना ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील महत्त्वपूर्ण अशा ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेस संमती देण्यात आली. या योजनेअंतर्गत कोकणातील ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांना २ कोटी रुपयांऐवजी ५ कोटी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करण्यात येणार आहे. या योजनेनुसार तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविक आणि यात्रेकरूंना विविध सोयीसुविधा पुरवणे आवश्यक आहे; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या तुटपुंजा उत्पन्नामुळे या सोयीसुविधा पुरवणे शक्य होत नाही; म्हणून शासनाने ग्रामीण भागांतील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याकरता निधी उपलब्ध करून दिला आहे.
या निधीमुळे मंदिराचे सुशोभीकरण,वाहनतळ,भक्तनिवास, पर्यटकांची सुरक्षितता तीर्थक्षेत्रांकडे जाणारे रस्ते, पथदीप, मंदिर परिसर, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे आदी सोयी पर्यटक आणि भाविक यांना उपलब्ध होणार आहेत.