देववाणी संस्कृत ही देशातील पहिल्या पसंतीची भाषा बनवायची आहे ! – राज्यपाल रमेश बैस
नागपूर – देशाचा वर्तमानकाळ आणि भविष्य संस्कृतविना शक्य नाही. संस्कृत ही जगातील अन्य भाषांची जननी आहे; मात्र शिक्षण, वैद्यकीय आणि अन्य क्षेत्रांत इंग्रजी भाषेचे वर्चस्व असण, हे दुर्दैवी आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतकाळ चालू असून वर्ष २०४७ पर्यंत आपल्याला देववाणी संस्कृत ही देशातील पहिल्या पसंतीची भाषा बनवायची आहे. त्यासाठी विद्यापिठांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी ६ मार्च या दिवशी केले. रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापिठाच्या १२ व्या दीक्षांत समारंभात दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यपाल बैस पदवीधरांना मार्गदर्शन करत होते.
सौजन्य DD Sahyadri News
परदेशी इतिहासकारांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये संस्कृत भाषेचे महत्त्व विशद केले आहे. भारत आज सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर बनत आहे. आत्मनिर्भरतेचा आरंभ माता, मातृभाषा आणि मातृभूमी यांद्वारेच होऊ शकतो. विदेशी विद्यापिठे संस्कृत भाषेचे शिक्षण देण्यास इच्छुक आहेत. संस्कृतला जागतिक पातळीवर नेण्यासाठी त्यांच्याशी करार करावे लागतील, असेही मत बैस यांनी व्यक्त केले.