पैठण येथील ‘संत ज्ञानेश्वर उद्यान’ आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर – ‘जिल्ह्यातील पैठण येथील ‘संत ज्ञानेश्वर उद्याना’चा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा. यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही’, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ मार्च या दिवशी येथे दिली.
संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्याविषयी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक पार पडली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे सहभागी झाले होते, तर विविध विभागांचे शासकीय अधिकारी या वेळी उपस्थित होते. या उद्यानाच्या विकासकामांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उच्चाधिकार समितीची बैठक झाली. त्यामध्ये समितीच्या शिफारसींनुसार विकासकामांच्या प्रस्तावात सुधारणा करून १४९ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव करण्यात आला.
याविषयी यापूर्वी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत संत ज्ञानेश्वर उद्यान पुनर्विकासासाठी १५० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित आणि सुशोभित करण्याचा प्रकल्प अहवाल सिद्ध करण्यासाठी जागतिक स्तरावरील सल्लागार निवडीची प्रक्रियेचा आदेश दिला आहे.