राज्य सरकारकडून गोशाळा विकसित करण्यासाठी आर्थिक साहाय्य !
‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष शेखर मुंदडा यांची माहिती
पुणे – राज्यातील ३३४ तालुक्यांतील १७८ गोशाळांना २२ कोटी ८३ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. ‘गोवर्धन गोवंश समिती योजनेंतर्गत’ २०२३-२४ या वर्षामध्ये पात्र ठरलेल्या गोशाळांना हे अनुदान पशूसंवर्धन विभागांकडून दिले जाणार आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. ते आयोगाच्या कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये बोलत होते.
मुंदडा पुढे म्हणाले, ‘‘गोशाळा सक्षम करण्यासाठी हे साहाय्य करण्यात येत आहे. १७८ पैकी ४० गोशाळांना प्रत्येकी १५ लाख रुपये, ५३ गोशाळांना प्रत्येकी २० लाख रुपये आणि ८५ गोशाळांना प्रत्येक २५ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. पशूसंवर्धन विभागांकडून ‘गोसंवर्धन गोवंश समिती’साठी संमत करण्यात आलेली १६ पदे लवकरच भरली जाणार आहेत. तसेच या अनुदानाचा चांगला विनियोग व्हावा, यासाठी गोशाळा चालकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.’’