समाविष्ट गावांमधील थकबाकीची वसुली थांबवण्याचा पालकमंत्री अजित पवार यांचा आदेश !
पुणे – समाविष्ट गावांमधील नागरिकांकडून तिप्पट मिळकतकर आकारला जात आहे, तसेच थकबाकी ही सक्तीने वसूल केली जात आहे. यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतला जाईल; मात्र तोपर्यंत महापालिकेने थकबाकी वसुली थांबवावी, असा आदेश उपमुख्यमंत्री, तसेच पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका प्रशासनाला दिला. समाविष्ट गावांमधील नागरिकांना मिळकत कर आणि दंडापोटीची ज्यादा रक्कम आल्याने असंतोष व्यक्त होत आहे. त्यातच अतिक्रमण कारवाईसुद्धा केली जात आहे. त्यामुळे ३४ गावांमधील नागरिक आणि सोसायटीच्या पदाधिकार्यांनी शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री पवार यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. उंड्री येथील सिल्वर हिल्स सोसायटीतील रहिवाशांनी पाण्याची समस्या मांडल्यावर ‘उंड्रीला टँकरने पाणीपुरवठा करा, लोकांना पुरेसे पाणी द्या’, अशी सूचना पवार यांनी पालिका आयुक्तांना केली.