महिलांनी शालीनता जपण्याची आवश्यकता !
आधुनिकता, तंग आणि तोकडे कपडे परिधान करणे, म्हणजे पुढारलेपणा नव्हे, तर धर्माचरणातच खरी प्रगल्भता आहे !‘भारतीय पोषाखाविषयी कार्यालये, गृहसंकुले (सोसायट्या) यांमध्ये जाऊन महिलांचे प्रबोधन करायला हवे. नागरिकांमध्ये सात्त्विक पोषाखाचे महत्त्व आणि हिंदु संस्कृती यांविषयी जागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. हिंदु संस्कृतीचे जतन होणे अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी लिहिलेल्या ग्रंथांचे वितरण आणि प्रसार होणे किती आवश्यक आहे’, याची प्रकर्षाने जाणीव होते. – श्रीमती स्मिता नवलकर |
सध्याच्या काळात महिला आणि त्यांची वेशभूषा हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. ‘तोकडे आणि तंग कपडे परिधान करणे, म्हणजे पुढारलेपणा’, अशी अयोग्य कल्पना पसरवल्याने आज भारतीय विचार बाजूला सोडून पाश्चात्त्य विकृतीचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानली जाते; पण खरे तर महिलांनी त्यांची शालीनता जपायला हवी. एका संतांनीही म्हटले आहे, ‘महिलांनी पुरुषार्थ गाजवावा; पण पुरुष होण्याच्या भानगडीत पडू नये.’
१. बांधकाम व्यवसायविषयक प्रदर्शनामध्ये प्रबोधन केल्यानंतर महिला प्रतिनिधींनी पारंपरिक पोषाख परिधान करणे
गेली २२ वर्षे बांधकाम व्यावसायिकांच्या व्यवसायविषयक प्रदर्शनामध्ये सनातन संस्थेला ग्रंथ प्रदर्शन लावण्यासाठी जागा मिळते. एकदा त्या प्रदर्शनात गेल्यानंतर बर्याच ‘स्टॉल’वर प्रतिनिधी म्हणून असलेल्या मुलींनी तोकडे कपडे परिधान केल्याचे दिसून आले. मोठ्या वयाच्या मुलींनी गुडघ्यापर्यंत स्कर्ट घातले होते. सध्या बरेच ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ करणारे (एखाद्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणार्या कंत्राटी संस्था) त्यांच्या अधिपत्याखालील महिला कर्मचार्यांना घट्ट शर्ट, पँट, स्कर्ट किंवा तोकडे कपडे असा ‘ड्रेस कोड’ (वस्त्रसंहिता – कपड्यांच्या संदर्भातील नियमावली) ठेवतात. याविषयी मी त्या मुलींशीही संवाद साधला. त्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या मुलींनी सांगितले, ‘‘आम्हालाही अशा प्रकारचे कपडे घालायला कसे तरीच वाटते; पण आम्ही केवळ तेवढ्या कारणावरून या कामाच्या संधीला नकार दिला, तर दुसर्या कुणाला तरी ती नोकरी मिळेल. त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव हे स्वीकारावे लागते.’’ यानंतर त्या महिला प्रतिनिधींनी पारंपरिक पोषाख परिधान करण्यास प्रारंभ केला.
२. प्रबोधनानंतर पारंपरिक पोषाख परिधान केला जाणे
त्याच प्रदर्शनात एका व्यावसायिकांचा एक ‘स्टॉल’ होता. त्या कक्षाच्या येथे छत्रपती शिवाजी महाराजांची छोटी मूर्ती ठेवण्यात आली होती आणि त्या मूर्तीच्या बाजूला तोकड्या कपड्यांत मुली उभ्या होत्या. याविषयी त्या ‘स्टॉल’ प्रमुखांचे प्रबोधन केले. त्यानंतर दुसर्या दिवशी त्यांच्या कक्षावर काम करणार्या मुली पारंपरिक साडी नेसून आल्याचे दिसून आले.
३. अर्धनग्न अवस्थेतील सूत्रसंचालक किंवा परीक्षक !
मराठी वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करणार्या किंवा परीक्षक म्हणून काम करणार्या महिलाही अत्यंत तोकडे आणि अश्लील कपडे परिधान करत असतात. वाहिन्यांकडे दर्जेदार कलाकृती नसल्याने त्यांना अशा प्रकारे महिलांना कमी कपड्यांमध्ये प्रस्तुत करावे लागते का ? हा त्यांचा ‘टी.आर्.पी.’ वाढवण्याचा भाग आहे का ? तसे असेल, तर प्रेक्षकांनीच त्याविषयी आक्षेप घ्यायला हवा.
४. भारतीय पोषाखाविषयी जागृती करणे महत्त्वाचे !
या संदर्भात ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ करणार्यांनी किंवा मालिका प्रदर्शित होऊ देणार्यांनी विचार करायला हवा की, एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी अशा प्रकारच्या अभारतीय पोषाखाची आवश्यकता का आहे ? आजकाल बर्याच ‘ज्वेलर्स’च्या (दागिन्यांच्या) दुकानात महिला कर्मचारी ‘साडी’ या पारंपरिक पोषाखात असतात. तरीसुद्धा त्या दुकानदारांची कोट्यवधींची उलाढाल होतेच ना ! नुकतेच ‘चंद्रयान ३’च्या प्रक्षेपणानंतरच्या जल्लोषाची जी छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती, त्यामध्ये ‘इस्रो’च्या (भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या) महिला शास्त्रज्ञ ‘साडी’ या पारंपरिक पोषाखात, अगदी केसात गजरा माळून आल्याचे दिसून आले होते. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी झाशी वाचवण्यासाठी इंग्रजांशी युद्ध केले, तेही नऊवारी साडी नेसून आणि पाठीला तान्हे बाळ बांधूनच ना !
५. आई-वडिलांनी मुलांवर संस्कार करणे आवश्यक
मुलींनी अयोग्य प्रकारचे कपडे घालण्याच्या संदर्भात बर्याच वेळा आई-वडीलही काही बोलत नाहीत. एकदा एका मुलीने अतिशय तंग कपडे घातले होते. ते पाहून काही आजूबाजूची मुले तिच्याविषयी असभ्य बोलत होती. मुलीची आईसुद्धा मुलीजवळच होती. मी आईकडे जाऊन म्हणाले, ‘‘मुलीला अशा प्रकारचे घट्ट कपडे कशाला घालायला देता ?’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मुलगी ऐकतच नाही.’’ तेव्हा मनात विचार आला, ‘आईच जर जीन्स पँट घालून वावरत असेल, तर मुलीही तशाच वागणार. मुलींना वळण लावण्याचे दायित्व पालकांचेच आहे.’
यामुळे ‘अंगप्रदर्शन करणे म्हणजे आधुनिकता, तंग आणि तोकडे कपडे परिधान करणे म्हणजे पुढारलेपणा’, या खुळचट कल्पना टाकून देऊन भारतीय पोषाख परिधान करायला हवा. महिलांचे महिलापण शालीनतेमध्ये आहे. ते जपण्यासाठी घराघरातूनच संस्कृतीचा जागर व्हायला हवा. सध्याचे सरकार भारतीय परंपरांचे संवर्धन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. त्यामुळे भारतीय पोषाख आता केवळ ‘ट्रॅडिशनल डे’ (पारंपरिक पोषाख दिवस) पुरता मर्यादित न रहाता दैनंदिन जीवनातही प्रस्थापित व्हावा, ही अपेक्षा ! (२८.२.२०२४)
– श्रीमती स्मिता नवलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.