भक्तीसत्संगातील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाणीतील चैतन्यामुळे साधिकेला भगवंताच्या चैतन्याची अनुभूती येणे आणि मनोभावे कैलासदर्शन घेता येणे
८.३.२०२४ या दिवशी महाशिवरात्र आहे. त्या निमित्ताने…
‘२४.२.२०२२ या दिवशी महाशिवरात्र होती. त्यानिमित्त भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ शिवाविषयी माहिती सांगत होत्या. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. भक्तीसत्संगाच्या आरंभापासून शेवटपर्यंत शिवतत्त्व कार्यरत होऊन ते साधकांच्या अंतःकरणातील भाव जागृत करत होते.
२. माझ्या आज्ञाचक्रापासून डोक्याभोवती गोलाकार आकारात थंडावा जाणवत होता.
३. सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत जाणे आणि नृत्याराधना करणे
भक्तीसत्संगात गीत लावल्यावर मी सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत गेले. त्या वेळी ते आसंदीत बसले होते. मी श्वेत वस्त्र परिधान करून त्यांच्या भोवती गोल नृत्याराधना करत होते. माझ्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा होत होत्या आणि त्या गीताच्या चालीवर पदन्यासही होत होता. मी प्रत्यक्षातही बसल्या बसल्या पायाने ताल धरत होते. माझे मन मुक्तपणे भगवंताची नृत्यातून उपासना करत होते. (प्रत्यक्षात मला नृत्य येत नाही. मी कधी नृत्य केले नाही.) अन्य वेळीही ‘मी गुरुदेवांसमोर मानस नृत्य करत आहे’, याची अनुभूती मला अनेक वेळा येते.
४. ध्यानस्थ शिवाचे चित्र पहातांना माझ्या डोळ्यांसमोर डोळे बंद करून ध्यान करत असलेले प.पू. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) चित्र येत होते आणि नंतर भक्तीसत्संगात पडद्यावरही तेच चित्र दाखवले गेले.
५. कैलास पर्वताच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
अ. मला कैलास पर्वताचे छायाचित्र पहातांना त्यावर जटाधारी शिवाचा मुखवटा आणि नटराजाची सुंदर मूर्ती दिसत होती
आ. शिवदर्शनासाठी सूक्ष्मातून कैलास पर्वतावर जातांना ‘मी श्वेत वस्त्र परिधान केले आहे आणि अत्यंत तल्लीनतेने शिवाला प्रार्थना करत अन् त्याचे नाम घेत चालत आहे’, असे मला जाणवत होते.
इ. मला कैलास पर्वतावर भगवान शिवासमोर बसून नामजप करायचा होता. त्या वेळी आम्ही (सनातनचे सर्व साधक) एका रांगेत नामजपासाठी बसलो होतो. हे पाहून भगवान शिव गोड हसला आणि म्हणाला, ‘प.पू. डॉक्टरांनी तुम्हाला किती छान शिकवले आहे !’ भगवान शिवाला साधकांचे कौतुक वाटत होते.
ई. मी काही क्षणांनी शिवाकडे पाहिले. तेव्हा मला शिवाच्या जागी ध्यानमग्न असलेले परात्पर गुरु डॉक्टर दिसू लागले. त्याच वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनीही भक्तीसत्संगात हेच सूत्र सांगितले.
६. मानससरोवराच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
अ. आम्ही सूक्ष्मातून मानससरोवर पहायला गेलो. त्यातील जल पुष्कळ निळसर आणि पारदर्शक होते; कारण सरोवराच्या काठावर निळी कांती असलेले नीलकंठ बसले होते. ते त्यांचे निळसर चरण जलात हळूवारपणे फिरवत होते.
आ. शिवाच्या बाजूला बसलेल्या माता पार्वतीनेही तिचे सुंदर चरण जलात ठेवले होते. गणपति आणि कार्तिकेय त्या पाण्याशी खेळत होते. मला ‘ते जल देवतांच्या चैतन्यस्पर्शाने तीर्थासम झाले आहे’, असे जाणवले.
इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांना सरोवरातील पाण्याचा स्पर्श अनुभवायला सांगितला. ‘प्रत्येक साधकाला तो नीट अनुभवता यावा. ‘कुणाला घाई होऊ नये किंवा कुणी त्या चैतन्यदायी जलाच्या स्पर्शापासून वंचित राहू नये’, यासाठी गुरुदेव तेथेही आम्हाला परिपूर्ण नियोजन करायला शिकवत आहेत’, असे मला जाणवत होते.
‘श्री गुरूंच्या कृपेने आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या वाणीतील चैतन्यामुळे मला या दिव्य भक्तीसत्संगात भगवंताच्या चैतन्याची अनुभूती आली अन् मनोभावे कैलासदर्शन घेता आले’, त्याबद्दल मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.२.२०२२)
|