‘वन्दे भारत’ मंगळुरूपर्यंत चालवण्यास आमचा विरोध ! – जयवंत दरेकर, कोकण विकास समितीचे अध्यक्ष
केंद्रीय रेल्वेमंत्री, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि रेल्वे प्रशासन यांना निवेदन
रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी २२२२९/२२२३० क्रमांकाची ‘मुंबई-मडगाव वन्दे भारत एक्सप्रेस’ला कोकणवासीयांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे ही एक्सप्रेस आता ८ डब्यांऐवजी १६ डब्यांची चालवणे आवश्यक बनले आहे; मात्र मुंबई-मडगाव ही वन्दे भारत एक्सप्रेस मंगळुरूपर्यंत चालवण्याचा विचार केला जात आहे, यास आम्हा कोकणवासीयांचा आक्षेप आहे, असे निवेदन कोकण विकास समितीचे अध्यक्ष श्री. जयवंत दरेकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह रेल्वे प्रशासनालाही दिले आहे.
वन्दे भारत एक्सप्रेसच्या प्रस्तावित एकत्रिकरणास ठाम विरोध असून या सेवेचा मंगळुरूपर्यंत विस्तार केल्यास मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा विभागातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.