Maldives China Relation : मालदीवशी मैत्रीपूर्ण संबंधांद्वारे तिसर्या पक्षाला लक्ष्य करण्याचा हेतू नसल्याचे चीनचे फुकाचे बोल !
बीजिंग – मालदीवशी धोरणात्मक सहकार्य भागीदारी कायम ठेवण्यास आम्ही वचनबद्ध आहोत, असे चीनने म्हटले आहे. दोन्ही देशांमधील संबंध वाढवून कोणत्याही तृतीय पक्षाला लक्ष्य करण्याचा आमचा हेतू नाही. (यावर कोण विश्वास ठेवणार ? भारताला कोंडित पकडण्यासाठीच चीन मालदीवशी जवळीक करत आहे, हे जगजाहीर आहे ! – संपादक) यासोबतच कोणत्याही तिसर्या पक्षाने यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करू नये, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी कोणत्याही देशाचे नाव न घेता व्यक्त केली. चीनने मालदीवला निःशुल्क सैनिकी साहाय्य देण्यासाठी संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे. यासंदर्भात माओ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांनी भारतीय सैनिकांच्या पहिल्या गटाला मालदीव सोडण्याची मुदत दिली होती. भारत आणि मालदीव यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर माओ यांच्या वक्तव्याचा भारताशी संबंध जोडला जात आहे.