शिवप्रेमींनी १० मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत ‘बलीदान मास’ पाळण्याचे श्री शिवप्रतिष्ठानचे आवाहन !’
नगर – धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मृतीप्रीत्यर्थ शिवप्रेमींनी फाल्गुन शुक्ल प्रतिपदा १० मार्च ते फाल्गुन अमावस्या ८ एप्रिल २०२४ या कालावधीत ‘बलीदान मास’ पाळण्याचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख बापू ठाणगे यांनी केले आहे.
हिंदवी स्वराज्यासाठी झुंज देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने बंदी बनवून त्यांचा अनन्वित छळ करत देहाचे तुकडे करून मारले. धर्मासाठी-स्वराज्यासाठी बलीदान दिल्याची ही स्मृती हिंदु मनांत जागी ठेवण्याकरिता फाल्गुन शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या या कालावधीत बलीदान मास पाळला जातो. बलीदान मास चालू होण्यापूर्वी मुंडन करण्यात येते. नगर शहरासह उपनगरात ५० ठिकाणी बलीदान मास पाळण्यासाठीचे नियोजन करण्यात आलेले आहे. सायंकाळी श्री संभाजी महाराजांची प्रतिमा आणि चरित्र ग्रंथ यांचे पूजन करून ध्येयमंत्र, प्रेरणा मंत्र म्हटला जातो. त्यांच्या चरित्राचे वाचन केल्यावर आदरांजली वाहून सांगता केली जाते. छत्रपती संभाजी महाराजांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण करत शेवटच्या दिवशी म्हणजे फाल्गुन अमावास्येला मूकपदयात्रा काढली जाते.
या महिन्याभरात गोड-धोड न खाणे, कोणत्याही आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी न होणे, पायात चप्पल न घालणे, चहा-कॉफी न पिणे, पान-तंबाखू न खाणे, दूरदर्शन वा चित्रपट न पहाणे, दिवसभरात एक वेळचे जेवण करणे, कोणतीही नवीन खरेदी न करणे अशी बंधने स्वतःवर घालून घेत ते श्रद्धेने पाळले जाते.
वढू बुद्रुक येथून ‘धर्मवीर ज्वाला’ आठवडाभर अगोदरच आणून ती नगर शहरात ठेवण्याची प्रथा गेल्या ३० वर्षांपासून जपण्यात येत आहे. या ज्वालेने ज्वाला प्रज्वलित करत नगर जिल्ह्यामधील सर्व तालुक्यांमध्ये नेण्यात येते.
मूकपदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. ज्यांना श्री संभाजी महाराजांची प्रतिमा आणि चरित्र ग्रंथ पाहिजे असेल, त्यांनी श्री. बापू ठाणगे ९४२२२२९८९७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.