‘व्हिटॅमिन (जीवनसत्त्व) बी १२’ कमतरता आहे, तर कोणता आहार घ्यावा ?
(टीप : ‘व्हिटॅमिन बी १२ हे ‘सायनोकोबालामिन’ म्हणूनही ओळखले जाते. हे पेशीपर्यंतचे चयापचय, विशेषतः ‘डी.एन्.ए.’ संश्लेषण (अनुवंशिक जनुके) आणि ऊर्जेच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.)
आजकालच्या बर्याच आजाराचे मूळ हे जीवनशैलीशी निगडित असल्याचे आढळून येते. ‘व्हिटॅमिन बी १२’ची कमतरता हीसुद्धा जीवनशैलीशी निगडित आणि विविध औषधांचा दुष्परिणाम यांमुळे सिद्ध होणारे आहे. अनेक रुग्णांमध्ये ‘व्हिटॅमिन बी १२’ची कमतरता दिसून येते. मग यासाठी इंजेक्शन, गोळ्या असे विविध उपाय चालू होतात.
१. ‘व्हिटॅमिन बी १२’ची कमतरता कशामुळे ?
‘व्हिटॅमिन बी १२’ हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व आहे. त्यामुळे ते शरिरात शोषले जाते. ‘कोबाल्ट’ हे मिनरल (खनिज पदार्थ) ‘व्हिटॅमिन बी १२’मध्ये आहे. ‘व्हिटॅमिन बी १२’ची शरिराला अतिशय अल्प प्रमाणात आवश्यकता असते. त्याचा यकृतामध्ये साठा असतो. हा साठा जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत ‘व्हिटॅमिन बी १२’ची कमतरता होण्याची शक्यता होत नाही. स्वतःचा आहार समतोल असेल, म्हणजे सगळे घटक आहारातून आपल्या शरिराला मिळत असतील, तर ‘व्हिटॅमिन बी १२’ची कमतरता सहसा होत नाही. ‘व्हिटॅमिन बी १२’ची कमतरता असेल, तर आरोग्याची हेळसांड होत आहे, असे समजावे. पालटलेली जीवनशैली हे ‘व्हिटॅमिन बी १२’ची कमतरता होण्याचे प्रमुख कारण आहे.
२. कमतरता का होते ?
अ. जर पुरेशा प्रमाणात लाळ स्रवत नसेल, तर ‘व्हिटॅमिन बी १२’ हे R प्रोटीनसोबत मिसळत नाही. त्यामुळे शरिराची ‘बी १२’ शोषून घेण्याची क्षमता न्यून होते.
आ. अनेकदा वेगवेगळ्या औषधांमुळे स्वतःचे तोंड कोरडे पडते. पुरेशा प्रमाणात लाळ स्रवत नाही. रक्तदाबावरील (‘ब्लड प्रेशर’वरील) औषधे, तसेच नैराश्यावर उपचारासाठी घेण्यात येणारी औषधे यांमुळे अनेकदा तोंड कोरडे पडते.
इ. पोटामध्ये जर अल्प प्रमाणात आम्ल (ॲसिड) स्रवत असेल, तरी ‘बी १२’ची कमतरता निर्माण होते. पोटाच्या अल्सरवर उपचारासाठी जी औषधे वापरली जातात, त्यामुळे आम्ल स्रवण्याचे प्रमाण न्यून होते. ‘व्हिटॅमिन बी १२’ची कमतरता आणि ‘अल्सर’च्या गोळ्यांमध्ये संबंध असल्याचे संशोधकांना आढळले आहे.
वय वाढत जाते, तसे पोटातील ‘ॲसिड’ स्रवण्याची प्रक्रिया मंदावते. ‘गॅस्ट्रिक सर्जरी’ (जठरासंबंधीचे शल्यकर्म), जुनाट सूज, दीर्घकाळ असलेला ‘ॲनिमिया’ (रक्तक्षय), थकवा अशा कारणांमुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. स्वादुपिंडात बिघाड हेही ‘व्हिटॅमिन बी १२’च्या कमतरतेचे प्रमुख कारण असते. ‘टाईप २’ मधुमेहामध्ये उपचारासाठी वापरले जाणारे ‘मेटफॉर्मिन बी १२’ कमतरतेसाठी कारणीभूत ठरते.
३. ‘व्हिटॅमिन बी १२’च्या कमतरतेची लक्षणे
भूक न लागणे, बद्धकोष्ठता, अशक्तपणा, हातपायाला मुंग्या येणे ही लक्षणे असतील, तर डॉक्टर चाचणी करायला सांगतात. आवश्यकता असेल, तर पूरक औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो. ‘व्हिटॅमिन बी१२’ची पातळी पुष्कळ न्यून असेल, तसेच कमतरतेची लक्षणे असतील, तरच औषध सुचवले जाते. जर ‘व्हिटॅमिन बी १२’ हे आतडी नीट शोषून घेऊ शकत नसतील, तर इंजेक्शन हा महत्त्वाचा उपाय आहे.
४. आहार काय असावा ?
अ. ‘व्हिटॅमिन बी १२’चे स्रोत – दूध, दही, ताक, प्राणीजन्य पदार्थ, मासे, अंडी, चिकन. यात ‘बी १२’चे प्रमाण चांगले असते; मात्र अनेक शाकाहारी व्यक्तींचा प्रश्न असतो की, ‘बी १२’ वाढवण्यासाठी आम्ही काय करायला हवे ? तर शाकाहारी लोकांसाठीही हे प्रमाण अधिक असणारी फळे आणि भाज्या आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ पालक, बीटरूट, ‘बटरनट स्क्वॅश’ (फळांपासून सिद्ध केलेले पेय), मशरूम आणि बटाटे यांसारख्या भाज्या ‘व्हिटॅमिन बी १२’चे चांगले स्रोत आहेत. जर तुम्ही शाकाहारी असाल, तर तुम्ही आहारात या पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
आ. भूक न लागणे, एकाग्रतेमध्ये बाधा, तोंडावर किंवा जिभेवर फोड येणे ही ‘व्हिटॅमिन बी १२’च्या कमतरतेची लक्षणे आहेत आणि ही लक्षणे दिसू लागताच फळे अन् भाज्या यांचे सेवन चालू करावे.
इ. मशरूम : मशरूममध्ये ‘व्हिटॅमिन बी १२’ अधिक असते. ‘व्हिटॅमिन बी १२’ची शरिराला असणारी प्रतिदिनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अनुमाने ५० ग्रॅम वाळलेल्या मशरूमचे सेवन करावे लागेल, तसेच सफरचंद, केळी, ब्ल्यू बेरी आणि संत्री इत्यादींमध्ये सुद्धा ‘व्हिटॅमिन बी १२’ हे थोड्या अधिक प्रमाणात मिळते.
५. योग्य आहार आणि नियमित व्यायाम हवा !
जीवनशैलीशी निगडित कोणत्याही आजारापासून दूर रहायचे असेल, तर संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. योग्य आहार आणि नियमित व्यायाम या २ गोष्टी आपल्याला कोणत्याही आजारापासून दूर ठेवू शकतात. आजपासूनच स्वतःचा आहार पालटा, तुमचे जीवन नक्की पालटेल.
– डॉ. प्रणिता अशोक, एम्.बी.बी.एस्., एम्.डी., पीएच्.डी. (आहार सल्लागार) (साभार : फेसबुक)