संपादकीय : जिहाद्यांवर अंकुश ?
ब्रिटनने त्याच्या देशात कट्टर धर्मांध इस्लामी नेत्यांना येण्यास अंतिमतः बंदी घातली आहे. तेथील गृहमंत्रालयाने हिंसाचार पसरवणार्या कट्टरतावाद्यांवर कारवाईसाठी पोलिसांना मोकळीक दिल्याचेही स्पष्ट केले आहे. विलंबाने का होईना, हिंदु वंशाचे पंतप्रधान ऋषि सुनक यांनी वरील निर्णय घेतला आहे; मात्र आता परिस्थिती काहीशी हाताबाहेरही गेली आहे. ब्रिटन कितीही उजव्या विचारांचा वाटला, तरीही जगातील अन्य सर्व राष्ट्रांप्रमाणे तिथेही ‘तथाकथित मानवतावादी गट’ कार्यरत आहे, जो सातत्याने इस्लामची बाजू घेत असतो. ब्रिटनमध्ये मुसलमानांची प्रचंड वाढ झाल्याने या गटाच्या चळवळीही वाढल्या आहेत. त्यामुळेच इस्रायल-हमास युद्ध चालू झाल्यापासून ब्रिटनमध्ये बर्याच वेळा पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. अशाच इस्लामप्रेमींनी भरलेल्या ‘बीबीसी’ या तेथील जगप्रसिद्ध वृत्तसंस्थेने वर्ष २००२ मधील गुजरात दंगलीत सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष ठरवूनही पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील लघुपट प्रसिद्ध केला होता. इस्लामप्रेम करायचे म्हटले की, अपरिहार्यपणे हिंदु धर्मियांचा द्वेष हा ओघाने करावाच लागतो.
इस्लामच्या धोक्याची जाणीव !
ब्रिटीश सरकारच्या सल्लागारांनी नुकताच एक अहवाल देऊन जगभराप्रमाणे तिथेही साम्यवादी आणि कट्टर इस्लामी गटांनी एकत्र येऊन ब्रिटनला धोका निर्माण करण्याचा डाव आखल्याचा अहवाल दिला आहे. तेथील माजी गृहसचिवांनीही कट्टरतावाद्यांवर बंदी न घातल्यास ब्रिटनला धोका असल्याचे विधान केले. जगभर आतंकवाद माजवणारे जिहादी ब्रिटनमध्ये काही वेगळे करत असतील, असे नाही; परंतु भारताप्रमाणेच ब्रिटनलाही मुसलमानांची लोकसंख्या प्रचंड वाढल्यानंतर आता इस्लामच्या धोक्याची जाणीव झाली आहे. ब्रिटनमध्ये मुसलमानांची लोकसंख्या तब्बल ४४ टक्क्यांनी वाढली असून इस्लामी आक्रमणाच्या घटनाही गेल्या २-३ वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ऋषि सुनक यांनी ब्रिटनच्या माजी गृहमंत्री सुएला ब्रेवरमॅन यांना इस्लामविरोधी वक्तव्य केल्याने काढून टाकल्याचे सर्वांना ठाऊक आहे. आता पुन्हा ‘ब्रिटनमध्ये आतंकवाद्यांची कृत्ये वाढत असून ब्रिटन त्याची सर्वधर्मसमभावाची ओळख विसरत चालला आहे’, असे ब्रेवरमॅन यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर सुनक हे इस्लामी कट्टरतावाद्यांचे तुष्टीकरण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. न्यायपालिका, महाविद्यालये सगळीकडेच कट्टरतावादी आता वरचढ ठरत असल्याविषयी त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे. तसेच ‘मला काढून टाकण्यात आले असले, तरीही याविषयी मी जागृती करत राहीन’, असेही म्हटले आहे; परंतु आता सुनक हेही सतर्क झाले असून ३ दिवसांपूर्वीच त्यांनी म्हटले आहे की, ब्रिटनमध्ये जगभरातून विविध धर्म-पंथ यांचे लोक येत आहेत. ते देशभक्त होऊन गुण्यागोविंदाने राहू शकतात; परंतु सध्या तसे होत नाही, कट्टरतावाद्यांच्या कारवाया वाढत चालल्या आहेत.
जिहादी आक्रमणांचा इतिहास !
इंग्लडमध्ये वर्ष १९७० ते १९८० च्या दशकात मुसलमानांना वसवण्यास प्रारंभ झाला. त्याचे परिणाम आज ब्रिटन भोगत आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. पुष्कळ जणांना ठाऊक नाही की, ‘लव्ह जिहाद’ हा शब्द प्रथम ब्रिटनमध्ये वापरण्यात आला आहे. तेथील पत्रकारांनी ‘लव्ह जिहाद’चा धोका ओळखून प्रथम त्याविषयी आवाज उठवला होता; नंतर भारतात या विरोधात चळवळ चालू करण्यात आली. ब्रिटनमधील मुसलमान बंदीवान कारागृहातील इतर धर्मीय बंदीवानांचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करत असल्याचेही एप्रिल २०२३ मध्ये उघडकीस आले होते. ब्रिटनच्या संसदेचे आजन्म सदस्य लॉर्ड नजीर अहमद यांना मुलांचे लैंगिक शोषण करण्यावरून ५ वर्षांची शिक्षा झाली आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये ब्रिटनमध्ये झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर तिथे लिसेस्टर येथील हिंदूंच्या घरांवर ‘अल्ला-हो-अकबर’, ‘मोदी कुत्ता मुर्दाबाद’, ‘सर तन से जुदा’, अशा घोषणा देत मुसलमान आक्रमण करत असल्याचे व्हिडिओज प्रसिद्ध होत होते. सुमारे १ मास ही दंगलसदृश स्थिती कायम होती. ‘काश्मीरप्रमाणेच हिंदूंना हाकला’, अशा घोषणा त्यांनी दिल्या. ९ हिंदूंना घरे सोडावी लागली. मंदिरांवर आक्रमणे झाली. हिंदूंवरील मुसलमानांची आक्रमणे एवढी वाढली की, १८० हून अधिक भारतीय आणि हिंदु संघटना यांनी ब्रिटनच्या तत्कालीन पंतप्रधान लिझ ट्रस यांना पत्र लिहून काही मागण्या केल्या अन् यात त्यांना ब्रिटनमध्ये भीती वाटत असल्याचे म्हटले. म्हणजे भारतात मुसलमान सर्वाधिक सुरक्षित असून ते असुरक्षित असल्याचा कांगावा करतात आणि भारताबाहेरील ब्रिटनसारख्या सर्वांत जुनी लोकशाही असलेल्या अन् लोकशाहीचा टेंभा मिरवणार्या ब्रिटनसारख्या देशात मात्र ‘वास्तवात तेथील मुसलमानेतरांना मुसलमानांपासून खरोखरच धोका असूनही इतकी वर्षे मानवतावादाच्या झापडांमुळे त्यांना जाग आली नव्हती’, असेच म्हणावे लागेल. मानवी हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्य यांच्याविषयी इतरांना धडे शिकवणार्या ब्रिटनमध्ये मुसलमानांनी असा धिंगाणा घातला, हे लक्षात घेतले पाहिजे.
वर्ष २०१८-२०१९ मध्ये इंग्लडमधील १९ सहस्र अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि दीड सहस्र मुलींचा विनयभंग ‘ग्रूमिंग गँग’ (अल्पवयीन मुलींना फसवून किंवा त्यांना प्रेमपाशात ओढून त्यांच्यावर अत्याचार करणारी टोळी) कडून करण्यात आला. ब्रिटीश पोलिसांनी केवळ ‘वर्णद्वेषाचा शिक्का बसू नये’ म्हणून कारवाई केली नाही. इतरांना कायदे शिकवणार्या या देशात मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याने इस्लामपोषक वातावरण निर्माण झाले आहे, हे लक्षात येईल.
फ्रान्स आणि युएई यांच्याकडून बोध घ्या !
फ्रान्सने ४ मार्चलाच पाकच्या आतंकवाद्यांना फ्रान्समध्ये थारा मिळणार नसल्याची कडक चेतावणी दिली. त्याने २३ सहस्र घुसखोरांना बाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात बहुसंख्य पाकचे आहेत. देशाच्या राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्या इमामालाही त्यांनी काढून टाकले. संयुक्त अरब अमिरातनेेही (युएई) पाकच्या आतंकवादी प्रवृत्तीच्या ९५० लोकांना शोधून एका जहाजात बसवून पाकला परत पाठवले. ब्रिटनसह या देशांनीही पाकपुरस्कृत आतंकवाद्यांच्या विरोधात ठोस पाऊल उचलले आहे. भारतानेही या देशांचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा आहे. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सीएए (नागरिकत्व सुधारणा कायदा) आणणार असल्याचे विधान गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. त्यानंतर काही इस्लामी घुसखोर देशाबाहेर जातात का ? हे लक्षात येईल; परंतु येत्या काळातील दंगलींची शक्यता लक्षात घेता धर्मांध कट्टरतावाद्यांना देशात येण्यास बंदी घालणे आणि पाकपुरस्कृत जिहाद्यांना देशाबाहेर पाठवणे, हेच लवकरात लवकर केल्यास संभाव्य देशहानी अल्प होईल !
विविध देश आतंकवाद्यांच्या संदर्भात राबवत असलेली धोरणे भारतानेही राबवल्यास आपत्काळात देशहानी अल्प होईल ! |