पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना पॅरोल आणि आयुर्वेदाच्या उपचारांचा अधिकार मिळावा !
श्री योग वेदांत समितीसह अन्य हिंदु संघटनांची मागणी !
मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – खोट्या आरोपांखाली जोधपूर कारागृहात ठेवलेले ८६ वर्षीय संत पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना पॅरोल (संचित रजा) आणि आयुर्वेदाच्या उपचारांचा अधिकार मिळावा. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कारागृहात जाण्यापूर्वी ट्रायजेमिनल न्युराल्जिया (चेहर्याच्या एका बाजूला विजेचा धक्का बसल्याप्रमाणे वेदना होणे) आणि पाठदुखी यांचा त्रास होत होता. ११ वर्षांहून अधिक काळ सतत कोठडीच्या तणावपूर्ण वातावरणामुळे, आता वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांना हृदयविकार, ‘प्रोस्टेट’, संधिवात आणि अशक्तपणा इत्यादी नवीन आजारांनीही ग्रासले आहे. ‘एम्स्’च्या अहवालानुसार त्यांचा हृदयविकाराचा त्रास गंभीर आहे. (त्यांच्या हृदयात ३ अडथळे आहेत.) बापूजींना सतत रक्तस्राव होत आहे, त्यामुळे त्यांची हिमोग्लोबिनची पातळी सतत घसरत असून त्यांची प्रकृती ढासळत आहे. आधुनिक वैद्यकीय उपचारांचा आवश्यक लाभ दिसून येत नाही. त्यामुळे मूलभूत अधिकार म्हणून त्यांना आयुर्वेदिक उपचार आणि वैद्यकीय पॅरोल मिळावा, यासाठी आझाद मैदान येथे श्री योग वेदांत समिती, महिला संघटना आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शांततापूर्ण आंदोलन केले. यानंतर येथील प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती दिली. या वेळी मंचावर अधिवक्त्या नीलम दुबे, सनातन हिंदु सिंधी ट्रस्टचे श्री. सुनील नागपाल, युवा हितकारिणी संघाचे श्री. संदीप मिश्रा, भारतीय युवा शक्तीचे अध्यक्ष श्री. सर्वेश चौरसिया, तसेच श्री. संजय ठक्कर उपस्थित होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.