उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप !
भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे शिंदे-फडणवीस यांना पत्र !
मुंबई – पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवले असून त्यामध्ये ‘उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून मला धमक्या दिल्या जात असून त्यामुळे माझ्या जिवाला धोका आहे’, असा आरोप केला आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, इंदापूरमधील मित्रपक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे आणि सभा यांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर एकेरी अन् शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करत आहेत. त्याचसमवेत तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे. ही गोष्ट अतिशय गंभीर असून आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण याविषयी ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.