साधकांवर मातृवत् प्रेम करणार्या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४२ वर्षे) !
पुणे येथील सनातनच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांचा दासनवमी, म्हणजे माघ कृष्ण नवमीला (५.३.२०२४) तिथीनुसार ४२ वा वाढदिवस झाला. पू. ताईंना तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असतांनाही त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा ढळली नाही. त्या साधकांना सहज आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन करून साधकांचीही परात्पर गुरु डॉक्टरांवरील श्रद्धा दृढ करतात.
पू. (सौ.) मनीषा पाठक यांची पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन आणि त्यांच्या संत-सन्मान सोहळ्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. ५.३.२०२४ या दिवशी यातील काही सूत्रे आपण पाहिली. आज पुढील भाग पाहू.
(भाग २)
‘आपल्याला व्यावहारिक जीवनातील काही हवे असल्यास कष्ट घ्यावे लागतात. असे आहे, तर आपल्याला देव हवा असल्यास साधनेसाठी आपली कितीतरी कष्ट घ्यायची तयारी हवी !’– पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (१६.३.२०२३) |
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/770643.html
४. सौ. सुलोचना कुंभार (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५३ वर्षे)
४ अ. सद्गुरु स्वाती खाडये यांचे आज्ञापालन करणे : ‘पू. (सौ.) मनीषा पाठक सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितलेल्या प्रत्येक सूत्राचे आज्ञापालन करतात आणि त्याप्रमाणे कृती करतात. सद्गुरु स्वातीताईंनी सांगितलेल्या कृती करतांना पू. मनीषाताईंच्या चेहर्यावर सहजभाव असतो. ‘सद्गुरु स्वातीताई आणि पू. मनीषाताई यांचे नाते गुरु-शिष्याप्रमाणे आहे’, असे मला वाटते. त्या दोघीही हसतखेळत सेवेतील आनंद घेत असतात.
४ आ. सौ. मनीषा पाठक संत होण्याच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना : दासनवमीला पू. मनीषाताईंचा वाढदिवस साजरा झाला. त्या दिवशी पू. ताईंना औक्षण करतांना त्यांच्या ठिकाणी मला श्री दुर्गादेवीचे रूप दिसले. त्या क्षणी मला वाटले, ‘ताई आता संत होतील’ आणि तसेच झाले.’
५. सौ. राधा सोनवणे, पुणे
५ अ. प्रेमभाव : ‘पू. मनीषाताई प्रत्येक साधकाची आत्मीयतेने आणि प्रेमाने विचारपूस करून त्यांना आपलेसे करतात. पू. ताईंना कोणत्याही साधकाकडून अपेक्षा नसते. साधक व्यष्टी आणि समष्टी साधना करत नसले, तरी पू. ताई त्यांच्याशी प्रेमाने बोलून त्यांना आधार देतात. साधक काही वर्षांनी दिसल्यासही पू. ताई अन्य साधकांना सांगतात, ‘‘त्यांना आधार देऊया. त्यांना आपलेसे करूया. साधक कुठल्या कुठल्या परिस्थितीतून येतात. आपण ती परिस्थिती समजून घेऊन त्यांना प्रेम देण्यासाठी प्रयत्न करूया.’’
६. सौ. शारदा हुमनाबादकर, पुणे
६ अ. प्रेमभाव : ‘पू. ताईंनी ‘साधकांचे कौतुक करणे, साधकांच्या गुणांविषयी बोलणे, साधक परिस्थितीवर मात करून सेवा चांगली कशी करतात ?’, याविषयी सांगणे’, यांमुळे सर्वांच्या मनात त्या साधकाविषयी प्रेम आणि आत्मीयता निर्माण होते. कोरोना महामारीच्या काळात अनेक साधक रुग्णाईत होते. काही जणांचे कुटुंबीय रुग्णाईत होते. पू. ताई त्या प्रत्येकाशी बोलत असत. त्या संतांना विचारून रुग्णाईतांसाठी नामजपादी उपाय सांगत असत. ज्यांची स्थिती गंभीर होती, त्यांना साहाय्य करण्यासाठी त्यांनी काही साधकांचे नियोजन केले होते.
६ आ. गुरुकार्याचा ध्यास : पू. ताईंना बरेच शारीरिक त्रास असूनही त्या सतत सेवारत रहातात. त्यांना त्रास होत असतांना त्या पलंगावर पहुडून सत्संग घेतात. पू. ताई कोरोना महामारीच्या कालावधीत २ वर्षे रामनाथी आणि देवद येथील सनातनच्या आश्रमात होत्या. तेव्हा ‘त्या पुणे येथे नाहीत’, असे आम्हाला जाणवलेच नाही. ‘त्या सत्संग घेत असल्याने आणि त्यांच्याशी अनौपचारिक बोलणेही होत असल्याने त्या जवळच आहेत’, असे आम्हाला वाटत होते.’
७. सौ. सुषमा संतोष चंदुरकर, पुणे
७ अ. साधकांना व्यष्टी साधनेचा आढावा देण्याची गोडी लावणे : ‘पू. मनीषाताईंमुळेच मला व्यष्टी साधनेचा आढावा देण्याची गोडी लागली. ४ वर्षांपूर्वी आढावा देतांना मला ‘तो कसा द्यायचा ? नेमकेपणाने काय सांगायचे ?’, हे कळत नव्हते. पू. ताईंनी मला ते समजावून सांगितले. त्यांच्या बोलण्यातून उभारी मिळून मी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात चुका सांगण्याचा प्रयत्न करू लागले.’
७ आ. पू. मनीषाताईंच्या संत-सन्मान सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती
१. पू. मनीषाताईंच्या संत-सन्मान सोहळ्याच्या वेळी ‘माझे अनाहतचक्र नामजप करत आहे’, असे मला वाटत होते.
२. सोहळा चालू झाल्यावर माझ्या अंतर्मनात ‘धन्य धन्य हम हो गए गुरुदेव…’ हे गीत चालू झाले. त्या वेळी माझा भाव दाटून येत होता. मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. सोहळा संपेपर्यंत सतत हे गीत माझ्या अंतर्मनात चालू होते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.३.२०२३)
(क्रमशः)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |