५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अहिल्यानगर येथील चि. कैवल्य प्रथमेश केंगे (वय दीड वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. कैवल्य प्रथमेश केंगे हा या पिढीतील एक आहे !
चि. कैवल्य पू. (कै.) सौ.पद्मावती केंगे (अहिल्यानगर, सनातनच्या ३७ व्या (व्यष्टी) संत) यांचा पणतू आहे. त्याच्या आईला आणि आजीला (आईच्या आईला) गर्भधारणेपूर्वी अन् नंतर आलेल्या अनुभूती, तसेच त्याचे आजी-आजोबा (आई आणि वडील यांचे आई-वडील) यांना कैवल्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. गर्भधारणेपूर्वी आलेल्या अनुभूती
१ अ. देवीचे नवरात्र चालू असतांना स्वप्नात दत्ताच्या पादुका दिसणे : ‘मला गर्भधारणा झाली आहे’, हे ठाऊक नसतांना मला स्वप्नात गाणगापूर येथील दत्ताच्या पादुका दिसायच्या. तेव्हा ‘देवीचे नवरात्र चालू असतांना मला दत्ताच्या पादुका का दिसतात ?’, असा मला प्रश्न पडत असे.
१ आ. स्वप्नात स्वतः लहान मुलगी असून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांवर फुले वहातांना दिसणे : मला स्वप्नात दिसायचे, ‘पांढरा सदरा आणि पायजमा घातलेले प.पू. गुरुदेव आसंदीत बसले आहेत. मी एक छोटी मुलगी आहे. मी ओंजळीतून पांढरे फूल आणून ते गुरुदेवांच्या चरणांवर वाहून त्यांना नमस्कार करत आहे.’
१ इ. मला ‘श्रीरामाचा नामजप करावा’, असे वाटायचे. त्यानंतर ‘मला गर्भधारणा झाली आहे’, असे निदान झाले.’
– सौ. स्नेहा प्रथमेश केंगे (चि. कैवल्यची आई), अहिल्यानगर
१ ई. सोनई (अहिल्यानगर) येथील श्री रेणुकामाता मंदिर परिसरातील कुंडातील पाण्यात असलेल्या घागरीत केवळ सौ. स्नेहाचे नाणे पडणे आणि त्यानंतर लगेच सौ. स्नेहा गर्भवती असल्याचे निदान होणे : ‘आम्ही सर्व जण अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथील श्री रेणुकामाता मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. तिथे असलेल्या कुंडातील पाण्यात एक मोठी घागर आहे. वरूनच त्या घागरीमध्ये नाणे टाकण्याची प्रथा आहे. क्वचित्च एखाद्याचे नाणे त्या घागरीत पडते. त्या दिवशी आमचे कुणाचेही नाणे त्यात पडले नाही. केवळ सौ. स्नेहाचे नाणे त्या घागरीमध्ये पडले. मला तो शुभशकुन वाटला. त्यांनतर आठच दिवसांनी ती गर्भवती असल्याचे निदान झाले.
त्या काळात स्नेहाची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती. तिला अनेक त्रास झाले; मात्र गुरुदेवांच्या कृपेमुळे ते त्रास ती सहन करू शकली.
२. गर्भधारणेनंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
२ अ. अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णी यांनी ‘सौ. स्नेहाच्या चैतन्यात पुष्कळ वाढ झाली असून ती कदाचित् गर्भामुळे असेल !’ असे सांगणे : त्यानंतर स्नेहा एकदा अहिल्यानगर येथील सेवाकेंद्रात सेवेसाठी गेली होती. तेव्हा छत्रपती संभाजीनगर येथील सनातनचे ९८ वे (समष्टी) संत अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णी सेवाकेंद्रात आले होते. नंतर त्यांनी मला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘मला सेवाकेंद्रात तुमची कन्या भेटली होती. तिच्या चैतन्यात पुष्कळ वाढ झाली आहे. कदाचित् ती गर्भामुळे असेल !’’ ‘सौ. स्नेहा गर्भवती आहे’, असे समजल्यावर ते तिच्यासाठी नामजप आणि प्रार्थना करत होते.
२ आ. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार असलेले आणि अध्यात्मातील एका अधिकारी व्यक्तीने सौ. स्नेहाला ‘श्रीरामासारखा तेजस्वी पुत्र होईल’, असा आशीर्वाद देणे : ‘लासलगावच्या जवळच साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे एक वर्गणीदार आहेत. ते अध्यात्मातील अधिकारी असून ते भविष्यही जाणतात. एकदा मी काही कारणास्तव त्यांना भ्रमणभाष केला होता. तेव्हा त्यांनी ‘स्नेहाला श्रीरामासारखा तेजस्वी पुत्र होईल’, असा आशीर्वाद दिला.
२ इ. सौ. स्नेहासाठी केलेल्या पोळीवर ॐ उमटणे : स्नेहाच्या प्रसुतीपूर्वी मी तिच्या अल्पाहारासाठी पोळी केली होती. त्या पोळीवर ‘ॐ’ स्पष्टपणे उमटला होता.
३. प्रसुती
३ अ. सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांनी दिलेल्या आध्यात्मिक उपायांमुळे कठीण परिस्थिती असतांनाही नैसर्गिक प्रसूती होणे : स्नेहाला प्रसुतीसाठी नेल्यावर मी सद्गुरु नंदकुमार जाधव यांना भ्रमणभाष केला. तेव्हा त्यांनी मला धीर दिला आणि तातडीने स्नेहासाठी आध्यात्मिक नामजपादी उपाय सांगितले. त्यामुळे कठीण परिस्थिती असतांनाही तिची १ घंट्यातच नैसर्गिक प्रसुती झाली. आधुनिक वैद्यही स्नेहाला म्हणाले, ‘‘तुझी नैसर्गिक प्रसुती होणे, म्हणजे एक आश्चर्यच आहे.’’
४. वय जन्म ते ३ मास
४ अ. पहिला दिवस : जन्मतः बाळाचे वजन पुष्कळ अल्प (१७०० ग्रॅम)(टीप) होते; परंतु तो तेजस्वी दिसत होता. त्याची प्रतिकार क्षमताही उत्तम होती. त्याला कुठलाही शारीरिक त्रास झाला नाही. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी त्याला लगेच दुसर्या दिवशी घरी सोडले.
(टीप – सामान्यतः नवजात बाळाचे वजन अडिच किलो (२५०० ग्रॅम असते.)
४ आ. दुसरा दिवस : जन्मानंतर दुसर्या दिवशी दुपारी २ वाजता त्याला घरी आणले आणि ३ वाजता प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्त (२२.५.२०२२ (वैशाख कृष्ण सप्तमी) या दिवशी) झालेल्या रथोत्सवाचे प्रक्षेपण चालू झाले. त्याच क्षणी बाळाने तिकडे मान वळवली आणि तो एकटक प.पू. गुरुदेवांकडे पाहू लागला.
४ इ. कैवल्यच्या हाताच्या नेहमी मुद्रा असतात.
४ ई. त्याच्या अंगावर अनेक वेळा दैवीकण दिसतात.
४ उ. मला सेवा करायची असतांना मी त्याला म्हणत असे, ‘‘बाळा, तू आता झोप. मला सेवा करायची आहे.’’ तेव्हा तो माझी सेवा पूर्ण होईपर्यंत झोपत असे.’
– सौ. निलिमा सुशील कुलकर्णी (चि. कैवल्यची आजी (आईची आई), लासलगाव (जि. नाशिक)
४ ऊ. ‘चि. कैवल्यकडे बघितल्यावर पुष्कळ आनंद जाणवून ‘त्याला सारखे जवळ घ्यावे’, असे वाटायचे.’ – आधुनिक वैद्य सुशील कुलकर्णी (चि. कैवल्यचे आजोबा (आईचे वडील), वय ६३ वर्षे), लासलगाव, जि. नाशिक
५. वय ४ ते ६ मास
५ अ. भ्रमणभाषवर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडे पहात त्यांचे बोलणे ऐकणे : ‘कैवल्य ५ मासांचा असतांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ अहिल्यानगर येथे आल्या होत्या. श्री. दिलीप केंगे (चि. कैवल्यचे आजोबा-वडिलांचे वडील) यांनी भ्रमणभाषवरून ‘व्हिडिओ कॉल केला’ होता, तेव्हा तो श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे पहात ‘त्यांचे बोलणे ऐकत आहे’, असे आम्हाला वाटले. त्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी त्याच्या कानात त्याचे नाव सांगितले. (त्यांनी आधीच आम्हाला हे नाव सुचवले होते. या प्रसंगी त्यांनी ते नाव त्याच्या कानात सांगितले.)’ – सौ. निलिमा सुशील कुलकर्णी
५ आ. सात्त्विक गोष्टींची ओढ
१. ‘तो घराबाहेर लावलेल्या ‘सनातनच्या आकाशकंदीलाकडे ने’, असे हात करून मला सांगत असे. त्यावरील गुरुकृपायोगाचे चिन्ह पाहून त्याला पुष्कळ आनंद होत असे. ते हातात पकडण्यासाठी तो प्रयत्न करत असे.
२. सकाळी पूजा करतांना घंटीचा आवाज आल्यावर तो कुठेही असला, तरी मांडीवर येऊन बसतो आणि विभूती लावण्यासाठी डोके पुढे करतो.’
– आधुनिक वैद्य सुशील कुलकर्णी
५ इ. ‘चि. कैवल्य झोपेतून उठल्यावर कधीही रडत नाही. तो लगेच खेळायला लागतो.
५ ई. त्याचा चेहरा हसरा आणि तेजस्वी असून तो इतरांचे लक्ष वेधून घेतो.
५ उ. त्याचे आई-बाबा बाहेर गेल्यानंतर तो ३ – ४ घंटे आमच्याजवळ सहजतेने न रडता रहातो.’
– सौ. सुचित्रा दिलीप केंगे, (चि. कैवल्यची आजी (वडिलांची आई)) आणि श्री. दिलीप केंगे (कैवल्यचे आजोबा (वडिलांचे वडील), वय ६५ वर्षे), अहिल्यानगर
६. वय ७ ते ९ मास
अ. ‘त्याला केवळ श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची भक्तीगीते आवडतात. ती ऐकतांना तो गुडघ्यावर बोटाने ठेका धरायचा; पण चित्रपटातील गीत चालू असेल, तर तो ठेका धरत नसे.
आ. तो भ्रमणभाषवरील प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राची सारखी पापी घेत असे.
इ. सत्संग चालू असतांना तो शांत राहून ऐकत असे.
‘हे गुरुदेवा, चि. कैवल्यला नेहमी तुमच्या चरणांशी ठेवा. त्यालाही धर्मप्रसाराच्या कार्यात सहभागी करून घ्या’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे !’
– सौ. निलिमा सुशील कुलकर्णी
७. वय १० मास ते १ वर्ष
अ. ‘जयघोष करतांना कैवल्य हसून हात वर करून प्रतिसाद देतो.
आ. एकदा सांगितलेली एखादी गोष्ट त्याच्या लक्षात रहाते.
इ. त्याची निरीक्षण क्षमता पुष्कळ चांगली आहे.
ई. अग्निहोत्र करतांना तो जवळ येऊन बसतो आणि हाताची मुद्रा करून ‘ॐ’, असा नामजप करतो.’
– सौ. सुचित्रा दिलीप केंगे आणि श्री. दिलीप केंगे, अहिल्यानगर (२५.१२.२०२३)