जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे रक्तसंकलनाचे कार्य गौरवास्पद ! – उद्योगमंत्री उदय सामंत
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांना राज्यशासनाच्या वतीने रक्तसंकलनाविषयी देण्यात आले मानपत्र !
नाणीज (ता. रत्नागिरी) – जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानने महाराष्ट्रासह अन्य राज्यांत १५ दिवसांत ८१ सहस्र २६० कुपिका रक्तसंकलन केले, हा जागतिक विक्रम असू शकतो, असे गौरवोद्गार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काढले. रक्तसंकलनाविषयी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांना राज्यशासनाच्या वतीने मानपत्र देऊन गौरव करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.
संतशिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन आणि आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज यांच्या जयंती नाणीज येथील संस्थानच्या सुंदरगडावर साजरी करण्यात आली. या वेळी हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषदेचे सहसंचालक डॉ. महेंद्र केंद्रे यांच्या हस्ते जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांना राज्यशासनाच्या वतीने देण्यात आलेले मानपत्र प्रदान करण्यात आले. तसेच महारक्तदान शिबिरात चांगले कार्य करणार्या केंद्रांचा, जिल्ह्यांचा आणि उपपिठांचा या वेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै. ‘रत्नागिरी टाइम्स’चे संपादक उल्हासराव घोसाळकर होते. प्रस्तावना संस्थानचे श्री. सुनील ठाकूर यांनी केली.
उद्योगमंत्री सामंत पुढे म्हणाले, ‘‘प.पू. कानिफनाथ महाराज यांनी या पिठाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले आहे. संस्थानचा आरोग्य विभाग राज्यशासनाच्या आरोग्य विभागापेक्षा अधिक सक्षम आहे; कारण संस्थानची रुग्णवाहिका सरकारच्या रुग्णवाहिकेच्या अगोदर अपघातस्थळी पोचते. सरकार अधिकाधिक ५०० बाटल्या रक्त संकलित करते; पण संस्थानचे रक्तसंकलन विक्रमी आहे.
श्री. उल्हास घोसाळकर म्हणाले, ‘संस्थानचे रक्तदानासारखे कार्य प्रचंड आहे. त्याचे सारे श्रेय जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांना जाते. त्यांनी संकल्प केला की, तो लगेच पूर्ण केला जातो.
डॉ. महेंद्र केंद्रे म्हणाले, ‘‘संस्थानने मोठ्या संख्येने रक्त संकलन करून राज्याची साधारण ४० दिवसांची गरज भागली आहे. या रक्तदान कार्यक्रमातून महाराजांनी त्यांचा ‘तुम्ही जगा, इतरांना जगवा’, हा उपदेश प्रत्यक्षात आणला आहे.’’