रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले डॉ. एस्. जयशंकर यांचे कौतुक !
मॉस्को (रशिया) – ‘युक्रेन युद्धाच्या वेळी भारत रशियाकडून तेल का खरेदी करत आहे ?’, असा प्रश्न रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांना एका कार्यक्रमात विचारण्यात आला. यावर लॅव्हरोव्ह यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे कौतुक करत म्हटले की, माझे मित्र जयशंकर यांनी याचे चांगले उत्तर दिले होते. त्यांनी जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रांमध्ये दिलेल्या उत्तराचा दाखला दिला. ते म्हणाले की, जयशंकर यांनी पाश्चात्त्य देशांना ‘तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या’, असा सल्ला दिला होता. पाश्चात्त्य देश रशियाकडून किती प्रमाणात तेल विकत घेत आहेत, याचीही आठवण त्यांनी करून दिली होती.
सौजन्य एएनआय न्यूज
शीतयुद्धात रशियाने भारताला पाठिंबा दिला होता !
लॅव्हरोव्ह पुढे म्हणाले की, रशिया आणि भारत हे नेहमीच चांगले मित्र राहिले आहेत. शीतयुद्धाच्या काळात पाश्चिमात्य देशांनी जेव्हा भारताला शस्त्रपुरवठा बंद केला, तेव्हा मॉस्कोने भारताला पाठिंबा दिला होता. रशियाने भारतासमवेत ‘ब्राह्मोस’ या अत्याधुनिक क्षेपणास्त्राचे संयुक्त उत्पादन चालू केले आहे.
भारत एकूण तेल खरेदीपैकी ४० टक्के कच्चे तेल एकट्या रशियाकडून खरेदी करतो !
भारताने वर्ष २०२० मध्ये रशियाकडून आवश्यक असलेल्या कच्च्या तेलाच्या केवळ २ टक्के तेल खरेदी केले. रशिया-युक्रेन युद्ध चालू होण्यापूर्वी, म्हणजे साधारण वर्ष २०२१ च्या शेवटी हे प्रमाण वाढून १६ टक्के झाले, तर वर्ष २०२२ मध्ये ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढले. सध्या भारत त्याच्या एकूण कच्च्या तेलाच्या आवश्यकतेच्या ४० टक्के तेल एकट्या रशियाकडून खरेदी करत आहे.