कार्य आणि वाङ्मय यांच्या रूपाने कार्यरत असलेले समर्थ रामदासस्वामी !
आज (५ मार्च २०२४ या दिवशी) ‘रामदास नवमी’ आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !’
‘माघ कृष्ण ९ या तिथीच्या दिवशी स्वतःची भगवद्भक्ती आणि ईश्वरोपासनेचे तेज यांच्या बळावर महाराष्ट्राला प्रपंचविज्ञान शिकवून चेतना देणारे विख्यात राष्ट्रसंत श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी समाधी घेतली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूची वार्ता समजताच ‘श्रींची इच्छा’, असे म्हणून समर्थ आपल्या खोलीत गेले. त्यांनी खाणे-पिणे सोडून दिले. केवळ दुधावर निर्वाह करून बाहेरचे हिंडणे-फिरणेही बंद केले. पुढे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पत्र लिहून ‘शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ।।’, असा उपदेश केला. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत होती. माघ कृष्ण नवमी या दिवशी श्रीराममूर्तीस साष्टांग नमस्कार घालून स्वामी मूर्तीसम्मुख भूमीवर बसले. शेवटची वेळ येऊन ठेपली होती.
समर्थांनी उपदेश केला,
माझी काया गेली खरे । परि मी आहे जगदाकारे ।
ऐका स्वहित उत्तरे । सांगेन ती ।
नका करू खटपट । पहा माझा ग्रंथ नीट ।
तेणे सायुज्याची वाट । ठाई पडे ।।
अर्थ : समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘‘माझा देह जरी नष्ट झाला, तरी मी माझ्या कार्याच्या आणि वाङ्मयाच्या रूपाने या जगात अस्तित्वात आहे. त्या माध्यमातून मी तुमच्या ऐहिक आणि पारलौकिक उन्नतीला हितकारक अशी उत्तरे देईन. अन्यत्र कुठेही न जाता माझ्या ग्रंथांचा अभ्यास करा. मुक्तीच्या ४ प्रकारांपैकी सायुज्य ही सर्वश्रेष्ठ आणि अंतिम मानली जाते. या ग्रंथांमधील मार्गदर्शनानुसार साधना केली असता सायुज्य मुक्तीचा मार्ग सुकर होतो.’’
शेवटी स्वामींनी ‘हर हर’ हा शब्द २१ वेळा उच्चारून ‘श्रीराम’ या शब्दासमवेत अवतार समाप्त केला.
समर्थ रामदासस्वामी यांचा जन्म शके १५३० मध्ये रामजन्माच्या दिवशी झाला. समर्थ जांब गावचे सूर्याजीपंत ठोसर यांचे चिरंजीव. प्रथमपासूनच रामदासस्वामी विरक्त होते. विवाहाच्या वेळी ते घरातून पळून गेले. नाशिकजवळील टाकळी येथे १२ वर्षे त्यांनी खडतर तपश्चर्या केली. पुढे १२ वर्षे संपूर्ण हिंदुस्थानात भ्रमण करून देशस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आणि दुःखाने विव्हळ होऊन कृष्णातिरी लोकजागृती अन् धर्मप्रसार करणार्या समर्थ संप्रदायाची उभारणी केली.’
लेखक : प्रल्हाद नरहर जोशी
(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))