सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी अपार श्रद्धा आणि भाव असणारे रामनाथी, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले अधिवक्ता रामदास केसरकर (वय ७१ वर्षे) !
वर्ष २००५ मध्ये मिरज येथील न्यायालयीन सेवेच्या निमित्ताने अधिवक्ता रामदास केसरकरकाका यांच्याशी माझा प्रथम संपर्क आला. तेव्हापासून मी सेवेच्या निमित्ताने काकांच्या संपर्कात आहे. त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. साधी रहाणी आणि प्रेमभाव
अधिवक्ता रामदास केसरकरकाकांचे रहाणीमान अत्यंत साधे आहे. काका वय, ज्ञान आणि अनुभव यांनी मोठे असूनही त्यांच्या बोलण्यात अहं नसतो. ते सर्वांशी आदराने, प्रेमाने आणि आपुलकीने बोलतात. ते सेवेसंदर्भातील त्यांचे मत सुस्पष्ट, मोकळेपणाने आणि प्रांजळपणे मांडतात.
२. सेवा उत्साहाने आणि तळमळीने करणे
पूर्वी काका कुडाळ येथून प्रवास करून मिरज येथे यायचे. ते मिरज येथे समाजातील अधिवक्त्यांना संपर्क करण्यासाठी यायचे. ते अधिवक्त्यांना एकत्र करून ‘साधना आणि वकिली व्यवसाय यांची सांगड कशी घालू शकतो ?’, याविषयी मार्गदर्शन करायचे. सेवा म्हणून वकिली व्यवसाय आणि आपले कौशल्य यांचा साधना म्हणून उपयोग करण्याच्या दृष्टीनेही काका उत्साहाने सांगायचे. त्या वेळी त्यांच्या चेहर्यावर आनंद आणि गुरुकार्याची तळमळ दिसायची.
३. बिनचूक आणि परिपूर्ण सेवा करणे
मी मिरज आणि सांगली येथील न्यायालयीन सेवेसंदर्भात काकांना भ्रमणभाष करून संपर्क करत असे. तेव्हा काका न्यायालयीन सेवेसंदर्भातील सर्व सूत्रे पूर्णपणे समजून घेत असत. त्या सेवेत कोणतीही त्रुटी राहू नये, अशी काकांची तळमळ असे. बिनचूक आणि परिपूर्ण सेवा करण्याची त्यांची धडपड असे. तसेच सेवेतील अडचणींविषयी ते विचारून घेत असत.
४. न्यायालयीन सेवेतील सर्व बारकावे शिकवणे
त्यानंतर मला कुडाळ येथील सेवाकेंद्रात काकांसमवेत न्यायालयीन सेवा शिकण्याची संधी मिळाली. काकांना न्यायालयीन सेवेसंदर्भातील, तसेच अन्य संगणकीय पत्रे (ई मेल्स) येत असत. ती पत्रे पहाण्याची सेवा काकांनी मला दिली होती. मला काकांच्या समवेत सावंतवाडी, ओरोस, गोव्यातील अन्य न्यायालये आणि उच्च न्यायालयातही जायला मिळाले. तेव्हा काकांनी मला न्यायालयीन सेवेतील सर्व बारकावे शिकवले.
५. शिस्त, व्यवस्थितपणा आणि समयमर्यादेचे पालन करणे
सध्या मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात काकांच्या समवेत न्यायालयीन सेवा करण्याची संधी मिळत आहे. काका मला सेवेच्या प्रत्येक टप्प्याला मार्गदर्शन करतात. ते मी विचारलेली कोणतीही अडचण तत्परतेने सोडवतात. ते त्यांच्याकडील कुठलीच सेवा प्रलंबित ठेवत नाहीत. ते त्यांच्याकडील सर्व कागदपत्रे व्यवस्थित लावून ठेवतात. ते सर्व सेवा समयमर्यादेत पूर्ण करतात.
६. काकांच्या बोलण्यातून परम पूज्य गुरुदेवांविषयी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी) अपार श्रद्धा आणि भाव जाणवतो.
केसरकरकाकांच्या माध्यमातून न्यायालयीन सेवा भावपूर्ण, परिपूर्ण, तळमळीने आणि मनापासून कशी करायची ?, याविषयी मला शिकायला मिळते. त्यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– अधिवक्ता (सौ.) दुर्गा मिलिंद कुलकर्णी, फोंडा, गोवा. (८.२.२०२४)