मुलीवर साधनेचे संस्कार करणारे आदर्श पालक श्री. नारायण आणि सौ. नम्रता शिरोडकर !
‘कु. प्रांजलीवर साधनेचे इतके चांगले संस्कार करून श्री. नारायण आणि सौ. नम्रता शिरोडकर यांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. कु. प्रांजली हिच्यासह तिच्या आई-वडिलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (३.३.२०२४) |
‘आई-वडिलांनी माझ्यावर लहानपणापासून साधनेचे संस्कार केले. त्यामुळे मोठी झाल्यावर माझ्यात साधनेची रुची निर्माण झाली. मी त्यांची एकुलती एक मुलगी असूनही त्यांनी माझे अर्थशास्त्रामध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच मला पूर्ण वेळ साधना करण्यासाठी अनुमती दिली. माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांनी माझ्या साधनेलाच प्राधान्य दिले.
मी गेले दोन वर्षे रामनाथी आश्रमामध्ये सेवा करत आहेत. या कालावधीतही त्यांनी ‘मी घरी यावे किंवा त्यांच्यासाठी वेळ द्यावा’, अशी अपेक्षा कधीच व्यक्त केली नाही. त्यांनी केलेल्या साधनेच्या संस्कारांमुळे मला एका संतांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या संस्कार करण्याच्या पद्धतीचे एक ठळक उदाहरण मला माझ्या वाढदिवसाला पुन्हा अनुभवता आले.
३.३.२०२४ या दिवशी माझा वाढदिवस होता. त्या निमित्ताने आई-बाबांशी माझे बोलणे झाले. त्या वेळी आशीर्वाद देतांना बाबा म्हणाले, ‘‘चांगली साधना करून लवकर संत हो !’’ आणि आई म्हणाली, ‘‘तुला निराळा आशीर्वाद काय द्यायचा ? तू तर गुरुदेवांच्या चरणांपाशी (रामनाथी आश्रमात) आहेस !’’
या त्यांच्या दोन ओळींच्या संभाषणातूनही त्यांनी मला आध्यात्मिक ध्येय दिले आणि माझी भाव अन् श्रद्धा वाढवण्यास साहाय्य केले.
गुरुदेव, तुम्ही मला असे आई-वडील दिले, यासाठी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे !’
– कु. प्रांजली शिरोडकर (वय २५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०२४)