कास रस्त्यावरील अतिक्रमणांना महसूल विभागाची नोटीस !
सातारा, ४ मार्च (वार्ता.) – येथील येवतेश्वर ते कास रस्त्यावर बांधकाम करून अतिक्रमण केलेल्या भूखंडधारकांना, तसेच उपाहारगृह व्यावसायिकांना महसूल विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत. तहसीलदार नागेश गायकवाड यांनी ही कारवाई केली असून ३० दिवसांच्या आत अतिक्रमित बांधकाम काढून घेण्याची चेतावणी दिली आहे.
कास पठार हे नैसर्गिकदृष्ट्या संवेदनशील मानले जाते. प्रतिवर्षी पावसाळ्यानंतर फुलणारा फुलांचा हंगाम लक्षात घेता, येथे पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. याचा अपलाभ घेत जिल्ह्याबाहेरील काहींनी स्थानिक नागरिकांकडून कवडीमोल भावाने भूमी विकत घेत मोठमोठी बांधकामे केली आहेत. ही बांधकामे करतांना महसूल विभाग आणि वन विभाग यांच्या पर्यावरण नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले आहे. कास रस्त्यावरील अतिक्रमित बांधकामाचे सूत्र प्रतिवर्षीच ऐरणीवर येत असते; मात्र याविषयी आता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कठोर पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. त्यातच ३ दिवसांपूर्वी महसूल विभागाने कास रस्त्यावरील ८३ भूखंडधारकांना बांधकामाचे अतिक्रमण केल्याच्या निमित्ताने महसूल अधिनियम ५३ अन्वये नोटीस ठोठावली आहे.