शिवमंदिर परिसराचा विकास झाल्यानंतर लोक ‘चलो अंबरनाथ’ही म्हणतील ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, ४ मार्च (वार्ता.) – अंबरनाथ हे वाढते शहर आहे. वाढत्या शहराची आवश्यकता लक्षात घेऊन आपण विकासाला कुठेही पैसे अल्प पडू देणार नाही. शिव मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर विकसित केला जात आहे. अमरनाथप्रमाणे काही वर्षांत शिवमंदिराचा विकास झाल्यानंतर लोक ‘चलो अंबरनाथ’सुद्धा म्हणतील, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
शिलाहारकालीन शिवमंदिराच्या परिसराच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी संमत करण्यात आलेला आहे. या कामांचे भूमीपूजन ३ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान महत्त्वाचे आहे. यांच्या आशीर्वादाने आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ, प्रेरणा आणि ऊर्जा मिळते.’’
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्याचा चंग पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी बांधला आहे ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्षएखादा पंतप्रधान समुद्राच्या तळाशी जाऊन द्वारकेचे दर्शन घेईल, असे कधीही वाटले नव्हते. जसे देशात पंतप्रधान देहलीत बसले आहेत, तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्रात बसले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्याचा चंग या दोघांनी बांधला आहे. जो कित्ता बाळासाहेब ठाकरे गिरवत होते, तोच कित्ता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गिरवत आहेत, असे सांगत प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. |