2 NHAI officials arrested : नागपूर येथे राष्ट्रीय महामार्ग महाव्यवस्थापकास २० लाख रुपयांची लाच घेतांना अटक !
नागपूर – एका खासगी आस्थापनाची प्रलंबित देयके मान्य करण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक अरविंद काळे याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) येथे अटक केली. भोपाळ आणि नागपूर येथेही ३ मार्च या दिवशी ही कारवाई केली. विशेष म्हणजे केंद्र सरकारचा कर्मचारी असलेल्या काळे याला ३ लाख ४० सहस्र रुपये असे गलेलठ्ठ वेतन आहे. तरीही तो लाच घेत होता.
या प्रकरणी ‘सीबीआय’ने एकूण ६ जणांना अटक केली आहे. यामध्ये मध्यप्रदेशच्या हरदाचे उपसंचालक, प्रकल्प संचालक बृजेश साहू, ‘बन्सल समुहा’चे संचालक अनिल आणि कुणाल बन्सल यांचा समावेश आहे. आस्थापनाचे आणखी २ कर्मचारी सी. कृष्णा आणि छतरसिंह लोधी यांनाही अटक करण्यात आली आहे. ‘सीबीआय’ने ३ मार्च या दिवशी नागपूर-हरदा आणि भोपाळ येथील बन्सल समूहाच्या ठिकाणांवर रात्रभर झडती घेतली. त्यात लाचेच्या रकमेसह एकूण १ कोटी १० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ‘सीबीआय’ने सांगितल्यानुसार या आस्थापनाकडे महामार्गाच्या अनेक प्रकल्पांचे कंत्राट आहे.
आस्थापनाचा १ कर्मचारी थकित देयके आणि इतर कारवाई पूर्ण करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांशी संपर्कात राहून त्यांना लाच देत होता. याची कुणकुण लागल्याने ‘सीबीआय’ने अन्वेषण करायला प्रारंभ केला. नागपूर येथील आऊटर रिंग रोड प्रकल्पाशी संबधित प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी त्याने सौदा केला होता. प्रथम २५ लाख रुपयांचा सौदा ठरला आणि नंतर २० लाख रुपयांची लाच घेतांना काळे याला रंगेहात पकडण्यात आले.
संपादकीय भूमिका
|