साधकांनो, मृत्यूनंतरही आपल्याला सांभाळणारे केवळ गुरुच असल्याने त्यांचे चरण कधीही सोडू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत. ४ मार्च या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया. (भाग १५)
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका साधिकेच्या मृत्यूनंतर तिच्या लिंगदेहाचे सूक्ष्म परीक्षण करण्यास सांगणे
‘सौ. मंजू सिंह यांचे निधन झाल्यानंतर ‘मृत्यूनंतर एखाद्या साधिकेच्या लिंगदेहाची गती कशी असते ?’, याचे सूक्ष्म परीक्षण करण्यास परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला सांगितले. परीक्षण करतांना आमच्या लक्षात येत होते, ‘मानव जिवंत असण्यापेक्षा त्याचा मृत्यूनंतरचा प्रवास अतिशय खडतर आहे. त्यात अनेक संकटे आहेत. मृत्यूनंतर आपले जीवन सूक्ष्म होते; कारण चितेवर स्थूलदेह आधीच जळलेला असल्याने केवळ मृताचे मन, बुद्धी आणि इतर सूक्ष्म देह अन् कोष स्वत:च्या समवेत अनेक आवरणांच्या रूपात असतात. मृत्यूनंतर मृताचाही एक प्रकारे सूक्ष्म जगतातच प्रवेश होत असतो.’
२. मृत्यूनंतर वाईट शक्ती लिंगदेहावर आक्रमण करत असल्याने गुरुकृपेचे कवच आवश्यक असणे
या सूक्ष्म जगतात चांगल्या शक्तींच्या समवेत त्रास देणार्या अनेक सूक्ष्म शक्तीही आपल्या समवेत वावरत असतात. हे जीवन आपल्याला सर्वस्वी नवीन असते. सूक्ष्म जगतात वावरतांना अनेक वाईट शक्ती आपल्यावर आक्रमण करत असतात. कधी कधी वाईट शक्ती वासनात्मक लिंगदेहांना कार्य करण्यासाठी त्यांचे गुलामही बनवतात. अशा वेळी आपल्या भोवती गुरुकृपेचे कवचच हवे किंवा देवाची कृपा तरी हवी.
३. साधना करणार्या लिंगदेहावर नामजप करण्याचा संस्कार असल्याने त्याला वाईट शक्तींचा त्रास अल्प प्रमाणात होणे
साधना करणारा लिंगदेह वातावरणात फिरत असतांना त्याच्याकडून प्रक्षेपित होणार्या दैवी स्पंदनांमुळे त्याला वाईट शक्तींचा त्रास अल्प प्रमाणात होतो आणि झालाच, तर गुरु अथवा इष्ट देव त्याचे रक्षण करतात. त्या व्यक्तीने आयुष्यभर साधना केली असेल, तरच हे शक्य होते; कारण त्याच्यावर नामजप करण्याचा संस्कार असल्याने ‘सूक्ष्म जगतात विनाअडथळा वावरणे’, त्याला शक्य होते.
४. जिवंत असतांनाच साधना करण्याचे महत्त्व परात्पर गुरु डॉक्टरांनी मनावर बिंबवणे
परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला मृत्यूनंतरच्या प्रवासातील अनेक बारकावे शिकवून या जन्मात जिवंत असतांनाच साधना करण्याचे महत्त्व आमच्या मनावर बिंबवले; कारण मनुष्यजन्म अत्यंत दुर्लभ आणि अल्प कालावधीचा आहे. ‘आपले आयुष्य किती आहे ?’, हे आपल्याला ठाऊक नाही. मनुष्य आपले आयुष्य बरेच असल्याच्या भ्रमात वावरत असतो. त्याला मृत्यूची भीती वाटते; परंतु ‘भीती वाटूनही तो साधनेला महत्त्व देत नाही’, ही कलियुगातील मानवाची शोकांतिका आहे. मनुष्य म्हणतो, ‘मी उतारवयात साधना करीन. आता साधना करण्याचे वय आहे का ?’ लहान वयातच आई-वडिलांनी मुलांवर साधनेचे संस्कार केले पाहिजेत, तरच त्याचे मृत्यूनंतरचे जीवन सफल होते.
५. वेदनेच्या संस्कारांमुळे मृत्यूनंतरही मंजू यांच्या विव्हळण्याचा आवाज येणे आणि ‘मृत्यूनंतर वेदनाही नष्ट झाल्या असून आता आनंदाने पुढचा प्रवास कर’, असा निरोप मंजू यांना देण्यास परात्पर गुरुदेवांनी सांगणे
मंजू यांच्या संदर्भात आमच्या लक्षात आले, ‘साधकाचा लिंगदेह मृत्यूनंतरही गुरुच सांभाळतात. गुरु त्याचे रक्षण करतात.’ परीक्षण करतांना बर्याचदा आम्हाला मंजू अजूनही कर्करोगाच्या वेदनेने विव्हळत असल्याचे जाणवायचे. तसा त्यांचा आवाजही ऐकू यायचा. याविषयी माझे गुरुदेवांशी बोलणे झाले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तिच्यावर वेदनेचा संस्कार झाला आहे. तिला सूक्ष्मातून सांगा, ‘मंजू, आता तुला देह नाही. देहाच्या समवेत तुझ्या कर्करोगाच्या यातना संपल्या आहेत. देह जळून गेला की, आपले रोग आणि त्याच्या वेदनाही नष्ट होतात. त्यामुळे तू आनंदाने पुढचा प्रवास कर. साधना कर.’’
६. गुरुदेवांना प्रार्थना करताच मंजू यांच्या लिंगदेहाचे अस्तित्व आसपास जाणवणे आणि त्यांना गुरुदेवांचा निरोप दिल्यावर कण्हण्याचा आवाज बंद होणे
आम्ही मंजू यांचा चेहरा डोळ्यांसमोर आणून त्यांना सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांचा निरोप दिला. आम्ही यासाठी सर्वप्रथम परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना केली, ‘गुरुदेव, ‘आम्ही काय सांगत आहोत ?’, हे मंजू यांच्या सूक्ष्म देहाला कळू दे.’ त्या वेळी लगेचच ‘आमच्या आसपास तिचा लिंगदेह वावरत आहे’, असे आमच्या लक्षात आले. केवढी ही गुरूंची शक्ती ! ही शक्तीच सूक्ष्म जगतात प्रवास करणार्या सूक्ष्म लिंगदेहाला अशी इच्छित स्थळी आणू शकते. आपण केवळ त्या दैवी शक्तीला शरण जायला हवे. आम्ही मंजू यांना गुरुदेवांचा निरोप दिल्याने हळूहळू वातावरणातून ऐकू येणारा त्यांचा कण्हण्याचा आवाज बंद झाला.
७. जीवनात अनेक प्रकारे मनावर झालेल्या संस्कारांना मृत्यूनंतर पुसून टाकणारे गुरुच असल्याने गुरुकृपा महत्त्वाची असणे
यावरून आमच्या लक्षात आले, ‘मनुष्यावर त्याला अंतिम क्षणी जडलेला रोग आणि त्याने भोगलेल्या यातना यांचा किती मोठा संस्कार असतो !’ गुरुदेवांनी आम्हाला सांगितले, ‘‘मनुष्याला त्याच्या मृत्यूनंतर ‘आता आपल्याला स्थूलदेह नाही’, हे कळायलाच बरेच दिवस लागतात.’’ गुरुकृपेने साधकाच्या लिंगदेहाला साहाय्य करणारे कुणीतरी भेटते आणि ते अल्प दिवसांत त्याच्या लक्षात येते. जीवनात अनेक प्रकारे मनावर झालेल्या संस्कारांना मृत्यूनंतर पुसून टाकणारेही गुरुच असतात. यावरून लक्षात येते, ‘गुरूंचे कार्य आपला देह असू दे किंवा नसू दे, निरंतर चालूच असते; म्हणून जीवनात गुरुकृपा महत्त्वाची असते.’
८. गुरु आपल्या जीवनात असले, तर आपला मृत्यूही आनंददायी आणि मंगलदायी बनतो !
परत एकदा सांगावेसे वाटते की, गुरूंचे चरण कधीच सोडू नका. ते मृत्यूनंतरही आपल्याला साथ देतात. आपल्या मृत्यूनंतरही तेच आपल्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शक ठरतात; कारण मृत्यूनंतर आपल्याला सांभाळणारे आपले आप्तस्वकीय नसतात किंवा आपले मित्रही नसतात, तर केवळ ‘आपण आणि आपले गुरु !’, हेच प्रवासात एकत्र असतात. ‘गुरु आपल्या जीवनात असले, तर आपला मृत्यूही आनंददायी आणि मंगलदायी बनतो’, हेच खरे !’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, बेंगळुरू, कर्नाटक. (२७.२.२०२२)
|
भाग १६ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/770920.html