‘सार्क’च्या सदस्य देशांकडून आतंकवादाला उघड पाठिंबा ! – एस्. जयशंकर
नवी देहली – पाकिस्तानमध्ये शहबाज शरिफ सरकारच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस्. जयशंकर यांनी दक्षिण आशियाई सहकार्य संघटना अर्थात् ‘सार्क’चे त्वरित पुनरुज्जीवन करण्याची शक्यता नाकारली आहे. पाकिस्तानचे नाव न घेता जयशंकर म्हणाले की, सार्क संकटात आहे; कारण त्याचा एक सदस्य देश आतंकवादाला उघडपणे पाठिंबा देत आहे. या पार्श्वभूमीवर सार्कच्या भवितव्यावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सौजन्य विऑन
१. सार्क ही एक प्रादेशिक संघटना आहे, ज्यामध्ये भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. वर्ष २०१६ पासून सार्कच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
२. जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये भारतीय सैन्यदलाच्या तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर भारत, बांगलादेश, भूतान आणि अफगाणिस्तान यांनी यात सहभागी होण्यास नकार दिला होता.
३. भारताने सार्कच्या जागी ‘बिमस्टेक’चा (बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगालच्या उपसागराचा पुढाकार) प्रचार चालू केला आहे. परराष्ट्रमंत्री मंत्री जयशंकर म्हणाले की, ‘बिमस्टेक’च्या अंतर्गत सहकार्य पुढे जात आहे आणि संघटनेत वाढ होण्याची इच्छा आहे.